"ख्रिस हेम्सवर्थला अल्झायमर्स झालाय." मुलानं सनसनाटी बातमी दिली.
"कोण तो?" मी ते नाव कधी ऐकलं नव्हतं.
"सिनेमा नट आहे".
"वय काय असेल त्याचं? "
"३९."
"एकोणचाळीसाव्या वर्षी अल्झायमर्स? अरली ऑनसेट - लवकर होणाऱ्या अल्झायमर्ससाठी सुद्धा एकोणचाळीस जरा जास्तच तरुण वय वाटतं."
माध्यमांच्या पूर्णपणे आहारी गेलेले असल्यामुळे महामारीच्या काळात त्यांनी पुरतं घाबरवून सोडलेली ही पिढी आहे. मुलाला ती बातमी ऐकुन धक्का बसलेला दिसला. म्हणून मी थोडा गुगल सर्च केला.
"म्हणजे त्याला अल्झायमर्स अजुन झालेला नाही पण त्याच्या शरीरात तो जीन आढळला आहे ज्यामुळे त्याला तो होऊ शकेल." मुलानं सावकाश खरी बातमी सांगितली.
"दोन्ही मध्ये खूप फरक आहे, बाबा! एखाद्याला खरोखर एखादा आजरा झालेला असणं आणि तो होऊ शकेल असं दर्शवणारा जीन शरीरात सापडणं यात जमीन -अस्माना इतकं नसलं तरी फार अंतर आहे. दोन्हीची अशी गल्लत करू नकोस. " या विषयी जे थोडंफार वाचलेलं आहे ते मी त्याला सांगितलं
कुठल्यातरी मालिकेतील कामाचा भाग म्हणून हेम्सवर्थनी ज्या चाचण्या करून घेतल्या त्यात असं आढळलं कि त्याच्या मध्ये ApoE4 या जीनच्या दोन कॉपी आहेत - एक आई कडून आणि एक वडिलांकडून आलेली - ज्याच्यामुळे त्याला अल्झायमर्स होण्याची शक्यता तो जीन शरीरात नसलेल्या लोकांपेक्षा आठ ते दहा पटिनी जास्त आहे.
हेम्सवर्थच्या आजोबांना अल्झायमर्स झाला आहे. त्याच्या दृष्टीने हि बातमी चिंताजनक आहे. त्यानं सध्या कामापासुन थोडी रजा घेतली आहे. तो घरी ऑस्ट्रेलियाला परत जाऊन आपल्या परिवारासोबत वेळ घालवणार आहे. त्याला अल्झायमर्स झालेला नाही. तो होऊ नये म्हणून तो शारीरिक आणि मानसिक विश्रांती, योग्य आहार, आणि व्यायाम यावर लक्ष केंद्रित करणार आहे असं बातमीत म्हंटलं होतं.
ते वाचल्यावर माझी पहीली प्रतिक्रिया अशी होती कि ... here we go again! हेमस्वर्थ जर जगभर - खास करून तरुणांच्या मध्ये लोकप्रिय असेल तर जगभरातील जनतेचं लक्ष आता अल्झायमर्स कडे वेधलं जाणार. त्याच्या वयाच्या अनेक तरुणांना वाटणार कि आपणही ती तपासणी करून घ्यायला हवी कि काय?
या आधी एकदोनदा असं घडलं आहे. कोलनॉस्कपी टेस्ट कशी प्रसिद्ध झाली ते मी बघितलं आहे. न्यूयॉर्क मध्येच त्याची सुरवात झाली.
केटी कुरिक (Katie Couric) ही NBC टीव्ही च्या The Today show या सकाळच्या कार्यक्रमाची पूर्वीची सह -सूत्रसंचालक. अमेरिकन टीव्ही वरचं मोठं नाव. अनेक महत्वाच्या घटनांच - ऑलिंपिक खेळ, ब्रिटिश राजघराण्यातील महत्वाचे प्रसंग, अमेरिकच्या राष्ट्राध्यक्षांचे शपथविधी याचं रिपोर्टींग तिनं Today show साठी तिच्या को - अँकर बरोबर केलं आहे. न्यूयॉर्क मध्ये रहाते. तिचा नवरा वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी कोलन कॅन्सरनी वारला.
नवरा गेल्यावर केटीनी आतड्याच्या कर्करोगा विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी स्वतःला वाहुन घेतलं. वेगवेगळ्या कार्यक्रमां मध्ये पाहुणी म्हणुन जाऊन त्या विषयी ती बोलू लागली. कोलनॉस्कपी करून घेण्याचं आव्हान लोकांना करू लागली. लोकांची त्या चाचणी बरोबर - ज्याच्यामुळे आतड्यातील कॅन्सर सुरुवातीलाच सापडू शकतो - ओळख व्हावी म्हणून तिनं स्वतः ती चाचणी करून घेतली आणि ती आपल्या कार्यक्रमात दाखवली.
लॉस अँजेलिस मध्ये दुसऱ्या एका वाहिनीवर रात्रीचा शो करणाऱ्या एका कमिडियन सोबत त्याच्या कोलनॉस्कपीला गेली. त्यानं त्याचं चित्रिण स्वतःच्या शो मध्ये दाखवलं. अशा प्रकारे आतड्याच्या कर्करोगा पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जागरूक रहाण किती महत्वाचं आहे हे लोकांना पटवुन देण्याचं काम केटीनी गेली वीस वर्ष केलं.
मागच्या महिन्यात तिनं जाहीर केलं कि तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. पहिली स्टेज आहे. तिचा एक मॅमोग्रॅम - स्तनात कॅन्सरची सुरुवात होत आहे का हे दर्शवणारी चाचणी- हुकला त्यामुळे कॅन्सर झाला असं स्पष्टीकरण तिनं दिलं.
मॅमोग्रॅमचं प्रस्थ आता फार वाढलं आहे. मनोरंजनाच्या व्यवसायातील खासकरून टेलिव्हिजन वरील कामामुळे घराघरात पोहचलेल्या अनेक प्रसिद्ध महिला ती तपासणी करून घेण्याचं महिलांना आव्हान करतात. ठराविक वयानंतर - मासिक पाळी गेल्या नंतर किंवा जायची वेळ जवळ आल्यावर - महिलांनी नियमित मॅमोग्रॅम करून घ्यावा असा सल्ला डॉक्टर्स देतात. आपल्या आरोग्याविषयी तुम्ही जबाबदारीनं वागत आहात याचं ते एक चिन्ह आहे असं महिलांच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न होतात.
मॅमोग्रॅम हि एक टेस्ट आहे. ती नेहमी अचूक असतेच असं नाही. ती केल्याने स्तनाचा कर्करोग होत नाही असंही नाही पण नियमित ती चाचणी करत राहिलं तर तुमच्या स्तनाच्या आत काय चाललंय यावर लक्ष ठेवणं डॉक्टरांना शक्य होतं. काही अंतर्गत - सहजासहजी बाहेरून न जाणवणारे - बदल आढळले तर डॉक्टर पुढील चाचण्या किंवा उपचार सुचवु शकतात असं म्हणतात.
तरीही एक मॅमोग्रॅम करायचा राहीला आणि पुढच्या वेळी केला तर कॅन्सर सापडला हे केटीचं स्पष्टीकरण बुचकळ्यात टाकणारं आहे. त्या चाचणीची एवढी भीती स्तनाच्या कर्करोगाला आहे कि जोपर्यंत नियमित मॅमोग्रॅम करताय तोपर्यंत तो दिसुन येत नाही पण एकदा जरी ती टेस्ट चुकली तर लगेच पुढच्या चाचणीत कॅन्सर झाला आहे असं दिसुन येऊ शकतं असा काहीतरी अर्थ त्या स्पष्टीकरणातुन निघतो कि काय असं वाटतं.
*****
काही दिवसांपूर्वी हेअर सलॉन मध्ये माझ्या शेजारी एक बाई बसली होती. साधारण साठपासष्ठच्या आसपासचं वय असेल. तिच्या बरोबर तिचा कुत्रा होता. सोनेरी केसांचा, लहानसा. त्याला ती सारखी, "मम्बाय एका जागी बस, मम्बाय इकडेतिकडे फिरू नकोस," असं म्हणत होती. सहाजिकच मी विचारलं, "हे नाव कुठून आलं?" ती म्हणाली, "गेली पंधरा वर्ष मी नियमित भारतात जातेय. त्यातही मम्बायला जायला मला जास्त आवडतं."
मम्बायचं कोणीतरी भेटल्यामुळे ती फार खूष झाली. कौतुकाने आपल्या एकदोन प्रसिद्ध भारतीय मित्रांची नावं सांगितली - त्यातला एक डिझायनर, दुसरा शेफ. राजेशाही फेटा घातलेला कुत्र्याचा फोटो दाखवला.
ती उत्साहानी बोलत होती आणि फोटो दाखवत होती पण मधुनच तिच्या मनातली काळजी बोलण्यातुन व्यक्त होत होती. दुसऱ्या दिवशी तिला कोलनॉस्कपीसाठी जायचं होतं. "ऑगस्ट मध्ये केली होती. खरतर एवढ्या लगेच परत करत नाहीत. मध्ये काही वर्ष जाऊ देतात. पण मागच्या टेस्ट मध्ये डॉक्टरांना काहीतरी शंका आली म्हणून त्यांनी नोव्हेंबर मध्ये परत करायला सांगितली."
केस आणि नखं रंगवुन घेऊन ती टेस्टसाठी जय्यत तयार होत होती पण काळजीत होती. बुधला भरून काहीतरी द्रव्य टेस्टच्या आधी प्यायला दिलंय म्हणाली. ऑगस्ट मध्ये टेस्ट केलीस ती काही त्रास होत होता म्हणून कि काही होत नसलं तरी चाचण्या करून घ्याव्यात या सल्ल्याचा परिणाम म्हणून हे तिला विचारायचं राहून गेलं.
*****
ब्रेस्ट कॅन्सरच्या जीनचं नाव आहे BRCA. त्याला ब्रॅका असंही म्हणतात. त्याचे ब्रॅका १ आणि ब्रॅका २ असे प्रकार आहेत.
हॉलिवुड मधली नटी अँजलिना जोली मध्ये ब्रॅका १ या जीनचं म्युटेशन आढळलं आहे. तिला असं वाटतं कि त्या जीन मुळे तिला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता ८७ टक्के आहे तर ओव्हेरियन कॅन्सर होण्याची शक्यता ५० टक्के आहे. म्हणून तिनं २०१३ साली डब्बल मॅस्टेक्टमी - दोन्ही स्तन काढुन टाकण्याची शस्त्रक्रिया करून घेतली. त्या जागी अर्थातच खोटे बसवले असतील. तशा प्रकारची शस्त्रक्रिया झाल्यावर ते बसवतात.
पण त्या क्षेत्रातील काही तज्ञांना तिचा हा - कर्करोग झालेला नसतानाही तरुण वयात धडधाकट स्तन काढुन टाकण्याचा निर्णय मुर्खपणाचा वाटला. तिचं बघुन बऱ्याच महिलांनी ब्रॅका जीन आपल्यात आहे का ते जाणुन घेण्यासाठी विनाकारण जेनेटिक टेस्टिंग करून घेतलं असं ब्रिटिश मेडिकल जरनल (BMJ) नी केलेल्या (२०१७) पहाणीत आढळलं. त्याला अँजलिना इफ़ेक्ट म्हणतात.
जोलीची आई स्तनाच्या कर्करोगाने गेली. माझ्या मुलांसाठी - त्यांना त्यांच्या आईचा सहवास दीर्घकाळ मिळावा यासाठी मी काहीही करीन असं काहीसं कारण तिनं दोन्ही निरोगी स्तन काढुन टाकण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं.
पूर्व युरोपातील अष्कनाझी ज्यू महिलांच्या मध्ये ब्रॅका जीन आढळण्याचं प्रमाण थोडं जास्त आहे. माझ्या मुलाच्या एका मित्राच्या आईनी काही वर्षांपूर्वी ती जेनेटिक टेस्ट करून घेतली. तिचे पूर्वज अष्कनाझी ज्यू होते म्हणून केली का तिच्या परिवारात कोणाला तरी तो आजार झाला होता म्हणुन केली ते आता मला आठवत नाही.
तिच्यात ब्रॅका जीन आढळला. त्यानंतर तिनं फेसबुक वर पोस्ट लिहिली कि मला आता खुप कठीण निर्णय घ्यावा लागणार आहे कि कॅन्सर झालेला नसताना कदाचित तो होऊ शकेल असे दर्शविणारा जीन शरीरात सापडला आहे या भीतीपोटी दोन्ही स्तन काढून टाकायचे का? काही आठवडे विचार केल्यावर तिनं रॅडिकल मॅस्टेक्टमी न करण्याचा निर्णय तेंव्हा घेतला होता.
डब्बल मॅस्टेक्टमी, रॅडिकल हिस्टरेक्टमी - महिलांच्या जननेंद्रियांशी निगडीत आजरांवर करण्यात येणारे हे प्रचलित - उपचार असं म्हणता येणार नाही कारण या शस्त्रक्रिया केल्याने ही इंद्रिय आजार- मुक्त होत नाहीत (स्त्री त्या इंद्रियां पासुन मुक्त होते) पण ते आजार वाढू नयेत म्हणून करण्यात येणारी ती टोकाची उपाय योजना असते असं म्हणता येईल. या आजारांचं प्रमाण जगभर वाढत आहे का ते माहीत नाही. पण रॅडिकल हिस्टरेक्टमी - पूर्ण गर्भाशय काढुन टाकण्याची शत्रक्रिया भारतात जितकी सर्रास करण्यात येते तितकी सहज ती अमेरिकेत केली जात नाही. भारतात मूल होण्याचं वय उलटुन गेलेल्या महिलांच्या तोंडून, "पिशवी काढुन टाकली" हे त्यामानाने जास्त ऐकायला मिळतं.
*****
लहान मुलांच्या कॅन्सरवर उपचार करणारं एक रुग्णालय आहे. कर्करोगग्रस्त मुलांवर तिथे मोफत उपचार होतात असं म्हणतात. त्या रुग्णालयाची जाहिरात वारंवार यु ट्यूब वरच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये येऊन टपकते. जाहिरातींचा ढांचा ठरलेला असतो - कॅन्सर किंवा ट्युमर झालेलं लहान मुलं आणि त्यांचे आईवडील त्या आजराविषयी बोलत असतात. त्या रुग्णालयात किती चांगले उपचार मुलाच्या आजारावर झाले याचं वर्णन करतात.
रुग्णालयाला छोटीशी देणगी दिली तरी आणखी देणगी मागणाऱ्या पत्रांचा आणि फोनचा पाऊस सुरु होतो. पत्रांचा सुरही जाहिरातीं सारखाच असतो. तान्ह्या बाळा पासुन ते मोठ्या मुलांपर्यंत त्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलांची कहाणी फोटो सहीत छापलेली असते. अशा प्रकारचं अग्रेसिव्ह फ़ंड रेजींग बघुन प्रश्न पडतो कि लहान मुलांना होणाऱ्या कर्करोगाचं प्रमाण वाढलं आहे का रुग्णालयाला आपला विस्तार वाढवायचा आहे. हा कोंबडी आधी कि अंडं आधी सारखा प्रश्न आहे.
तोच प्रश्न मेडिकल devices बनवणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीतही पडतो: कंपनीची वाढ होण्यासाठी नफा कमावायला हवा. तो कमवायचा म्हणजे प्रतिस्पर्ध्यावर मात करून आपल्या उत्पादनांचा खप वाढवणं आलं. त्यासाठी मार्केटिंग करणं आलं ...जितक्या जास्त रुग्णांवर ती डिव्हायसेस वापरली जातील तेवढी व्यवसायात वाढ होणार.
*****
सलॉन मध्ये गेल्यावर जो तरुण मुलगा माझ्या केसांची देखभाल करतो त्याला नुकतच अनके चाचण्यांमधून जावं लागलं. त्याला पोटात अंतर्गत रक्तस्त्राव झाला. सात वर्षांपूर्वी झाला होता. आता पुन्हा झाला. सात वर्षांपूर्वी कोलनॉस्कपी, एन्डोस्कपी सारख्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात काही सापडलं नाही. या वेळीही तसंच झालं.
शोधा म्हणजे सापडेल - जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत शोधत रहायला हवं या उद्देशाने आता त्याला कॅप्स्यूल एन्डोस्कपी करून घ्यावी लागणार आहे. ज्यात कॅप्स्यूलच्या आकाराचा लहान वायरलेस कॅमरा रुग्णाला गिळावा लागतो. कॅमरा पचन मार्गातुन जात असताना त्या भागाचे हज्जारो फोटो काढतो आणि चुकुन गिळलेली चिकूची बी जशी शरीरातुन बाहेर पडते तसा बाहेर पडतो. जर त्या मार्गाने बाहेर नाही पडला तर काय होतं? जिथे सगळ्या प्रश्नांची उत्तर उपलब्ध आहेत तिथेच या प्रश्नाचही उत्तर मिळू शकतं.
या चाचण्या सर्दी- खोकला-ताप आला आहे म्हणून रक्त तपासणी करून घेतली - इतक्या साध्या अर्थातच नसतात. त्या करताना रुग्णाला पूर्ण भूल द्यावी लागते.
सात वर्षांपूर्वी या अनुभवातुन गेल्यामुळे रक्तस्रावामागे काय कारण असावं याचा त्याला थोडा अंदाज आहे. तो मुळचा युरोप मधला आहे. तिकडे त्याची आज्जी गंभीर आजारी आहे असं त्याला समजलं. आज्जीनच त्याला लहानाचं मोठं केलं. तिला भेटायला जायची तयारी करत होता तेवढ्यात ती गेल्याची बातमी आली. त्याचवेळी त्याचा रक्तस्त्राव उदभवला.
तो खूप संयमाने हे सांगत होता. कोलनॉस्कपीसाठी तयार होणारी महीला जितकी चाचणीच्या निदाना बद्दल काळजीत होती (वेगळ्या सलॉन मध्ये, वेगळ्या दिवशी तीची भेट झाली होती) तितकी काळजी तो व्यक्त करत नव्हता. पण मला मात्र वाटलं की त्यानी पथ्यपाणी आणि त्याच्या आहाराव्यवहारात बदल केला नाही, नुसतच टेस्ट आणि डॉक्टरांच्या औषधांवर अवलंबुन राहीला तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या - काही वर्षांनी परत कदाचित याच दिव्व्यातुन जावं लागेल.