Friday, December 20, 2019

२०१९ - लेख, कथा आणि गाणी



ह्या वर्षी वाचलेले काही लेख आणि कथा आणि ऐकलेली गाणी:







गुरुवारी माझ्या विशीचं ब्रुकलीन मधल्या तिच्या रहात्या घरी निधन झालं. ती दहा वर्षांची होती .
तिशीत पदार्पण करताना आपल्या गेलेल्या विशीबद्दल लिहिलेला मृत्युलेख.







काही वर्षांपूर्वी माझी बहीण नाहीशी झाली. मी हवं तेंव्हा तिला बघु शकते.
घरातली जवळची व्यक्ती गेल्यावर ती समाज माध्यमांमध्ये जिवंत असण्याचा अनुभव काय असोत  -दुःखद तरीही थोडा दिलासा देणारा  - यावर एका कॉलेज वयीन तरुणीने लिहिलेला लेख.







“Cream,” by Haruki Murakami | The New Yorker


ही कथा मला प्रचंड आवडली. एखाद्या सुंदर गाण्यासाखी वाटली. चांगल्या गाण्याचा आनंद घेण्यासाठी आपल्याला त्या गाण्याचे सगळे शब्द किंवा संपूर्ण अर्थ समजावा लागतोच असं नाही. अर्थाकडे फारसं लक्ष न देताही त्या गाण्यातील भाव अंतर्मनाला भिडु शकतो. तसंच काहीसं या कथेचं आहे. एका मागून एक नेहमीच्या आयुष्यातले तरीही काहीसे गूढ वाटणाऱ्या प्रसांगाचं वर्णन कथेत येत रहातं - मग ते बसमध्ये बसून टेकडीच्या माथ्या पर्यंत पोहोचणं असो, टॆडीवरच्या बागेतल्या बाकावर बसुन खालच्या समुद्राकडे बघणं असो -   ते का लिहिलं असेल, त्याचा उद्देश काय, लेखकाला काय सांगायचंय हयाचा विचार न करताही सोप्या वाक्यरचनेतुन सांगितलेली गोष्ट रागदारीच्या गाण्यातील सुरावटी प्रमाणे आपल्या पुढे उलगडत जाते आणि मनाला गण्या प्रमाणे -ऐकण्याचा नाही पण  वाचण्याचा शांत आनंद देऊन जाते




              
“The Little King,” by Salman Rushdie | The New Yorker
या कथे विषयी मागे एका पोस्ट मध्ये लिहिलं होतं. रश्दींची संवाद लिहिण्याची खास शैली आहे ती नेहमीच गमतीची वाटते. 
              


                              


Wednesday, December 11, 2019

सिनेमातील न -विसरलेले संवाद








काही सिनेमातले संवाद खूप लोकप्रिय होतात. पुन्हा पुन्हा आठवले आणि बोलले जातात. जसं कि दिवार मधला "मेरे पास माँ है ". आणि शोले मधला "अरे ओ सांबा, कितने आदमी थे?" हे संवाद.

तसच हॉलिवूडच्या गॉडफादर या सिनेमातलं, "लीव्ह द गन, टेक द कनोली" आणि अरनॉल्ड श्वात्झनेगरच टर्मिनेटर सिनेमातलं "आय वील बी बॅक" या वाक्यांची पुन्हा पुन्हा आठवण काढली जाते. "आय वील बी बॅक" हे वाक्य रोजच्या आयुष्यात वापरण्याजोगं असल्याने एखादा शाळकरी मुलगा कोपऱ्यावरच्या दुकानातुन कुकीज आणायला निघाला तरी टर्मिनेटर स्टाईल मध्ये आईला "आय वील बी बॅक" असं बजावून घराबाहेर पडू शकतो. आणि लोक आपसात गमतीनं तसं करतातही. या वाक्याचं मराठी रूपांतर मध्यंतरी आपल्याला खूप ऐकायला मिळालं. त्यावरून कोणावर कुठल्या सिनेमाचा आणि हिरोचा किती प्रभाव पडलेला असेल असा संभ्रम निर्माण झाला.

सांस्कृतिक संदर्भांच्या बाहेर अंधानुकरण केलं कि ते हास्यास्पद दिसतं. शिवाय ते वाक्य आपल्या संस्कृतीशी तसं विसंगत आहे. आपण सहसा कधी कुणाला, "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन" असं सुनावत नाही. आपण एखाद्याकडे गेलो, आपल्याला ते ठिकाणं फार आवडलं, पुन्हा तिथे जावंसं वाटलं तर आपण फारतर काय म्हणू - ' फार आवडलं बुवा मला तुमच्या कडे. मला परत बोलवा. मी नक्की येईन'. "आय वील बी बॅक" हा डायलॉग तर नाही ना मारणार आपण भाषांतर करून.

मूळ सिनेमात ते धमकीवजा इशारा देणारं वाक्य आहे. अमेरिकन लोक जेंव्हा गंमत म्हणून श्वात्झनेगर स्टाईल मध्ये "आय वील बी बॅक" हा डायलॉग मारतात तेंव्हा त्यातही खोटाखोटा धमकीवजा सुर असतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी ते वाक्य भाषांतर करून वापरताना खरतर काळजी घ्यायला हवी. शिवाय ते वाक्य कशा अर्थानी, कोणाला उद्देशून म्हंटलं जात होतं हे ही तितकंसं स्पष्ट नव्हतं. म्हणजे आपल्या प्रतिस्पर्धी पक्षांना दिलेली ती धमकी होती, आपल्या मतदारांना दिलेला तो दिलासा होता, स्वतःच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेचं पुन्हापुन्हा मंत्रोच्चारण होतं की ती जनतेला दिलेली धमकी होती? गंम्मत म्हणजे हे सगळं मतदारांच्या जीवावर चाललं होतं.

या आधी बिच्चाऱ्या सर्वसामान्य जनतेचा असा गैरसमज होता की कोण परत येणार आणि कोण नाही हे ठरविण्याचा अधिकार फक्त मतदारांचा आहे. 'मतदान ही घटनेनं तुम्हांला दिलेली फार मोठी ताकद आहे' वगैरे वाक्य मतदारांना नेहमी ऐकवली जातात. एव्हांना त्यांचा तो गैरसमज दूर झाला असेल. गेले काही दिवस अत्यंत असहाय्य, हतबल, हताश होऊन जे काय चाललंय ते निमुटपणे बघत बसण्या शिवाय दुसरं काही करू न शकलेलं जर कुणी असेल तर ते म्हणजे मतदार.

काही उत्साही, आशावादी मंडळींना असं वाटतं कि लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं कि सगळं ठीक होणार. मतदान केलं तरचं आपल्याला हवे ते लोकप्रतिनिधी आपण निवडून आणू शकू. मग ते आपल्याला हव्या त्या सुधारणा घडवून आणतील आणि सगळीकडे आबादी आबाद होईल - अशी त्यांची समजूत असते. म्हणून ही मंडळी माध्यमातून लोकांना सारखं आव्हान करत बसतात कि, "मत द्या, मत द्या, तुमचं मत फुकट घालवू नका" वगैरे. त्यांनी ते आव्हान करू नये असं नाही पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही कि स्वप्नातले राजकुमार किंवा राजकुमारी कोणाला मिळत नाहीत तसंच स्वप्नातले नेतेही मिळत नाहीत.

आयुष्यात तुम्हांला जे हवं असतं ते मिळत नाही- मग ते नवरा असो, बायको असो कि आणखी काही - you don't get what you desire, you get what you deserve - आपल्या लायकी प्रमाणे जे मिळायचं ते मिळतं. लोकप्रतिनिधींचही तसच आहे. ते आकाशातून पडत नाहीत. आपल्यातूनच तयार होतात. आपली जशी लायकी असते तसे लोकप्रतिनिधी आपल्याला मिळतात. आपण आपली लायकी कुठल्या थराला नेऊन ठेवली आहे याची प्रचिती निवडणूकी नंतर अचानक आली आणि सगळेजण एकमेकांकडे बघून आपसात आश्चर्य व्यक्त करू लागले - हे असं कसं झालं?

दुसऱ्या कोणाचीही आणि कशाचीही पर्वा न करता, अत्यंत स्वार्थीपणाने स्वतःची महत्वाकांक्षा पूर्ण करून घेण्याची वृत्ती समाजात बोकाळली कि त्यातून कसे लोकप्रतिनिधी तयार होतात ते आपण बघतोय. आज परिस्थिती अशी आहे कि सकाळी पेपर उघडला आणि कुठलातरी नेता दुसऱ्या नेत्याच्या शेजारच्या खुर्चीत बसलेला आहे असा फोटो बघितला की आपल्या काळजात धस्स होतं - काय खलबतं चालली असतील माहित नाही...सरकार पडतय कि काय असा विचार मानत येतो. दुसऱ्या दिवशी दुसरा एखादा नेता तिसऱ्या नेत्याच्या घरी गेला की पुन्हा आपल्या काळजात धडधड सुरु - सरकार पडतय कि काय. लैला - मजनुनी एकमेकांच्या काळजाची कधी वाढवली नसेल एवढी आपल्या काळजाची धडधड ही तथाकथित नेतेमंडळी नुसतं कोणाच्या तरी शेजारी बसून किंवा कोणाच्या तरी घरी जाऊन वाढवतात. आपली अशी क्रूर कुचेष्टा करण्याचा अधिकार आपण त्यांना कधी, का, आणि कसा दिला माहित नाही. समाज माध्यमात वापरण्यात येणारे अपशब्द तर आता सगळे धरूनच चालतात. त्याबद्दल कोणी विरोध दर्शवतानाही दिसत नाही. राजकाणात हे असच चालतं या नावाखाली आपल्या असुसंस्कृतपणचं समर्थन करण्याचीही गरज कोणाला भासत नाही.






भ्रष्टाचार हा भारतातला एक फार आवडीचा विषय आहे.  भ्रष्ट +आचार = भ्रष्टाचार अशी खरतर ती अगदी साधी सोप्पी शब्दफोड आहे. पण आपण त्याला इतकं कार्यालयीन स्वरूप देऊन ठेवलंय कि जणू भ्रष्टाचार ही मलेरिया सारखी एक सार्वजनिक साथ आहे जिची लागण लोक घराबाहेर पडले कि त्यांना होते. आणि या साथीचं एक खास वेगळेपण असं कि तिची लागण झालेले रुग्ण बाहेरून घरी येताना आपला भ्रष्टाचाराचा मलेरिया अगदी सहजपणे घराबाहेर ठेऊन येउ शकतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कामाला बाहेर पडले कि त्यांना भ्रष्टाचाराची लागण सुरु. परत संध्याकाळी घरी जाताना भ्रष्टाचाराचा मलेरिया घराबाहेर आणि भ्रष्टाचार विरहित माणूस घरात. हे इतकं सहज शक्य होऊ शकतं?

ज्या देशात बाउंड्री फक्त क्रिकेटच्या मैदानातच असते अशी लोकांची ठाम समजुत असावी असं वाटतं, एकूण एक सगळया गोष्टींची एकमेकात सरमिसळ करणं हा जनतेचा स्वभाव धर्म वाटतो त्या देशात फक्त भ्रष्टाचाराच्या बाबतीत एवढं कम्पार्टमेंटलायझेशन शक्य होत असेल असं वाटत नाही. एखादी व्यक्ती घराबाहेर भ्रष्टाचारी पण कौटुंबिक जीवनात त्या व्यक्तीचं चारित्र्य धुतल्या तांदळासारखं स्वच्छ - हे कसं शक्य आहे? आपले संस्कार आणि संस्कृती कुटुंब-केंद्रीत असल्याचा आपण फार अभिमान बाळगतो आणि पश्चिमात्य देश व्यक्ती- केंद्रित आहेत म्हणून त्यांना हिणवतो पण शाळा -शिक्षक -समाज -टीव्ही - सिनेमा याबरोबरच घरातील "संस्कार" जबाबदार असतीलच की  लोकांची घराबाहेरील वर्तणूक ठरवण्यास.

साथीच्या मलेरियाची आणखी एक सोय अशी असते कि सरकारनी येऊन डासांवर फवारा मारल्या खेरीज ती साथ जात नाही. म्हणजे त्यात वैयक्तिक जबाबदारी काही घ्यायची नसते. फक्त फवारा मारायला येणाऱ्यांची वाट बघत बसायचं, बस. अशा या भ्रष्टाचाराच्या साथीचं सोयिस्कर गाणं आपण वर्षानुवर्षे गात आलोय आणि ऐकत आलोय. त्यामुळे साथी हात बढाना सारखी ती साथ पसरतच चालली आहे. कमी व्हायची काही चिन्ह दिसत नाहीत.

तर हा एक प्रवास आहे किंवा धडा आहे असं म्हणूया हवं तर. "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन", आय वील बी बॅक असं म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींना -'प्लीज मला परत बोलवा' असं म्हणायला शिकवण्याचा. गेल्या काही दिवसात मतदारांना जितकं असहाय्य, हतबल, हताश वाटलं तितकं या आधी कधी वाटलं नसेल. ते पुरेसं होतं का कि ज्याची आठवणही पुन्हा नको असं म्हणत काही बदल घडून येतील. शक्यता कमी वाटतेय.

या सगळ्या राजकीय अंदाधुंदीत मधाचं बोट जर काही असेल तर ते म्हणजे रश्मी ठाकरेंचा वर्षातील गृहप्रवेश. त्यांच्याकडून काही वेगळ्या अपेक्षा आहेत. महाराष्ट्राच्या निवासस्थानात रहाणं सोप्प काम नाही. मुंबई नावाच्या महाअजगराच्या विळख्यातलं ते सिंहासन आहे. हे मी त्यांना सांगण्याची गरज नाही. तरीही सर्वप्रथम त्यांना एक प्रेमाचा सल्ला: चिरंजीव अदित्य आता लग्नाळू झालेला आहे. उद्या समजा त्याचं लग्न ठरलं तर राज्यासाठी एक काम करा. सौ नीताताईंच्या प्रमाणे आपल्या मुलाच्या लग्नात स्टेजवर जाऊन रेकॉर्ड डान्स करू नका आणि ती चित्रफित समाज माध्यमांमध्ये तर बिल्कुल चिटकवू नका. तुम्ही तसं करणार नाही असं वाटतंय. तरीपण आपलं सांगावंसं वाटलं. गेले काही वर्ष मुंबईत सौ श्रीमंत आणि सौ मुख्यमंत्री यांच्या मध्ये आपापल्या रेकॉर्ड डान्सच्या चित्रफिती काढून त्या सोशल मीडियावर चिटकवायची चढाओढ चालली आहे कि काय असं वाटू लागलं होतं. तर तेवढं करू नका.

पूर्वी शाळकरी मुलं शाळेच्या गॅदरिंग मध्ये किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात रेकॉर्ड डान्स बसवीत असत. ते करण्याचं एक वय असतं. उगीच कुठल्याही वयात, कुठल्याही पदावर असताना ते केलं तर शोभत नाही. शिवाय मागे मी न्यूयॉर्क मधल्या एका प्रसिद्ध वेडिंग प्लॅनरची मुलाखत पाहिली होती. तो वेडिंग प्लॅनर असं म्हणाला कि लग्नाचा दिवस हा वधू आणि वरासाठी खास दिवस असतो. त्या दिवशी इतर कोणीही मग ती वरमाई असो, वधूमाई असो, मावस सासरे किंवा चुलत वहिनी असो - कोणीही पाहुण्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करू नये. ते वाईट दिसतं. सौ नीताताई काही वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या एका हिंदी चित्रपटातील शावा शावा कुटुंबाचं अनुकरण करतायत की अशी कधीकधी शंका येते. मुंबईचं बॉलिवूडायझेशन  -फिल्मीकरण हि चिंतेची बाब आहे. ती गांभीर्याने घ्यायला हवी. वर्षात रहात असताना तुम्ही ते कराल अशी आशा आहे.

टीव्ही आणि चित्रपटांचा लोकांच्या मनावरील प्रभाव बघता अख्खा देश आता थिल्लर हिंदी सिनेमा आणि सिरीयल्सना आदर्श मानून वागू लागलाय कि काय अशी काळजी वाटते. सहभागी होणाऱ्या लोकांमध्ये कर्कश्श, आक्रस्ताळेपणानी भांडण घडवून आणणारे टीव्ही वरचे कार्यक्रमही समाजाचं प्रतिनिधित्वच करत असतात. लोक बघतात म्हणून ते कार्यक्रम चालतात. सध्याचा राजकीय गोंधळ हा त्या प्रभावाचा परिणाम नसेल कशावरून? वर्षात रहात असताना याबाबतीत जागरूकता निर्माण करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतलात तर बरं होईल.

हिंदी सिनेमासृष्टीचं मुंबईतील वर्चस्व - त्याचे मराठी संस्कृतीवर, मराठी चित्रपट सृष्टीवर झालेले बरेवाईट परिणाम तज्ञांच्या द्वारे तपासून बघण्याची गरज आहे. एकेकाळी दादासाहेब फाळके, व्ही शांताराम यांच्या सारखे मातब्बर लोक आपल्याकडे होऊन गेले. फाळणी नंतर स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी सिनेमा सृष्टीच्या मुंबईत वाढलेल्या प्रस्थामुळे मराठी सिनेमा आणि नाट्य सृष्टी मागे पडली का यावर विचार व्हायला हवा. मोठ्या वृक्षांच्या छायेत लहान वृक्षांची वाढ खुंटते -तसं तर झालं नाही ना हे तपासून बघायला हवं. विशेषतः तमिळ आणि तेलगू सिनेमांच्या तुलनेत - ज्यांना हिंदी सिनेमाचं अतिक्रमण सहन करावं लागलं नाही. आज त्या दोन्ही सिनेसृष्टी मराठी चित्रपट सृष्टीच्या फार पुढे गेलेल्या दिसतात. सगळेच हिंदी सिनेमा थिल्लर नसतीलही कदाचित पण ज्या प्रदेशात हिंदीचा प्रभाव आहे ते प्रदेश प्रगतिशील आहेत का? - किमान  हा विचार तरी ती भाषा कवटाळण्या आधी व्हायला हवा कारण भाषा आपल्या बरोबर स्वतःची संस्कृती घेऊन येईल  - आलेलीच आहे.

महाराष्ट्राच्या प्रथम स्त्रीची भूमिका काळानुसार बदलायला हवी असं तुम्हांला वाटत असेल तर जरून बदल करा. पण तुमची स्वतःची एक नैसर्गिक स्टाईल आहे. ती तशीच राहू दे. आणि ती राहीलही अशी आशा आहे. मुंबई तुम्ही खालपासुन वरपर्यंत बघितलेली आहे. कधी न पाहिलेलं अनपेक्षितपणे मिळाल्यामुळे डोळे विस्फारले आणि like a kid in Disney Land -हे करू का ते करू, इथे जाऊ का तिथे जाऊ, हे घालू कि ते घालू अशी सैरभैर अवस्था झाली - असं तुमच्या बाबतीत होण्याची शक्यता जवळपास नाही असा विश्वास वाटतोय. त्यामुळे वर्षात झालेला हा बदल स्वागतार्ह आहे. असो, सध्या एवढच. ऊतू नका मातु नका घेतला वसा टाकू नका हि विनंती.

माजी मुख्यमंत्र्यांनाही एक मित्रत्वाचा सल्ला: ते इंग्रजीतील भाषांतरित वाक्य आता मोडीत काढलं तर फार बरं होईल. "मी पुन्हा येईन" असं पुन्हा कधी म्हणू नका. त्याऐवजी म्हणण्यासाठी मराठी भाषेतलं एक खास वाक्य आहे जे तुमच्या सध्याच्या पदाल योग्य होईल. विरोधी पक्ष नेते असताना जनते तर्फे सभागृहात वेळोवेळी फक्त एकच डायलॉग मारा, "आता माझी सटकली".