Wednesday, January 23, 2019

मृत्युलेख






वर्तमानपत्र कुठलही असो पहिल्या पानावरच्या बातम्या वाचूच नये असं वाटतं आजकाल. मन ताजतवानं  होईल, मनाला उभारी मिळेल असं त्यात काही नसतं. कुठेतरी युद्ध सुरु,  कुठेतरी गोळीबार, नाहीतर राजकारण अशा बातम्यांनी पहिली पानं भरलेली असतात. एखादी वाचनीय बातमी शोधत पानं पलटत जावं तर सकरात्मक,  प्रेरणादायी काही सापडतं ते पेपरच्या शेवटी - ओबिच्युएरी विभागात. न्यूयॉर्क टाईम्स मधले मृत्युलेख कधीकधी पेपरचं अख्ख/ अर्ध पान व्यापतात. बहुतांश मंडळी चांगली ऎंशी, नव्वद वर्ष पार केलेली असतात त्यामुळे त्यांच्या मृत्यूची दुःखद वार्ता यापेक्षा त्यांच्या संपंन्न दीर्घ आयुष्याचा गौरव अशा लेखात जास्त असतो. अशा काही मृत्यूलेखांनी माझ्या मनाला टवटवी आणली आहे, माझ्या सामान्य ज्ञानात भर टाकली आहे, वाचनात भर टाकली आहे, आणि कधीकधी प्रवासातही.

त्यातलाच एक मृत्युलेख म्हणजे गेल्या वर्षी ६ जून च्या पेपरातला, जिल केर कॉनवे यांच्या वरचा. चांगला सविस्तर मृत्यूलेख होता तो. डॉक्टर केर  कॉनवे स्मिथ कॉलेजच्या प्रेसिडेंट होत्या. स्मिथ कॉलेज नक्की कुठे आहे हे माहित नसलं तरी त्याबद्दल तसं ऐकून माहिती होतं. बेट्टी फ्रीडॅन आणि ग्लोरिया स्टायनम  - ज्यांनी महिलांना समाजात पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा मिळावा म्हणून आपल्या कार्यानी आणि लिखाणानी सामाजिक क्रांती घडवून आणली, त्या दोघीही स्मिथ कॉलेजच्या विद्यार्थिनी. अमेरिकेतलं महिलांसाठीच ते सर्वात मोठ्ठ लिबरल आर्टस् कॉलेज.

डॉकटर कॉनवे स्मिथ कॉलेजच्या पहिल्या महिला प्रेसिडेंट. जन्मानी त्या ऑस्ट्रेलियन होत्या. तिथे त्यांच्या वडिलांचं मोठ्ठ  ३५००० हज्जार एकरांचं मेंढ्यांच आणि गुरांच कुरण होतं. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी मधून पदवी घेऊन प्रथम क्रमांकानी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या दोन मित्रांच्या समवेत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र सेवेत नोकरी साठी अर्ज केला. त्यांच्या मित्रांना नोकरी मिळाली. त्यांना नाही. परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या अर्जावर शेरे लिहिले - ती जरा जास्तच सुंदर आहे...जरा जास्तच आक्रमक बुद्धीची आहे... वर्षाच्या आत तिचं लग्न होईल... परराष्ट्र सेवेसाठी चालणार नाही.

डॉकटर कॉनवेंनी आपल्या ट्रू नॉर्थ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलंय, "सप्टेंबर १९६० मध्ये मी हार्वर्ड आणि केम्ब्रीज, मॅसॅच्युसेट्सला जाण्यासाठी निघाले. आयुष्यातल्या महत्वाच्या टप्प्यातून जात असताना जी हुरहूर, उत्साह असतो त्या संमिश्र स्थितीत होते. मी उच्च शिक्षणासाठी निघाले होते. तरीही हि निवड म्हणजे एका अभ्यासपूर्ण व्यवसायाच्या स्वप्नानी आकाराला आलेल्या आयुष्याची पूर्तता नव्हती. ऑस्ट्रेलियात मनासारख्या क्षेत्रात काम मिळण्याची शक्यता सर्वतोपरीने पडताळून पहिल्यानंतर , एक -एक करून ती सर्व क्षेत्र महिलांसाठी खुली नाहीत असं आढळल्यावर मी या निर्णयाप्रत पोहोचले होते."

आपल्या कारकिर्दीचा बराचसा भाग डॉक्टर केर - कॉनवेंनी केवळ परराष्ट्र सेवेतच नाही तर शास्त्र, कायदा, कला या सर्व क्षेत्रात महिलांना चांगली वागणूक मिळावी म्हणून झगडण्यात घालवला. त्या इतिहास तज्ञ होत्या. अमेरिकन समाजात स्त्रियांच्या भूमिकेबद्दल त्यांनी बरच लिखाण केलं. त्या कुशल अभ्यासक होत्या आणि आपल्या वैविध्य पूर्ण कारकिर्दीत त्यांनी विसाव्या शतकाच्या सुरवातिच्या कालखंडातील अमेरिकेतील महिला सुधारकांचा विशेष अभ्यास केला.

इतर पुस्तकां बरोबरच त्यांनी तीन मनोगत लिहिली जी टीकाकारांच्या प्रशंसेस पात्र ठरली. पहिलं मनोगत १९८९ साली प्रकाशित झालेलं द रोड फ्रॉम कुरेन.  हे त्यांच्या ऑस्ट्रेलियातील बालपण बद्दल आहे. त्यानंतर १९९४ मधलं ट्रू नॉर्थ हे ऑस्ट्रेलियाहुन अमेरिकेला आल्या नंतरच्या कालखंडाबद्दल आहे आणि २००१ मधलं अ वूमन्ज एज्युकेशन जे स्मिथ कॉलेज मधील त्यांच्या कारकिर्दी विषयी आहे. 

डॉक्टर कॉनवे असं म्हणत कि आपल्या आईला जाणून घेण्यासाठी, ज्या समाज प्रवाहांनी त्यांच्या आईला घडवलं ते समाज प्रवाह समजून घेण्यासाठीच एक साधन म्हणून त्या इतिहासाच्या अभ्यासाकडे आकर्षित झाल्या. त्या पंधरा वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली. त्यांचा मोठा भाऊ वयाच्या वीसाव्या वर्षी अपघातात गेला. त्या एका ठिकाणी लिहितात,  "माझ्या आईला नेहमी असं वाटत आलं कि माझं उच्च शिक्षण म्हणजे हे दोन मोठे दैवी आघात सहन करावे लागल्या बद्दलची भरपाई म्हणून तिला मिळालेलं बक्षीस असायला हवं."

डॉकटर कॉनवे १९७५ साली वयाच्या चाळीसाव्या वर्षी स्मिथ कॉलेजच्या अध्यक्ष झाल्या. बऱ्याच नामवंत महिला या कॉलेजच्या माजी विद्यार्थिंनीं मध्ये मोडतात. ग्लोरिया स्टायनम आणि बेट्टी फ्रिडॅन बरोबरच गॉन विथ द विंड या सुप्रसिद्ध कादंबरीची लेखिका -  मार्गारेट  मिचेल, पाककलाशास्त्र तज्ञ ज्युलिया चाईल्ड, अमेरिकेच्या दोन राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी - नॅन्सी रेगन आणि बार्बरा बुश. तसंच द बेल जार ची लेखिका आणि कवयत्री सिल्व्हिया प्लॅथही त्याच कॉलेजची.

या झाल्या स्मिथ कॉलेजच्या काही खऱ्याखुऱ्या माजी विद्यार्थिनी. त्यांच्या बरोबरच ओव्हर द इयर्स गाजलेल्या टी व्ही मालिकांतील काही व्यक्तिरेखाही स्मिथ मध्ये शिकलेल्या आहेत असं दाखवलेलं आहे. उदाहरणार्थ सेक्स अँड द सिटी मधली शार्लट यॉर्क ही व्यक्तीरेखा,  ग्रेज ऍनाटमी मधली ख्रिस्टीना यांग,  गिलमोर गर्ल्स मधली एमिली गिलमोर... आणि ज्या व्यक्तिरेखेनी लहानपणी मला खूप भुरळ घातली होती ती क्रेमर व्हर्सेस क्रेमर या सिनेमातली मेरील स्ट्रीप नी पडद्यावर साकारलेली जोऍना क्रेमर.

१८७५ साली सुरु झालेलं स्मिथ कॉलेज सुरवातीचा बराच काळ श्रीमंत मुलींसाठीच फिनिशिंग स्कुल म्हणून ओळखलं जात असे. पण १९६० आणि ७० च्या दशकात बेट्टी फ्रिडॅन आणि ग्लोरिया स्टायनम तिथून शिकून बाहेर पडल्या आणि तेंव्हा पासून ते कॉलेज पूर्णपणे स्त्रीवादी म्हणून गणलं जाऊ लागलं. स्मिथ मध्ये शिकलेल्या महिला महत्वाकांक्षी, दृढनिश्चयी आणि यशस्वी समजल्या जातात.






मुंबईत असताना क्रेमर व्हर्सेस क्रेमरची मी व्हिडीओ वरती बरीच पारायणं केली होती. का माहित नाही. तशी तेंव्हा मी झंजीर, दिवार, द गुड द बॅड अँड द अग्ली आणि फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर या सिनेमांचीही बरीच पारायणं केली होती. पण त्या सिनेमांची गोष्ट वेगळी. त्यात अँग्री यंग मेन होते. हिंदीत अमिताभ बच्चन आणि इंग्रजीत क्लिंट ईस्टवूड. क्रेमर व्हर्सेस क्रेमर मध्ये असं काय होतं? टुटसी डस्टीन हॉफमन? आता आठवतं कि तेंव्हा खूप प्रभाव पडला होता तो मेरीला स्ट्रीपचा आणि तिच्या अभिनयाचा. तो सिनेमा बघताना अर्थातच मला जोऍना क्रेमर स्मिथ मध्ये शिकलेली आहे असं दाखवलंय वगैरे काही समजलं नव्हतं. ते आत्ता समजलं. अमेरिकन सिनेमातले सगळेच्या सगळे संवाद तेंव्हा समजत नसत.स्मिथ कॉलेजच नावही माहित नव्हतं. एकूण अमेरिकेबद्दलच मी पूर्णपणे अज्ञानी होते. क्रेमर व्हर्सेस क्रेमर चित्रीकरण मॅनहॅटनच्या अप्पर ईस्ट साईड, सेंट्रल पार्क या भागात झालंय. ते सगळे भाग कधी काळी आपले नेहमीचे होतील किंवा व्हावेत असं तो सिनेमा पहाताना स्वप्नातही आलं नव्हतं.

पण तेंव्हा (आणि बहुतेक अजूनही) अर्थ सारखा एखाद दुसरा सिनेमा वगळता हिंदी सिनेमातील बहुतेक हिरॉईन  म्हणजे छान छान चकचकीत, रंगीबेरंगी कपडे घालून, भरपूर चेहरा रंगवून नाचायचं - या पलीकडे फारसं काही करत नसत. त्या पार्श्वभूमीवर मेरील स्ट्रीपची ती भूमिका आणि तो सिनेमा मला खूप आवडला होता हे खरं.

थोडं विषयांतर करायचं झालं तर हिंदी सिनेमात नायक - नायिकांच्या निवडीचे निकष बदलतील तेंव्हा बहुतेक हिंदी सिनेमा, त्यातला महिलांचा दर्जा आणि कदाचित त्याबरोबरच देशातली सामाजिक स्थितीही सुधारेल. सध्या बघितलं तर हिंदी नटनटांच्या बाबतीत अभिनय करता येणं हा मुद्दा अनावश्यक मानला जातो. नट्यांचं कौतुक होतं ते कुठल्या निकषांवर?  -  तर म्हणे अमुक तमुक काय सुंदर नाचते, अमुक तमुक काय सुंदर हसते आणि कळस म्हणजे अमुक तमुक म्हणे जगातली सर्वात सुंदर स्त्री ( असं जगातली सर्वात सुंदर स्त्री कोण हे ठरवणं शक्य आहे? ).  नटांच्या बाबतीतही थोडंफार तसंच असतं  - एखाद्याचं शरीर कमावलेलं तर दुसरा एखादा म्हणे मार्शल आर्ट्स एक्सपर्ट.

९०च्या दशकात भारताचे दरवाजे परदेशी कंपन्यांसाठी खुले झाले आणि एका पाठोपाठ एक भारतीय मुली तेंव्हा आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकू लागल्या. त्या स्पर्धांचे प्रमुख प्रायोजक महिलांसाठी सौंदर्य प्रसाधनं बनवणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या असतात. त्यांच्या साठी ही जहिरातीची आयती संधी होती. प्रियांका चोप्रा चुकीचं उत्तर देऊनही जिंकली तेंव्हाच खरतर आपल्याला थोडी शंका यायला हवी होती. तिच्या सकट त्या स्पर्धा जिंकलेल्या मुलींना सरळ, विनासायास हिंदी सिनेमात नायिकेच्या भूमिका मिळू लागल्या.

सौंदर्य स्पर्धा जिंकलेल्या मुली हिंदी सिनेमात आल्यामुळे हिंदी सिनेसृष्टीत महिलांचा दर्जा उंचावायला मदत झाली का - हा चर्चेचा विषय होऊ शकेल. एवढं मात्र खरं कि या मुलींना सिनेमात कामं निव्वळ त्या सौंदर्य स्पर्धा जिंकल्या मुळे मिळाली होती. अभिनयातला "अ" हि त्यांच्या पैकी एकिनीही सिनेमात येण्याआधी गिरवलेला नव्हता. सिनेमात आल्यावर तरी गिरवला कि नाही कुणास ठाऊक.

एकदा या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतातली बाजारपेठ काबीज केल्यावर गेल्या काही वर्षात बघितलं तर क्वचितच एखादया भारतीय मुलीनी आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांकावर स्थान मिळवलंय. त्यामुळे त्यांचा हिंदी सिनेमात प्रवेश करण्याचा ओघही कमी झालाय. कदाचित यथावकाश तो थांबेलही.

उदाहरणा दाखल बघायचं झालं तर अमेरिकेत सौंदर्य स्पर्धा, मॉडेलिंग आणि हॉलिवूड ही संपूर्णपणे वेगळी क्षेत्र आहेत. त्यात अज्जिबात सरमिसळ केली जात नाही. त्यांचे निवडीचे निकषही सर्वस्वी वेगळे असतात. सौंदर्य स्पर्धा जिंकलेल्या मुली आपली बक्षिसाची रक्कम घेतात, ती पुढील शिक्षणासाठी वापरतात आणि त्यानंतर सर्वसामान्य आयुष्य जगतात. त्यांना ना मॉडेलिंगची संधी मिळते ना सिनेमा -नाटकात किंवा टीव्हीवर अभिनय करण्याची. फॅशन मॉडेल्सची निवड सर्वस्वी वेगळ्या निकषांवर केली जाते. फॅशन मॉडेल्स या सौंदर्य स्पर्धेच्या विजेत्या नसतात आणि केवळ यशस्वी मॉडेल आहे म्हणून तिला सिनेमात भूमिका मिळाली असं कधी होत नाही. हॉलिवूडच्या अभिनेत्री कधीच कुठल्या डिझाईनर साठी रॅम्पवर चालताना दिसत नाहीत. मग डिझाइनर कितीही मोठा/ मोठी असो. एखादा फॅशन शो पहिल्या रांगेत बसून बघणे यापलीकडे सिने नटनट्यांचा फॅशन शो मध्ये कधी सहभाग नसतो. आणि हॉलिवूडच्या सिनेमात पडद्यावर भूमिका साकारणारे ना मॉडेलिंग मधून तिथे जातात ना सौंदर्य स्पर्धा जिंकून. ते येतात ते नाटकातून किंवा अभिनयाचं रितसर शिक्षण घेऊन... हे थोडं विषयांतर झालं.






योगायोग असा कि मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही ऍमहर्स्टला जाणार होतं. ते आधीच ठरलेलं होतं. तिथे आठवडा भर रहाणार होतो. ऍमहर्स्ट हे खेडेगाव आहे. अमेरिकेतलं खेडं असल्यामुळे तिथे वॉल मार्ट आणि टार्गेट सारखी मोठ्ठी दुकानं आहेत.  पण तरीही गाव लहानच आहे. आजूबाजूला फारसं काही नाही. जवळच्या चिकोपी गावात राखीव सैन्याचा तळ आहे, इतर लहान गावं आणि शेतं आहेत. आम्हांला त्यानी काही फरक पडतो अशातला भाग नाही. आम्ही काही प्रेक्षणिय स्थळं बघायला जाणारे, तिथे जाऊन हौसेनी फोटो काढणारे पर्यटक नाही.

कुठेही - मग ते देशात असो कि परदेशात  - फिरायला गेलं कि आमचा दिनक्रम ठरलेला असतो. सकाळी सावकाश उठायचं. आरामात बसून किमान दोन कप तरी चहा प्यायचा. त्याबरोबर टीव्ही किंवा पेपर वाचन - हे पूर्वी असायचं. आता त्याची जागा इंटरनेट आणि ध्यानानी घेतली आहे. ते झाल्यावर आंघोळ वगैरे करून तयार होईपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ होते. मग एखादं भारतीय रेस्टोरंट शोधायला बाहेर पडायचं. बऱ्याच प्रयत्नां नंतर - अर्धा पाऊण तास वेगवेगळ्या दिशांना फिरल्यावर एखादं कुठेतरी सापडतच. तिथे चिकन करी आणि रोटीचं जेवण झालं कि सहाजिकच डोळ्यावर झोप येते. मग हॉटेलात परत येऊन झोपायच. झोपून उठल्यावर दुपारचा चहा. तो पिऊन तयार होऊन बाहेर पडेस्तोवर पाच वाजतात. बघण्यासारखं सगळं बंद होतं. मग आता एवीतेवी दुसरं काहीच करता येण्यासारखं नाही तर जरा लांबच्या एखादया रेस्टोरंट मध्ये जाऊया म्हणजे जाताना आपुसकच आजूबाजूचा परिसर बघयला मिळेल असं म्हणतं आम्ही रात्रीच्या जेवणासाठी रेस्टोरंट शोधायला बाहेर पडतो. दुसऱ्या दिवशी परत याचं दिनक्रमाची पुनरावृत्ती होते. हे आता ठरून गेलंय.

म्हणून कि बिस्केन आमच्या फार आवडीच पर्यटन स्थळ आहे. फ्लोरिडा मधलं ते एक छोटं बेट आहे. तिथे पाहण्या - करण्या सारखं काही नाही. फक्त मायामी जवळ असल्यामुळे हवं तेंव्हा  - प्रभादेवीहुन सी लिंकनी बांद्र्याला जावं तसं - मायामीला जाता येतं आणि तिथे सुशी पासून सव्हीचे पर्यंत ज्याचा मूड असेल ते जेवता येतं. गंमत म्हणजे खुद्द कि बिस्केन मध्ये समुद्रावरच्या रिट्झ कार्लटन रिझॉर्ट पासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर एक छोटंसं भारतीय रेस्टोरंट आहे. चक्क एका मुंबईच्या माणसाचं. तिथे आम्हांला एकदा एक डोंबिवलीचा वेटर भेटला होता. असं कोणी भेटलं आणि प्रवासात एक -दोन दिवसा आड चिकन करी - रोटी, डाळ - भात वगैरे खायला मिळालं कि आम्हांला आपला प्रवास फार यशस्वी झाला, एवढ्या लांब आलो त्याचं अगदी सार्थक झालं असं वाटतं. कि बिस्केनहुन मायामीला जायच्या - यायच्या रस्त्यावर एक मोठं मत्स्यालय आहे. दर वेळी ते दिसलं कि मला फार चुटपुट वाटते कि आपण इतक्या वेळा त्यावरून जातो पण एकदाही जरा गाडी थांबवून आत जायचे कष्ट कधी घेतले नाहीत. पण घरात म्हणजे गाडीत इतर कोणाला तेव्हढी खंत सुध्दा वाटत नाही.

ऍमहर्स्ट परिसरातही आम्हांला दोन -तीन भारतीय रेस्टोरंट सापडली आणि तिथे आम्ही न चुकता जाऊन हजेरी लावून आलो.   न्यू इंग्लंड मधला उन्हाळा फार सुंदर असतो असं मी खूप ऐकलं होतं. उन्हाळा छान असतो म्हणजे काय तर फार गरम होत नाही पण फार थंडही नसतं आणि सगळीकडे गर्द हिरवी झाडी असते - हे लवकरच लक्षात आलं. आणि घरं जुन्या पद्धतीची असतात. म्हणजे लॉंग आयलंड, न्यूजर्सी मधल्या उपनगरातल्या घरांसारखी सगळी कुकी कटरच्या एकाच साच्यातून काढलेली आहेत असं वाटत नाही. हिरवीगार शेतं, नागमोडी वळणाचे रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी, मधूनच एखादं सुबक घर, लाल रंगाचा तबेला, पांढर लाकडी चर्च आणि आल्हाददायक  हवा - उन्हाळा चांगला नसेल तर नवल.






न्यूयॉर्क आणि बॉस्टन यांच्या मध्ये ऍमहर्स्ट आहे. भोवतालचा सगळा परिसर खेडवळ आहे. तरीही मला वाटलं कि वेळ चांगला जाऊ शकेल. एमिली डिकिन्सनच म्युझियम म्हणून जतन केलेलं जुनं घर ऍमहर्स्ट कॉलेजच्या जवळ आहे. एक दिवस ते बघायचं. थोडं आजूबाजूच्या गावात फिरायचं कि झालं. एवढाच प्लॅन होता. पण दुसऱ्याच दिवशी हायवे वरून जाताना नॉर्थऍम्प्टन गावाचं आणि स्मिथ कॉलेजच एक्झिट दिसलं. ते इतकं अनपेक्षित होतं कि मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझी उत्सुकता पार शिगेला पोहोचली. कधी एकदा ते जाऊन बघते असं झालं. ऍमहर्स्ट पासून नॉर्थऍम्प्टन पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे.

कॉलेज टाऊन्सचं एक वेगळंच वातावरण असतं.  सळसळतं तारूण्य, अनुभवी गुरुजन आणि विदया आणि ज्ञानाची देवाण -घेवाण यांच्या मिश्रणामुळे ते तयार होतं असावं. मग ते प्रिन्स्टन असो, ऑक्सफर्ड असो, बर्कली असो किंवा भर शहरातला कोलंबिया किंवा न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचा परिसर असो. नॉर्थऍम्प्टनही त्याला अपवाद नाही. टुमदार गाव आहे. कॉलेजचं कॅम्पस गावभर पसरलंय. डॉकटर केर-कॉनवेंच्या काळात स्मिथ कॉलेजचा निधी २२० मिलियन डॉलर्स होता. विकिपीडिया नुसार आता तो १. ३९ बिलियन डॉलर्स आहे. कॉलेज बघतिल्यावर त्याची प्रचिती येते. चढ -उतारांच्या रस्त्यांवर विखुरलेली कॉलेजची वेगवेगळी डिपार्टमेंट्स, उंचावरून दिसणारी खालची मैदानं आणि खेळाच्या इतर सुविधा बघितल्या कि ज्या मुलींना अशा कॉलेजात शिकायला मिळतं त्या किती भाग्यवान असं मनात आल्या शिवाय रहात नाही - फक्त न्यू इंग्लंडचा कडक आणि लांबलचक हिंवाळा - न्यूयॉर्क पेक्षाहि कडक आणि लांब  - आणि कॉलेज शिवाय इतर फारसं काही नसलेलं सुनसान गावं सहन करायची तयारी हवी.

शेवटी बघण्यासारखं काही नाही म्हंटल तरी एक दोन ठिकाणं सापडलीच. स्मिथ कॉलेजच स्वतःच छान म्युझियम आहे. जवळचं स्प्रिंगफिल्ड गाव ऐतिहासिक दृष्टया महत्वाचं असल्याने तिथल्या संग्रहालयात जतन केलेले जुन्या वाहनांचे नमुने प्रेक्षणिय आहेत. सुप्रसिद्ध लेखक डॉकटर सुस ज्यांची पुस्तकं अमेरिकेतील बालकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत  - ते मुळचे स्प्रिंगफिल्डचे. म्युझियम मध्ये रूपांतरित केलेलं त्यांचं जुनं घर आणि त्यांच्या पुस्तकांवर आधारलेली बागेतली धातूची शिल्प बघण्यासारखी होती.






हि झाली उन्हाळ्यातली गोष्ट. उन्हाळा संपून फ़ॉल सुरु झाल्यावर २५ ऑकटोबरच्या अंकातलं ओबिच्युएरी पान म्हणजे जणू मृत्युलेखांचा पुष्पगुच्छ होता - विविध प्रकारच्या फुलांनी सजलेला.  अर्ध्याहून अधिक पान व्यापलं होतं ते ओसामु शिमोमीरा यांच्या मृत्यूलेखानी. डॉकटर शिमोमीरा नोबेल पुरस्कार विजेते रसायन शास्त्रज्ञ होते. त्यांनी जेली फिश मधील चकाकणाऱ्या हिरव्या प्रथिनांचा शोध लावला. त्यांचा मृत्यू नागासाकी गावात वयाच्या नव्वदाव्या वर्षी झाला. नागासाकी म्हंटल कि अर्थातच आपल्याला हिरोशिमा आणि नागासाकीचे अणुबॉम्ब हल्ले आठवतात.

ओसामु शिमोमीरांचा जन्म क्योटो शहरात झाला होता. त्यांच्या बालपणात आणि शिक्षणात दुसऱ्या महायुद्धानी बरेचदा व्यत्यय आणला.  त्यांचे वडील जपानी सैन्यात काम करत होते म्हणताना ते आणि त्यांच्या दोन भावंडाना नागासाकी जवळ रहाणाऱ्या त्यांच्या आज्जी -आजोबांच्याकडे  ठेवण्यात आलं. सोळाव्या वर्षी त्यांचं हायस्कुलच शिक्षण पूर्ण झालं  - शाळेत नाही तर एका फॅक्टरीत जिथे त्यांच्या वर्गाला विमानांची इंजिनं दुरुस्त करण्यासाठी पाठवलं होतं. ऑगस्ट ९, १९४५ ला म्हणजे हिरोशिमावर अणुबॉम्ब पडल्या नंतर तीन दिवसांनी त्यांनी एका अमेरिकन बी -२९ विमानातुन दोन -तीन पॅराशूट्स बाहेर पडताना बघितली. थोड्या वेळानी आणखी एक बी -२९ विमान आलं.

डॉकटर शिमोमुरांच्य्या नोबेल आत्मचरित्रात असं म्हंटलय कि दुसरं  बी -२९ विमान बघितल्यावर ते आपल्या कामाच्या स्टूलावर बसले. एक मोठ्ठा प्रकाश झोत छोट्या खिडकीतून आत आला. ३० सेकंद काही दिसेनासं झालं. त्यानंतर ४० सेकंदांनी मोठ्ठा आवाज झाला आणि हवेच्या दबावाची पातळी अचानक बदलली. कुठेतरी मोठा स्फोट झाला हे त्यांचा लक्षात आलं. पण कुठे ते माहित नव्हतं - नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात आला होता.

आकाशात भराभर काळे ढग जमू लागले. डॉकटर शिमोमुरा जेंव्हा फॅक्टरी पासून तीन मैल लांब असलेल्या त्यांच्या घरी चालत जायला निघाले तेंव्हा हलकासा काळा पाऊस पडायला सुरवात झाली होती. घरी पोहोचे पर्यंत त्यांचा पांढरा शर्ट करड्या रंगाचा होऊन गेला. त्यांच्या आज्जीनी चटकन त्यांच्या आंघोळीचं पाणी काढलं. त्या आंघोळी मूळेच ते त्या काळ्या पावसा मधील किरणोत्सर्गाच्या दुष्परिणामांपासून बचावले असावेत असं डॉकटर शिमोमुरांचं मत होतं.

अणुबॉम्ब हल्ला प्रत्यक्ष अनुभवलेल्या व्यक्तीने केलेलं त्याच वर्णन वाचल्यावर सुन्न मनानी पानावरुन नजर फिरवली तर खालच्या डाव्या कोपऱ्यात बातमी होती ती ग्रीन बीन कॅसरोल या लोकप्रिय पाककृतीच्या क्रियेत्या डोरकस रायली यांच्या मृत्यूची. रायली यांनी १९५५ मध्ये कॅम्पबेल कंपनीच्या होम इकनॉमिक्स डिपार्टमेंट मध्ये काम करत असताना ती पाककृती तयार केली. कॅम्पबेलच क्रीम ऑफ मश्रुम सूप, शिजवलेली  फरसबी, थोडंसं दुध  सॉय सॉस, मिरपूड आणि वरून भुरभुरलेला कुरकुरीत तळलेला कांदा हे साहित्य एकत्र करून त्यांनी तो पदार्थ तयार केला होता. सुरवातीला त्याचं नाव ग्रीन बीन बेक असं होतं. तो पदार्थ ५० च्या दशकात अमेरिकन कुटुंबामध्ये इतका लोकप्रिय झाला कि अनेक लोकांच्या बालपणाच्या आठवणी त्याच्याशी निगडित आहेत. किचकट कृती आणि ताजे साहित्य वापरून पदार्थं बनवायची पध्दत आता आली असली तरीही थॅंक्सगिव्हिंगच्या सणाला २० मिलियन घरांमध्ये ग्रीन बीन कॅसरोल आजही  केला जातो. 

कामानी अन्नपूर्णा असलेल्या डोरकस रायलींच्या मृत्युलेखा शेजारी,  उजव्या हाताच्या कोपऱ्यात होती अन्नपूर्णा देवींच्या  निधनाची बातमी. पंडित रविशंकरांच्या त्या प्रथम पत्नी आणि त्यांचे गुरु उस्ताद अल्लाउद्दीन खान यांच्या कन्या. जन्मानी त्या रोशन आरा. त्यांच्या गावच्या महाराजांनी त्यांचं नाव अन्नपूर्णादेवी ठेवलं.  त्या  पंधरा वर्षांच्या असताना त्यांचं लग्न पंडित रविशंकर यांच्याबरोबर करून देण्यात आलं. थोडंसं गूढ, अनाकलनीय व्यक्तीमत्व होतं त्यांचं. त्या सुरबहार वादनात पारंगत होत्या. पंडित रविशंकर यांच्या सितार वादना पेक्षाही श्रोत्यांना त्यांचं वादन जास्त आवडत असे असं त्यांनी एकदा म्हंटल होतं. पण लग्नानंतर सुरवातीच्या काळात पंडित रविशंकरांच्या बरोबर केलेले  काही कार्यक्रम वगळता अन्नपूर्णा देवींनी फारसे जाहीर कार्यक्रम केले नाहीत. त्या एकांत प्रिय होत्या. साठच्या दशकात त्यांनी कार्यक्रम करणं आणि मुलाखती देणं पूर्ण थांबवलं. त्यानंतर त्यांची संगीत साधना चालू राहिली ती त्यांच्या शिष्यांमधून.

१९७३ साली आलेला जया आणि अमिताभ बच्चन यांचा अभिमान हा सिनेमा अन्नपूर्णा देवी आणि पंडित रविशंकर यांचं लग्न आणि त्यातील ताणतणावांवर बेतलेला आहे असं म्हंटल जात असं त्या मृत्युलेखात म्हंटलं होतं.  तरी मी सुरवातीलाच म्हंटल कि या मृत्युलेखांपासून आपल्या सामान्य ज्ञानात बरीच भर पडू शकते.





                                              






yesheeandmommy.blogspot.com 















या पोस्ट वरून एक जुना विनोद आठवला. मुंबईच्या एका इंग्रजी पेपरात खूप पूर्वी वाचला होता. तो मी पुन्हा पुन्हा रिसायकल / रियुज करते. इथेही केल्याशिवाय रहावत नाही: इंग्लड मधल्या एका छोट्या गावात मिसेस पटेल तिथल्या स्थानिक वर्तमानपत्राच्या ऑफिसला फोन करते.  म्हणते, "मिस्टर पटेलांच्या मृत्यूची अनाऊंन्समेंट छापायची आहे . केवढ्याला पडेल."  पलीकडून माणूस म्हणतो,  "पाच शब्दांना पाच पौंड."  मिसेस पटेल म्हणते, "दोन पौंडांत पटेल गेले असं छापा ना."  तो म्हणतो, "कमीत कमी पाच पौंड , पाच शब्द."  मिसेस पटेल म्हणते,  "बरं तर मग छापा - पटेल गेले. व्होल्वो विकायची  आहे."

Tuesday, January 1, 2019

टेस्लात पेट्रोल


सकाळी सकाळी ग्रुप चॅट मध्ये मेसेज आला. आई, वडील, मुलगा तिघांचा ग्रुप. दिवसभर संपर्कात रहायला उपयोगी पडतो. पण त्याचा वापर तेवढाच मर्यादित कधी रहात नाही. दिवसाची सुरवात खेळकर हसण्याने व्हावी म्हणून बाबांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आईनी व्हिडीओ बघितला. त्यात हसण्या सारखं काही आहे असं तिला वाटलं नाही.

व्हिडीओ मध्ये एक सोनेरी केसांची तरुणी पेट्रोल पंपवर उभी होती, आपल्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी. तिच्या मागे रांगेत दुसरी गाडी उभी होती. ती मुलगी आपल्या गाडीच्या अवती भोवती फिरून खालती, वरती, मागे, पुढे पेट्रोल भरायची जागा शोधत होती. मागच्या गाडीतले लोक ते बघून चेष्टेनी खदखदा हसत होते आणि तिची व्हिडीओ काढत होते.  आईनी व्हिडीओ बंद केली. तिला पुढे बघावंसं वाटलं नाही. दुसऱ्यांची फजिती झालेली बघायला तिला आवडत नाही.

व्हिडीओतली गाडी टेस्ला होती जी विजेवर चालते. तिची बॅटरी चार्ज करावी लागते. तिच्यात पेट्रोल भरायचं नसतं.

व्हिडीओ बघून मुलाचा मेसेज आला, "हे खूप फनी आहे."

आईला वाटलं मुलाला चुकीच्या गोष्टीत विनोद दिसतोय. त्याला योग्य मार्गदर्शन करणं आपलं कर्तव्य आहे. तिनं तातडीनं चॅट मध्ये लिहिलं,  " हि अत्यंत चुकीची आणि उद्धट व्हिडीओ आहे. गाडीतून उतरून त्या मुलीला मदत करण्या ऐवजी मागच्या गाडीतले लोक तिला हसतायत, तिची  व्हिडीओ काढतायत आणि ती इंटरनेटवर पोस्टही करतायत. काय अधिकार त्यांना असं करण्याचा. अशा लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे".

"समजा उद्या तुम्ही रस्त्यात केळ्याच्या सालीवर पाय घसरून पडलात आणि तुम्हांला उठायला मदत करण्या ऐवजी लोक तुमच्या जवळ उभे राहून हसत बसले आणि तुमची व्हिडीओ काढत बसले तर तुम्हांला कसं वाटेल".

त्यावर वडिलांच तात्काळ उत्तर आलं. आपले पूर्वग्रह कधीकधी आपल्या नकळत व्यक्त होत असतात, ""कबूल. पण त्या बाईच्या जागी एखादा पुरुष असता तरीही ती व्हिडीओ तितकीच विनोदी वाटली असती. "

मुलानी वडिलांना दुजोरा दिला. "फारच फनी आहे व्हिडीओ".

वडील खुश. लगेच उपदेशपर संदेश पाठवला, " अधून मधून असं दणकून हसणं गरजेचं असतं. मग ते सामाजिक दृष्ट्या योग्य असो किंवा नसो. बरोबर असो किंवा नसो. त्यामुळे मनावरचा ताण हलका होतो. डोक्यावरचं ओझं कमी होतं."

आईला वाटलं  मुलाला आणखी पुष्कळ मार्गदर्शनाची गरज आहे. तिनं लिहिलं, " या ठिकाणी बाई किंवा पुरुष असण्याचा प्रश्नच उदभवत नाही. सगळेच लोक गेंड्याच्या कातडीचे नसतात. काहींना, मग तो पुरुष असो किंवा स्त्री सार्वजनिक फजिती फार झोंबते. ते स्वतःलाच त्रास करून घेतात. त्यातून बाहेर पडणं त्यांना जमत नाही. सार्वजनिक फजिती, पब्लिक शेमिंग सहन न  झाल्यामुळे लोकांनीं आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणं आहेत. केवळ तुमच्या हातात कॅमेरा आहे आणि व्हिडीओ काढणं आता सोप्प झालंय म्हणून दुसऱ्या कोणाची तरी त्यांच्या नकळत व्हिडीओ काढण्याचा आणि ती इंटरनेटवर पोस्ट करण्याचा तुम्हाला काय अधिकार. त्या मुलींनी खरतर त्या व्हिडीओ काढणाऱ्या लोकांनां कोर्टात खेचायला हवं. "

"दुसरं म्हणजे ती व्हिडीओ खोटीही असू शकते. थोडासा विचार केला तर मनात प्रश्न येतो कि हे शक्य तरी आहे का?  ती गाडी त्या मुलीची स्वतःची होती कि ती दुसऱ्या कोणाची तरी गाडी चालवत होती. जर स्वतःची असेल तर हे निव्वळ अशक्य आहे कि तिला कल्पना नव्हती कि तिनं कुठली गाडी विकत घेतलीय. गाडी जर दुसऱ्या कोणाची असेल किंवा जरी रेंटल कार असली तरीही हे फार अशक्य वाटतं कि तिला माहित नसावं कि ती कुठली गाडी चालवते आहे."

त्यावर वडिलांचं इतक्या लगेच उत्तर आलं कि आईला प्रश्न पडला, आपण संदेश पाठवला कधी, तो पलिकडे पोहोचला कधी, त्यानी उत्तर टाईप कधी केलं आणि ते आपल्या पर्यंत एवढ्या कमी वेळात येऊन पोहोचलं तरी कसं. "त्या मुलीच्या केसांमुळे असं झालं असेल",  सोनेरी केसांच्या व्यक्तींच्या बाबतीत जुन्या जमान्यात प्रचलित असलेला पूर्वग्रहदूषित विनोद कधितरी कानावर पडलेल्या वडिलांनी लिहिलेलं होतं.

आपण काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली की त्यावर लगेच तिरकस उत्तर येणारच, जे लोक कायम प्रत्युत्तर देण्यातच धन्यता मानतात त्यांच्या नादी काय लागायचं असं म्हणत आईनी फोन बाजूला ठेवला. थोडा वेळ शांततेत गेला. कुठूनच काही मेसेज आला नाही. आता हे दोघे नेहमी प्रमाणे एकमेकांना लांबच्या लांब मेसेजेस पाठवत फालतू विषयावर वाद घालत बसणार, असं म्हणत मुलानं चॅट मधून अंग काढून घेतलं कि काय अशी शंका तिच्या मनाला चाटून गेली.

तिनं कामात लक्ष घालायचं ठरवलं. तरीही फार पूर्वी शेजारच्या घरात घडलेला प्रसंग मनात डोकावलाच. तिच्या माहेरी शेजारच्या घरात एक मध्यम वयीन जोडपं रहात असे. दोघेच घरात. मुलं कुठेतरी दुसऱ्या गावात होती. एकदा सुट्टीच्या दिवशी बायको सकाळी लवकर उठली. तिनं चहा केला. आपला आणि नवऱ्याचाही. तो उशिरा उठला. उठल्यावर त्यानी चहा मागितला. तिनं करून ठेवलेला चहा गरम करून आणून दिला. नवरा म्हणाला, "ताजा चहा दे".  ती म्हणाली,  "आधी हा संपव मग बघू. मी केलेला चहा वाया घालवणार नाही". तो म्हणाला , "शिळा चहा मला आवडत नाही तुला माहित आहे मग तू चहा करून ठेवलासच का"?  यावर दोघांनी अख्खी सकाळ चहा साठी माणूस कि माणसासाठी चहा या विषयाची चर्चा करण्यात घालवली.

तिला भीती वाटली आपलंही तसंच होतय कि काय. फोन हाता वेगळा केला तरी विचार थांबायचं नाव घेत नव्हते. ती व्हिडिओ डोक्यातून जात नव्हती. विचार चक्र फिरतच राहिलं:

काही वर्षांपूर्वी वाचलेली एक दुर्घटना तिला आठवली. अमेरिकेत एका मुलाने आपल्या डॉर्म रूम मध्ये कम्प्युटरचा कॅमेरा चालू ठेऊन त्याचा गे रूममेट त्याच्या मित्राबरोबर एकांतात असताना त्याला रेकॉर्ड केलं. ती व्हिडीओ इतर मित्रांना दाखवली. त्या मुलाला मित्रांमधली आपली चेष्टा सहन झाली नाही. त्यानं नदीत उडी टाकून आत्महत्या केली.

तेवढ्यात मुलाचा मेसेज आला,  " फेकच असावी ती व्हिडीओ". 

हुश्श, थोडीतरी मुलाला आपली बाजू पटली:

आपल्या चॅनलला भेट देणाऱ्या दर्शकांची संख्या वाढावी म्हणून लोक आजकाल काय वाट्टेल ते कंटेंट असलेले व्हिडीओ पोस्ट करत असतात. त्यातलाच हा प्रकार तर नसेल.  आई - वडील आपल्या लहान बाळांना लिंबू चोखायला लावून त्यांचा आंबट चेहरा कॅमेऱ्यात पकडतात आणि क्यूट बेबी व्हिडीओ च्या नावाखाली पोस्ट करतात.  त्याला अनेक लाईक्सही मिळतात. क्यूट बेबी बघून दर्शक इतके हुरळून जातात कि तुमचं मूल लिंबू चोखत होतं, पडत होतं, रडत होतं तेंव्हा तुम्ही कॅमेरा घेऊन सज्ज होता कि काय असा प्रश्न विचारायचंही त्यांच्या मनात येत नाही.  काही व्हलॉगर्स,  डेली व्हलॉग च्या नावाखाली सकाळी उठल्या उठल्या बाथरूम मध्ये कॅमेरा लावून आपण दात घासतानाच चित्रिकरण करतात. आपल्या दर्शकांना आपण दात घासताना बघायला आवडेल असं त्यांना का वाटतं असावं?

पूर्वी मुलगी जरा जास्त वेळ आरशात बघतेय अशी शंका जरी आईच्या मनात आली तरी आई ओरडायची, सारखं आरशात बघू नकोस म्हणून. आता या लग्न झालेल्या, मुलं असलेल्या व्हलॉगर महिला कॅमेऱ्या समोर उभं राहून आपलं रूप न्याहाळत बसतात, ते रेकॉर्ड करतात- दर्शकांना दाखवायला. 

काहीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही, त्या व्हिडीओचा विषय आता बस झाला असं ठरवलं तरी मेंदू आपलं काम करतच रहातो. कधितरी सोशल मिडीयावर एका मैत्रिणींनी दुसऱ्या मैत्रिणीला विचारलेला प्रश्न तिला आठवला. फेसबुक वरची व्हिडीओ पाहून एका मैत्रिणींनी ती व्हिडीओ पोस्ट केलेल्या मैत्रिणीला विचारलं होतं, "तू काय शोधत होतीस तेंव्हा तुला हि व्हिडीओ सापडली"?

चॅट मध्ये हा सवाल टाकला तर सरळ उत्तर मिळणार नाही याची खात्री होती आणि सारखं मेसेज टाईप करायचाही तिला कंटाळा आला,  मग तिनं  स्वतःलाच विचारलं, सकाळी सकाळी तो शोधत काय होता, तेंव्हा त्याला हि व्हिडीओ सापडली?.

मेंदू प्रश्न विचारतो आणि उत्तरही बिचारा स्वतःच शोधतो. वरवरच्या विचारांची बरीच उलथापालथ करून तो आतून एक उत्तर घेऊन येतो नी म्हणातो  -  ही एक शक्यता आहे, पटतेय का बघ.  गेले काही महिने अधून मधून टेस्ला ... टेस्ला तिच्या कानावर पडलं होतं. तिकडे फारसं लक्ष न देता तिनं  ते एका कानानी ऐकून दुसऱ्या कानानी सोडून दिलं.  आत्ता कुठे त्याचा संदर्भ लागला. सध्याची गाडी बदलायची वेळ झालेली दिसते -  ती मनाशी म्हणाली.

तिला गाड्यांचं कौतुक नव्हती. बी एम डब्ल्यू काय, पोर्शा काय, मारुती काय तिला सगळ्या सारख्याच वाटायच्या. तिच्या आवडीच्या गाड्या मोठ्ठया भारी. चालका सहीत येणाऱ्या. जिथे जायचं तिथे पोहचवु शकल्या नाहीत तरी शक्य तिथ पर्यंत घेऊन जातात. म्हणतात, मी जरा दुसरीकडे चाललेय, पण चार पावलं चाललीस की माझी बहीण भेटेल. ती घेऊन जाईल तुला जिथे जायचंय तिथे. जाता जाता सहज आयुष्याचे मोठे धडेहि शिकवून जातात. पेशन्स म्हणा, सहानभूती म्हणा. व्हील चेअर, वॉकर घेतलेले सहप्रवासी बघितले कि सहानभूती नाही वाटणार तर काय होईल.

सहानभूती वरून तिला काही दिवसांपूर्वी अटेंड केलेल्या मेडिटेशन वर्कशॉपची आठवण झाली. बरोब्बर उत्तर सापडलं मगाच्या मेसेजला, पाठवावं का? तिची बोटं शिवशिवली. ग्रुप चॅट मध्ये शब्द उमटले  - "compassion meditation करण्यासाठी आजचा दिवस फार उत्तम आहे. व्हिडिओतील त्या स्त्रीला आपल्या ध्यानात आणावं. तिच्या फजितीला हसल्याबद्दल तिची मनोमन माफी मागावी. तिच्या बद्दलच्या सदिच्छा ब्रह्मांडात विलीन कराव्यात. ती व्हिडीओ पोस्ट करणाऱ्यांना सदबुद्धी मिळावी म्हणून प्रार्थना करावी".

ती संदेश पाठवते न पाठवते तोच मुलाचं उत्तर आलं, " मी तुम्हांला दोघांनाही ब्लॉक करतोय".
            
                                                                      ******

नेहमी प्रमाणे दुसरा दिवस उजाडला.  दूर क्षितिजा पर्यंत पसरलेल्या उंच इमारतींच्या सुळक्यां मागून सूर्य नारायण डोकं वर काढत होता. सुंदर रम्य सकाळ. हिंवाळा सुरु व्हायला थोडा अवकाश असला तरी खूप थंडी. पण इतकीही नाही की बाहेर पडूच नये असं वाटावं.

सकाळची गडबड. निघायला उशीर झालाय असं घड्याळ दाखवत असलं तरी नाहीच उशीर झालेला असं म्हणत घरा बाहेर पडायचं. लिफ्टच बटण दाबायचं. ती पटकन येते. दार उघडतं. आत पाऊल ठेवणार इतक्यात लक्षात येतं काहीतरी विसरलो - फोन, पेपर, स्कार्फ, ग्लव्ज, छत्री काहीही. लिफ्ट इतक्या चट्कन आली म्हणजे आता आपल्या साठी थोडावेळ थांबेल, किंवा येईल पुन्हा लगेच असं वाटतं. पण लिफ्टला आपली पर्वा नसते. घरात जाऊन विसरलेली वस्तू घेऊन येई पर्यंत ती निघून जाते. मग पुन्हा बटण दाबायचं. आत मात्र ती लगेच येत नाही. वेळ लावते. पुष्कळ वेळ लावते. इतका वेळ लावते की नेहमीची बस निघून जाते. आता ट्रेननी जावं लागणार.

थोड्याच वेळात ग्रुप मध्ये मेसेज आला. आज व्हिडीओच्या ऐवजी फोटो होता. भारतात साजऱ्या झालेल्या श्रीमंतांच्या फिल्मी विवाह सोहोळ्यावर कोणीतरी सोशल मीडियामध्ये खवचट टिप्पणी केली होती  त्या टिप्पणीचा फोटो. तिला वाटलं, राजदरबारी गुणी कलावंतांना राजाश्रय देण्याची परंपरा भारतात फार पूर्वी पासून आहे. फरक इतकाच कि राजघराण्यातील लोकांनी त्या कलाकारां प्रमाणे मंचावर नाचगाणं सादर करण्याची पध्दत तेंव्हा नव्हती. आताची हि नवीन पद्धत. लग्नातलं नाचवणं न रुचल्याने कोणीतरी त्यावर विनोद केला होता.

तिनं उत्तरा दाखल एक इमोजी टाकून दिली. पण विचार चक्राला दुसऱ्या दिवशीही उसंत नव्हती : 

एक जमाना होता जेंव्हा हृषीकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी सारखी मंडळी सिनेमा बनवायची. सिनेमा तेंव्हा साधा, आपल्या आयुष्याशी जुळणारा वाटायचा. आता जोहर - चोप्रांच्या जमान्यात हिंदी सिनेमा नुसतातच भडक, भपकेबाज, बडेजावी झालेला दिसतो. श्रीमंतांच्या मनावर त्याचा जर एवढा जदरदस्त पगडा असेल तर श्रीमंतांचं अनुकरण करू पहाणाऱ्या सर्वसामान्य जनतेचं काय.  शहर , संस्कृती सगळंच फिल्मी, भडक, भपकेबाज, बडेजावी झालंय कि काय ...  आणि ...भारतापासून दूर परदेशात जन्मलेला, राहणारा मुलगा सकाळच्या गडबडीत असं काय बघत होता तेंव्हा त्याला हा फोटो सापडला असेल...

                                  


                                       
                                                             




yesheeandmommy.blogspot.com