समजा माझा मुलगा पुढे कधी कॉमेडियन झाला तर विनोद निर्मिती साठी तो बहुदा माझा वापर करेल असं वाटतं. सगळीच मुलं आपल्या आईवडिलांचा करतात. रसेल पीटर्स त्याच्या वडिलांवर विनोद करतो. पीटर्सचा बरेचदा ऐकलेला विनोद आहे: तो लहान असताना बरोबरच्या कॅनेडियन मुलांच्या नादी लागून आपल्या वडिलांना धमकी देत असे - "तुम्ही जर मला मारलत तर मी पोलीसला फोन करेन." त्याचे भारतीय वडील म्हणत, "अगदी खुषाल कर. तू फोन केल्यावर पोलिसांना आपल्या घरी यायला दहा मिनिट तरी लागतील. तेवढ्या वेळात मी तुझी हवी तेवढी धुलाई करू शकतो." तू नलिकेवरची सुपर वुमन लिली सिंग आपल्या पंजाबी आईवडिलांवर विनोद करते. ती स्वतःच तिच्या आईची आणि वडिलांची भूमिका साकारते आणि छोट्या विनोदी नाट्यछटा तयार करून त्या आपल्या चॅनल वर लावते. भरपूर लोक ते आवडीनं बघतात.
तसं माझ्या मुलाकडे आताच थोडंफार मटिरियल साठलं असावं. ते त्याच्या लक्षात आलं नसेल तर काही गोष्टींची इथे नोंद करून त्याला थोडी मदत करण्याचा विचार आहे जेणे करून त्याच्या लक्षात येईल कि मी त्याच्यासाठी एक चांगला विनोदाचा स्रोत होऊ शकते. माझ्या नेहमीच्या वागण्यात त्याला विनोद आढळेल अशी आशा आहे.
होतं काय की शनिवारी सकाळी त्याला कुठे जायचं असेल तर शुक्रवारी संध्याकाळी मी त्याला म्हणते, "तुला जिथे जायचंय ना तिथे जवळच माझं थोडं काम आहे. आपण बरोबरच जाऊ." तसं माझं काम वगैरे काही नसतं पण उगीच त्याला एकटं कशाला सोडा म्हणत मी त्याच्या मागे लागते. खुशीत, नाखुषीनं कि नाईलाजास्तव माहित नाही पण तो सहज तयार होतो.
मी वेळेची फार पक्की आहे. कुठेही जायचं असो नेहमी बोर्डाच्या परीक्षेचा पेपर असल्या प्रमाणे वेळेत हजर रहायला मला आवडतं. तीच सवय मुलाला लावायचा मी कसून प्रयत्न करतेय पण अजून तरी मला त्यात बिल्कुल यश आलेलं नाही. "ऊठ, ऊठ", हा नेहमीचा ओरडा करत कसे बसे आम्ही तयार होतो. उबर बोलावतो. उबर मध्ये बसत असताना माझ्या लक्षात येतं कि ड्रायव्हरनी त्याची सीट जरा जास्त मागे केलीय. त्यामुळे पुढच्या आणि मागच्या सीट मधलं अतंर खूप कमी झालंय.
मागच्या शनिवारी तसंच झालं, "मला पाय आखडून बसावं लागतय. त्याला सांगू कि काय सीट थोडी पुढे घे म्हणून," मी स्वतःशीच पुटपुटले. मुलानं तात्काळ मला नको सांगूस म्हणून खुणावलं. आज काल सर्वसाधारणपणे सगळ्याच बाबतीत मी त्या तीन जग प्रसिद्ध माकडांसारखं डोळे, कान, आणी तोंड बंद ठेवावं अशी त्याची अपेक्षा असावी.
पाय आखडून बसावं लागल्यामुळे प्रवासात माझं मन रमेना. गाडीतला आवाज कानांना टोचू लागला. मी ड्रायव्हरला विनंती केली, " जरा रेडिओचा आवाज कमी करता का? किंवा बंद केलात तरी चालेल." मुलाला ते आवडलं नाही पण मी तिकडे दुर्लक्ष केलं. त्यानं गाडीत बसल्या बसल्या लगेच फोनच्या कांड्या आपल्या कानात अडकवल्या होत्या त्यामुळे त्याला रेडिओच्या आवाजाचा त्रास व्हायचा प्रश्न नव्हता.
थोडा वेळ शांततेत गेला आणि मला गरम व्हायला लागलं. बाहेर खूप थंडी असेल आणि गाडीत हिट चालू असेल तर मी ड्रायव्हरला म्हणते, " खिडकीची काच थोडी खाली करते हं. पाठीमागे गरम होतय." किंवा बाहेर थंडी नसेल आणि गाडीच्या काचा खाली असतील तर मी ड्रायव्हरला विचारते, " तुमचा ए सी बिघडलाय का? चालू करा ना. मागे फार गरम होतंय." अशावेळी मुलगा नाईलाजाने मान हलवत माझ्याकडे बघतो.
शेवटी एकदाचं आमचं उतरायचं ठिकाण आलं. मी मुलाला म्हंटल, "तुझं झालं कि मला मेसेज कर, मग ठरवूया कुठे भेटायचं ते." तो त्याच्या कामाला गेला. त्याचं काम होई पर्यंत काय करावं या विचारात मी जवळपास आमच्या सार्वजनिक वाचनालयाची शाखा, एखादं पुस्तकांचं दुकान वगैरे काही दिसतंय का ते बघितलं. काहीच दिसलं नाही. मात्र कोपऱ्यावरचं स्टारबक्स मला खुणावत होतं. बाहेर थंडीत फिरण्यापेक्षा गरम कॉफीचे कडवट घुटके घेत उबेत बसण्याचा मोह झाला. पण मी तो मोह आवरला. त्यांच्या फ्रुट आणि चीज बॉक्सचं आजकाल मला व्यसन जडलय. बहुदा त्यामुळेच सकाळी वजनाचा काटा चार पौंडांनी वर गेला होता. उगीच तोंडात काही घालायला नको, मग तो काटा खाली येत नाही, त्यापेक्षा थोडं चाललेलं बरं असा विचार करत मी जवळच्या पार्कच्या दिशेनं चालू लागले.
वाटेत एक डिपार्टमेंटल स्टोअर लागलं. तिथे मोठ्ठ्या काचेच्या खिडकीत कपडे, चप्पल- बूट, हॅण्डबॅग्ज, स्कार्फ यांची आकर्षक मांडणी केलेली होत. माझी पावलं क्षणभर ते बघायला थबकली. खिडकीतली मांडणी बघून वाटलं पार्कमध्ये चाललं काय किंवा डिपार्टमेंटल स्टोअरच्या आत चाललं काय एकूण एकच. चालणं हे शेवटी चालणं आहे - आत काय नी बाहेर काय. पार्क मध्ये फिरायचा विचार बदलून मी दुकानातला सरकता जिना चढले .
लवकरच लक्षात आलं की पार्क मध्ये चालताना नक्कीच जास्त प्रसन्न वाटलं असतं. पण थोड्याच वेळात एकटीनं चालण्याचा कदाचित कंटाळा आला असता. एवढ्या मोठ्या दुकानात चालणं बरच तणावपूर्ण आहे - दाटीवाटीनं ठेवलेल्या अनेक प्रकारच्या वस्तू, त्यांच्या किंमती, त्यातल्या काहींवर डिस्काउंट आहे तर काहींवर नाही, साईझ, रंग या सगळ्याची सांगड घालताना मनावर ताण पडतोय. पण वेळही पटकन जातोय.
शिवाय डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये चालत असताना आपल्या काही सुप्त इच्छा अनपेक्षितपणे पूर्ण होऊ शकतात जे पार्क मध्ये चालताना संभव नसतं. म्हणजे आपल्याला जर खूप दिवसांपासून वाटत असेल कि आपल्या बाथरूमच्या कपाटात, दात घासण्यासाठी कोळशाची पावडर असावी तर अचानकपणे छोट्याशा नाजूक निळ्या बरणीत पॅक केलेली चारकोल पावडर आपल्या समोर येते आणि आपली ती इच्छा पूर्ण होऊ शकते. किंवा तू नलिकेवरच्या व्हिडिओत जर एखादया मुलीनं अंड्याचं पांढरं चेहऱ्याला लावताना केस मागे सारण्यासाठी विशिष्ट प्रकारचा हेअर बँड वापरला असेल आणि तसा हेअर बँड आपल्याकडे नसल्या कारणानी अंड्याचं पांढरं चेहऱ्याला लावण्याची प्रक्रिया आपल्याला पुढे ढकलावी लागली असेल तर अनपेक्षितपणे तशा प्रकारचा हेअर बँड आपल्या समोर येतो आणि आपली ती इच्छाही पूर्ण होते.
दुकानात मी स्किन केअर, हेअर केअर, फूट स्क्रब, लीप स्क्रब, हेअर मास्क, फेस मास्क, बाथ बॉम्ब, शॉवर ब्लास्ट च्या चक्रव्यूहात अडकलेली होते आणि फोन वाजला. कोण ते माझ्या चालण्यात व्यत्यय आणू पहातंय म्हणून बघितलं तर मुलाचा मेसेज होता - "माझं झालं, चल जाऊया" तो म्हणाला. त्याचं खूप लवकर आटपलं असं वाटलं म्हणून घडाळ्यात बघितलं तर एक तास होऊन गेला होता. माझं अर्ध दुकानही अजून चालून झालं नव्हतं.
मी त्याला दुकानाचा पत्ता दिला आणि दुसऱ्या मजल्यावर यायला सांगितलं. तो दुकानापाशी आला, पण बाहेरच थांबला. मी एक -दोनदा सांगून बघितलं - "वर ये, जरा दुकानात फिरून बघ. काहीतरी सापडेल जे तुला पुष्कळ दिवसांपासून हवं आहे." पण त्यानं नकार दिला.
मग माझा नाईलाज झाला. किती वेळ त्याला खालती उभं रहायला लावणार? परत त्यानं कटकट केली असती. म्हणून ज्या वस्तू शॉपिंग बास्केट मध्ये होत्या त्यांचे पटकन पैसे दिले आणि मी खाली आले. आम्ही दोघे लंच-ब्रंच साठी डायनरच्या दिशेने चालू लागलो. थोडा वेळ चालल्यावर माझ्या मनात जे सलत होतं ते मी मुलाजवळ व्यक्त केलं. त्याला म्हंटलं, "अरे, थिअरीच्या कपड्यांवर चांगला डिस्काउंट होता दुकानात, पण तुझं काम इतक्या पट्कन झालं कि मला नीट बघायला वेळच मिळाला नाही." "तू सांगितलंस हे मला दुकानातून बाहेर आल्या आल्या. परत परत तेच कितीदा सांगशील," तो कुरकुरला.
आम्ही डायनर मध्ये पोहचून खुर्चीत स्थानापन्न झाल्यावर वेटरनी कॉफीचा कप माझ्या पुढ्यात आणून ठेवला. त्या बरोबर होतं कॉफीत घालण्यासाठी नेहमी प्रमाणे फ्रिज मधलं थंडगार दूध. माझ्या मनातली नेहमीची तक्रार नकळत ओठांतून बाहेर पडली, "या लोकांना कधी समजणार कि गरम चहा- कॉफी मध्ये नेहमी गरम दूध घालावं. फ्रिज मधलं थंड दूध घातलं कि कॉफी चटकन थंड होते आणि ती पिण्यामागचा हेतू असफल होतो." मुलानी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आपल्या सेलफोनवर लक्ष केंद्रित केलं.
मग मी स्वतःशीच थोडा संवाद साधला. माझ्या बोलण्यात तसं तथ्य आहे. अमेरिका भारता कडून सध्या बऱ्याच गोष्टी शिकते आहे - योग, ध्यान, चाय, हळदीचा वापर, अश्वगंधा, ब्राम्ही सारख्या जडीबुटींचा वापर (दात चकचकीत करण्यासाठी कोळशाच्या पुडीचा वापर). पण काही गोष्टी अजूनही शिकणं बाकी आहे. त्यातली एक म्हणजे गरम चहा- कॉफीत नेहमी गरम दूध घालायचं असतं आणि दुसरं म्हणजे माशांचे तुकडे नेहमी पातळ कापायचे असतात. सामन, किंग फिशचे काप एवढे जाड कापुन ठेवतात कि तळताना ते बाहेरून पटकन शिजले जातात पण आतुन कच्चे रहातात. आतून शिजायची वाट बघत बसलं कि बाहेरून जास्त शिजतात. एवढी साधी गोष्ट या लोकांना का समजत नाही माहित नाही. मुंबईतल्या कुठल्याही मासळी बाजारातली कुठलीही कोळीण सहज शिकवू शकेल कि माशांचे काप पातळ कसे कापावेत.
कोळणींवरून आठवलं- मुंबई कितीही बदलली तरी एक गोष्ट कायम म्हणजे कायम...अगदी कायम मुंबईत टिकावीशी वाटते ती म्हणजे आपली आन- बान -शान आणि पहचान असलेल्या आपल्या कोळणी आणि आपले मासळी बाजार. कोळणी आता पूर्वीसारख्या दारावर मासळी विकायला येत नाहीत असं म्हणतात. दारोदार फिरून मासळी विकायची जरूर त्यांना आता भासत नाही हि चांगली गोष्ट आहे. प्रभादेवीतल्या आमच्या इमारतीत फेरीवाल्या विक्रेत्यांना प्रवेश नाही आणि इमारतीतले जे काही थोडे लोक मासेहारी आहेत ते मासळी बाजारात जातातच असं नाही. सुपर मार्केटमधून मासे आणतात. सिध्दीविनायक कृपा करो आणि मुंबईतले मासळी बाजार आणि त्यातलं कोळणींच स्थान अबाधित राहो... डायनरच्या एग्ज बेनडिक्टचा आस्वाद घेत मी सिटी लाईट पासून सुरवात करून, अगर बझार ते प्रभादेवी अशा सगळ्या मासळी बाजारात एक चक्कर मारून आले.
अर्ध्या वाटेवर आलोच होतो म्हणताना जेवण झाल्यावर डायनर मधून आम्ही चालत घरी आलो. हवा छान होती. स्प्रिंग जवळपास सुरु झालाय. थंडी तर होंती पण ऊन पडलं होतं त्यामुळे जाणवत नव्हती. वाय त्याच्या फॅन्टसी बास्केट बॉल बद्दल काहीतरी सांगत होता. गप्पांच्या ओघात घरी कधी पोहोचलो समजलंच नाही. आणलेल्या वस्तू कपाटात ठेवताना लक्षात आलं एक फार मोठ्ठा घोळ झालाय. शॅम्पू- कंडिशनर-जेल-सिरम- मूस च्या घोटाळ्यात कोरड्या केसांचा कंडिशनर घ्यायच्या ऐवजी चुकून मी तेलकट केसांसाठीचा कंडिशनर आणला...आता परत जाऊन तो बदलून आणण्या शिवाय गत्यंतर नाही. तरी नशीब मुलाला पुढच्या शनिवारी परत तिथे जायचय. मलाही त्याच्या बरोबर जाता येईल. नाहीतर दहा डॉलर्सचा कंडिशनर बदलून आणायला वीस डॉलर्स उबरचा खर्च असं उलट गणित झालं असतं.
पुढल्या वेळी मात्र मी अजिबात मास्क, स्क्रब, लोशनच्या भोवऱ्यात अडकणार नाही. दुकानात शिरल्यावर इकडे तिकडे काय मांडून ठेवलंय ते न बघता सरळ जाऊन फक्त कंडिशनर बदलून घेणार आणि गेल्या पावली परत फिरून पार्क मध्ये चालायला जाणार... किंवा थिअरीचे कपडे काही उरले असतील सेल मध्ये तर तेवढेच फक्त बघीन.. .बस ... आवडलं तर एखादं- दुसरं काहीतरी घेईन.. बस्स. आणि मग लगेच पार्क मध्ये चालायला जाईन. पाऊस नाही पडला म्हणजे नशीब... नाहीतर परत स्टारबक्स खुणावेल.
|
yesheeandmommy.blogspot.com |
वाय जर कॉमेडियन झाला तर त्यानं अत्यंत सट्ल कॉमेडी करावी अशी माझी ईच्छा आहे. अगदी सट्ल, टंग इन चीक म्हणतात तशी. लाऊड बिल्कुल नाही पण तरीही सभोवतालच्या गोष्टींवर सखोल भाष्य करणारी. मींडी कलिंग चा एक जोक वाचला होता. तो मला मजेशीर तरीही खोल वाटला. तीचं पूर्ण आडनाव चोकलिंगम. ते छाटून तिनं कलिंग केलय. एकदा ती दागिन्यांचं प्रदर्शन बघायला गेली. तिथे एक कानातले डूल तिला खूप आवडले. त्याविषयी ती म्हणाली - ते डूल फार सुंदर होते. अमल क्लुनी जर विधवा झाली तर तिला भेटायला जाताना घालून जाण्यासारखे होते. किंवा पुलं चा जोक- ते सुनिता बाईंना एकदा म्हणाले - आपल्या घरात मी एकटाच देशपांडे आहे, तू उपदेशपांडे आहेस.