सकाळी सकाळी ग्रुप चॅट मध्ये मेसेज आला. आई, वडील, मुलगा तिघांचा ग्रुप. दिवसभर संपर्कात रहायला उपयोगी पडतो. पण त्याचा वापर तेवढाच मर्यादित कधी रहात नाही. दिवसाची सुरवात खेळकर हसण्याने व्हावी म्हणून बाबांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आईनी व्हिडीओ बघितला. त्यात हसण्या सारखं काही आहे असं तिला वाटलं नाही.
व्हिडीओ मध्ये एक सोनेरी केसांची तरुणी पेट्रोल पंपवर उभी होती, आपल्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी. तिच्या मागे रांगेत दुसरी गाडी उभी होती. ती मुलगी आपल्या गाडीच्या अवती भोवती फिरून खालती, वरती, मागे, पुढे पेट्रोल भरायची जागा शोधत होती. मागच्या गाडीतले लोक ते बघून चेष्टेनी खदखदा हसत होते आणि तिची व्हिडीओ काढत होते. आईनी व्हिडीओ बंद केली. तिला पुढे बघावंसं वाटलं नाही. दुसऱ्यांची फजिती झालेली बघायला तिला आवडत नाही.
व्हिडीओतली गाडी टेस्ला होती जी विजेवर चालते. तिची बॅटरी चार्ज करावी लागते. तिच्यात पेट्रोल भरायचं नसतं.
व्हिडीओ बघून मुलाचा मेसेज आला, "हे खूप फनी आहे."
आईला वाटलं मुलाला चुकीच्या गोष्टीत विनोद दिसतोय. त्याला योग्य मार्गदर्शन करणं आपलं कर्तव्य आहे. तिनं तातडीनं चॅट मध्ये लिहिलं, " हि अत्यंत चुकीची आणि उद्धट व्हिडीओ आहे. गाडीतून उतरून त्या मुलीला मदत करण्या ऐवजी मागच्या गाडीतले लोक तिला हसतायत, तिची व्हिडीओ काढतायत आणि ती इंटरनेटवर पोस्टही करतायत. काय अधिकार त्यांना असं करण्याचा. अशा लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे".
"समजा उद्या तुम्ही रस्त्यात केळ्याच्या सालीवर पाय घसरून पडलात आणि तुम्हांला उठायला मदत करण्या ऐवजी लोक तुमच्या जवळ उभे राहून हसत बसले आणि तुमची व्हिडीओ काढत बसले तर तुम्हांला कसं वाटेल".
त्यावर वडिलांच तात्काळ उत्तर आलं. आपले पूर्वग्रह कधीकधी आपल्या नकळत व्यक्त होत असतात, ""कबूल. पण त्या बाईच्या जागी एखादा पुरुष असता तरीही ती व्हिडीओ तितकीच विनोदी वाटली असती. "
मुलानी वडिलांना दुजोरा दिला. "फारच फनी आहे व्हिडीओ".
वडील खुश. लगेच उपदेशपर संदेश पाठवला, " अधून मधून असं दणकून हसणं गरजेचं असतं. मग ते सामाजिक दृष्ट्या योग्य असो किंवा नसो. बरोबर असो किंवा नसो. त्यामुळे मनावरचा ताण हलका होतो. डोक्यावरचं ओझं कमी होतं."
आईला वाटलं मुलाला आणखी पुष्कळ मार्गदर्शनाची गरज आहे. तिनं लिहिलं, " या ठिकाणी बाई किंवा पुरुष असण्याचा प्रश्नच उदभवत नाही. सगळेच लोक गेंड्याच्या कातडीचे नसतात. काहींना, मग तो पुरुष असो किंवा स्त्री सार्वजनिक फजिती फार झोंबते. ते स्वतःलाच त्रास करून घेतात. त्यातून बाहेर पडणं त्यांना जमत नाही. सार्वजनिक फजिती, पब्लिक शेमिंग सहन न झाल्यामुळे लोकांनीं आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणं आहेत. केवळ तुमच्या हातात कॅमेरा आहे आणि व्हिडीओ काढणं आता सोप्प झालंय म्हणून दुसऱ्या कोणाची तरी त्यांच्या नकळत व्हिडीओ काढण्याचा आणि ती इंटरनेटवर पोस्ट करण्याचा तुम्हाला काय अधिकार. त्या मुलींनी खरतर त्या व्हिडीओ काढणाऱ्या लोकांनां कोर्टात खेचायला हवं. "
"दुसरं म्हणजे ती व्हिडीओ खोटीही असू शकते. थोडासा विचार केला तर मनात प्रश्न येतो कि हे शक्य तरी आहे का? ती गाडी त्या मुलीची स्वतःची होती कि ती दुसऱ्या कोणाची तरी गाडी चालवत होती. जर स्वतःची असेल तर हे निव्वळ अशक्य आहे कि तिला कल्पना नव्हती कि तिनं कुठली गाडी विकत घेतलीय. गाडी जर दुसऱ्या कोणाची असेल किंवा जरी रेंटल कार असली तरीही हे फार अशक्य वाटतं कि तिला माहित नसावं कि ती कुठली गाडी चालवते आहे."
त्यावर वडिलांचं इतक्या लगेच उत्तर आलं कि आईला प्रश्न पडला, आपण संदेश पाठवला कधी, तो पलिकडे पोहोचला कधी, त्यानी उत्तर टाईप कधी केलं आणि ते आपल्या पर्यंत एवढ्या कमी वेळात येऊन पोहोचलं तरी कसं. "त्या मुलीच्या केसांमुळे असं झालं असेल", सोनेरी केसांच्या व्यक्तींच्या बाबतीत जुन्या जमान्यात प्रचलित असलेला पूर्वग्रहदूषित विनोद कधितरी कानावर पडलेल्या वडिलांनी लिहिलेलं होतं.
आपण काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली की त्यावर लगेच तिरकस उत्तर येणारच, जे लोक कायम प्रत्युत्तर देण्यातच धन्यता मानतात त्यांच्या नादी काय लागायचं असं म्हणत आईनी फोन बाजूला ठेवला. थोडा वेळ शांततेत गेला. कुठूनच काही मेसेज आला नाही. आता हे दोघे नेहमी प्रमाणे एकमेकांना लांबच्या लांब मेसेजेस पाठवत फालतू विषयावर वाद घालत बसणार, असं म्हणत मुलानं चॅट मधून अंग काढून घेतलं कि काय अशी शंका तिच्या मनाला चाटून गेली.
तिनं कामात लक्ष घालायचं ठरवलं. तरीही फार पूर्वी शेजारच्या घरात घडलेला प्रसंग मनात डोकावलाच. तिच्या माहेरी शेजारच्या घरात एक मध्यम वयीन जोडपं रहात असे. दोघेच घरात. मुलं कुठेतरी दुसऱ्या गावात होती. एकदा सुट्टीच्या दिवशी बायको सकाळी लवकर उठली. तिनं चहा केला. आपला आणि नवऱ्याचाही. तो उशिरा उठला. उठल्यावर त्यानी चहा मागितला. तिनं करून ठेवलेला चहा गरम करून आणून दिला. नवरा म्हणाला, "ताजा चहा दे". ती म्हणाली, "आधी हा संपव मग बघू. मी केलेला चहा वाया घालवणार नाही". तो म्हणाला , "शिळा चहा मला आवडत नाही तुला माहित आहे मग तू चहा करून ठेवलासच का"? यावर दोघांनी अख्खी सकाळ चहा साठी माणूस कि माणसासाठी चहा या विषयाची चर्चा करण्यात घालवली.
तिला भीती वाटली आपलंही तसंच होतय कि काय. फोन हाता वेगळा केला तरी विचार थांबायचं नाव घेत नव्हते. ती व्हिडिओ डोक्यातून जात नव्हती. विचार चक्र फिरतच राहिलं:
काही वर्षांपूर्वी वाचलेली एक दुर्घटना तिला आठवली. अमेरिकेत एका मुलाने आपल्या डॉर्म रूम मध्ये कम्प्युटरचा कॅमेरा चालू ठेऊन त्याचा गे रूममेट त्याच्या मित्राबरोबर एकांतात असताना त्याला रेकॉर्ड केलं. ती व्हिडीओ इतर मित्रांना दाखवली. त्या मुलाला मित्रांमधली आपली चेष्टा सहन झाली नाही. त्यानं नदीत उडी टाकून आत्महत्या केली.
तेवढ्यात मुलाचा मेसेज आला, " फेकच असावी ती व्हिडीओ".
हुश्श, थोडीतरी मुलाला आपली बाजू पटली:
आपल्या चॅनलला भेट देणाऱ्या दर्शकांची संख्या वाढावी म्हणून लोक आजकाल काय वाट्टेल ते कंटेंट असलेले व्हिडीओ पोस्ट करत असतात. त्यातलाच हा प्रकार तर नसेल. आई - वडील आपल्या लहान बाळांना लिंबू चोखायला लावून त्यांचा आंबट चेहरा कॅमेऱ्यात पकडतात आणि क्यूट बेबी व्हिडीओ च्या नावाखाली पोस्ट करतात. त्याला अनेक लाईक्सही मिळतात. क्यूट बेबी बघून दर्शक इतके हुरळून जातात कि तुमचं मूल लिंबू चोखत होतं, पडत होतं, रडत होतं तेंव्हा तुम्ही कॅमेरा घेऊन सज्ज होता कि काय असा प्रश्न विचारायचंही त्यांच्या मनात येत नाही. काही व्हलॉगर्स, डेली व्हलॉग च्या नावाखाली सकाळी उठल्या उठल्या बाथरूम मध्ये कॅमेरा लावून आपण दात घासतानाच चित्रिकरण करतात. आपल्या दर्शकांना आपण दात घासताना बघायला आवडेल असं त्यांना का वाटतं असावं?
पूर्वी मुलगी जरा जास्त वेळ आरशात बघतेय अशी शंका जरी आईच्या मनात आली तरी आई ओरडायची, सारखं आरशात बघू नकोस म्हणून. आता या लग्न झालेल्या, मुलं असलेल्या व्हलॉगर महिला कॅमेऱ्या समोर उभं राहून आपलं रूप न्याहाळत बसतात, ते रेकॉर्ड करतात- दर्शकांना दाखवायला.
काहीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही, त्या व्हिडीओचा विषय आता बस झाला असं ठरवलं तरी मेंदू आपलं काम करतच रहातो. कधितरी सोशल मिडीयावर एका मैत्रिणींनी दुसऱ्या मैत्रिणीला विचारलेला प्रश्न तिला आठवला. फेसबुक वरची व्हिडीओ पाहून एका मैत्रिणींनी ती व्हिडीओ पोस्ट केलेल्या मैत्रिणीला विचारलं होतं, "तू काय शोधत होतीस तेंव्हा तुला हि व्हिडीओ सापडली"?
चॅट मध्ये हा सवाल टाकला तर सरळ उत्तर मिळणार नाही याची खात्री होती आणि सारखं मेसेज टाईप करायचाही तिला कंटाळा आला, मग तिनं स्वतःलाच विचारलं, सकाळी सकाळी तो शोधत काय होता, तेंव्हा त्याला हि व्हिडीओ सापडली?.
मेंदू प्रश्न विचारतो आणि उत्तरही बिचारा स्वतःच शोधतो. वरवरच्या विचारांची बरीच उलथापालथ करून तो आतून एक उत्तर घेऊन येतो नी म्हणातो - ही एक शक्यता आहे, पटतेय का बघ. गेले काही महिने अधून मधून टेस्ला ... टेस्ला तिच्या कानावर पडलं होतं. तिकडे फारसं लक्ष न देता तिनं ते एका कानानी ऐकून दुसऱ्या कानानी सोडून दिलं. आत्ता कुठे त्याचा संदर्भ लागला. सध्याची गाडी बदलायची वेळ झालेली दिसते - ती मनाशी म्हणाली.
तिला गाड्यांचं कौतुक नव्हती. बी एम डब्ल्यू काय, पोर्शा काय, मारुती काय तिला सगळ्या सारख्याच वाटायच्या. तिच्या आवडीच्या गाड्या मोठ्ठया भारी. चालका सहीत येणाऱ्या. जिथे जायचं तिथे पोहचवु शकल्या नाहीत तरी शक्य तिथ पर्यंत घेऊन जातात. म्हणतात, मी जरा दुसरीकडे चाललेय, पण चार पावलं चाललीस की माझी बहीण भेटेल. ती घेऊन जाईल तुला जिथे जायचंय तिथे. जाता जाता सहज आयुष्याचे मोठे धडेहि शिकवून जातात. पेशन्स म्हणा, सहानभूती म्हणा. व्हील चेअर, वॉकर घेतलेले सहप्रवासी बघितले कि सहानभूती नाही वाटणार तर काय होईल.
सहानभूती वरून तिला काही दिवसांपूर्वी अटेंड केलेल्या मेडिटेशन वर्कशॉपची आठवण झाली. बरोब्बर उत्तर सापडलं मगाच्या मेसेजला, पाठवावं का? तिची बोटं शिवशिवली. ग्रुप चॅट मध्ये शब्द उमटले - "compassion meditation करण्यासाठी आजचा दिवस फार उत्तम आहे. व्हिडिओतील त्या स्त्रीला आपल्या ध्यानात आणावं. तिच्या फजितीला हसल्याबद्दल तिची मनोमन माफी मागावी. तिच्या बद्दलच्या सदिच्छा ब्रह्मांडात विलीन कराव्यात. ती व्हिडीओ पोस्ट करणाऱ्यांना सदबुद्धी मिळावी म्हणून प्रार्थना करावी".
ती संदेश पाठवते न पाठवते तोच मुलाचं उत्तर आलं, " मी तुम्हांला दोघांनाही ब्लॉक करतोय".
******
नेहमी प्रमाणे दुसरा दिवस उजाडला. दूर क्षितिजा पर्यंत पसरलेल्या उंच इमारतींच्या सुळक्यां मागून सूर्य नारायण डोकं वर काढत होता. सुंदर रम्य सकाळ. हिंवाळा सुरु व्हायला थोडा अवकाश असला तरी खूप थंडी. पण इतकीही नाही की बाहेर पडूच नये असं वाटावं.
सकाळची गडबड. निघायला उशीर झालाय असं घड्याळ दाखवत असलं तरी नाहीच उशीर झालेला असं म्हणत घरा बाहेर पडायचं. लिफ्टच बटण दाबायचं. ती पटकन येते. दार उघडतं. आत पाऊल ठेवणार इतक्यात लक्षात येतं काहीतरी विसरलो - फोन, पेपर, स्कार्फ, ग्लव्ज, छत्री काहीही. लिफ्ट इतक्या चट्कन आली म्हणजे आता आपल्या साठी थोडावेळ थांबेल, किंवा येईल पुन्हा लगेच असं वाटतं. पण लिफ्टला आपली पर्वा नसते. घरात जाऊन विसरलेली वस्तू घेऊन येई पर्यंत ती निघून जाते. मग पुन्हा बटण दाबायचं. आत मात्र ती लगेच येत नाही. वेळ लावते. पुष्कळ वेळ लावते. इतका वेळ लावते की नेहमीची बस निघून जाते. आता ट्रेननी जावं लागणार.
थोड्याच वेळात ग्रुप मध्ये मेसेज आला. आज व्हिडीओच्या ऐवजी फोटो होता. भारतात साजऱ्या झालेल्या श्रीमंतांच्या फिल्मी विवाह सोहोळ्यावर कोणीतरी सोशल मीडियामध्ये खवचट टिप्पणी केली होती त्या टिप्पणीचा फोटो. तिला वाटलं, राजदरबारी गुणी कलावंतांना राजाश्रय देण्याची परंपरा भारतात फार पूर्वी पासून आहे. फरक इतकाच कि राजघराण्यातील लोकांनी त्या कलाकारां प्रमाणे मंचावर नाचगाणं सादर करण्याची पध्दत तेंव्हा नव्हती. आताची हि नवीन पद्धत. लग्नातलं नाचवणं न रुचल्याने कोणीतरी त्यावर विनोद केला होता.
तिनं उत्तरा दाखल एक इमोजी टाकून दिली. पण विचार चक्राला दुसऱ्या दिवशीही उसंत नव्हती :
एक जमाना होता जेंव्हा हृषीकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी सारखी मंडळी सिनेमा बनवायची. सिनेमा तेंव्हा साधा, आपल्या आयुष्याशी जुळणारा वाटायचा. आता जोहर - चोप्रांच्या जमान्यात हिंदी सिनेमा नुसतातच भडक, भपकेबाज, बडेजावी झालेला दिसतो. श्रीमंतांच्या मनावर त्याचा जर एवढा जदरदस्त पगडा असेल तर श्रीमंतांचं अनुकरण करू पहाणाऱ्या सर्वसामान्य जनतेचं काय. शहर , संस्कृती सगळंच फिल्मी, भडक, भपकेबाज, बडेजावी झालंय कि काय ... आणि ...भारतापासून दूर परदेशात जन्मलेला, राहणारा मुलगा सकाळच्या गडबडीत असं काय बघत होता तेंव्हा त्याला हा फोटो सापडला असेल...
yesheeandmommy.blogspot.com |
No comments:
Post a Comment