काही वर्षांपूर्वी एक मुलाखत बघत होते. गायींच्या गोठ्यातुन फिरत मुलाखत चालली होती. एका गायीपाशी थांबून तीच्या पाठीवर हात फिरवत मुलाखत देणारी व्यक्ती टी व्ही वाहिनीच्या वार्ताहाराला म्हणाली, "गायीच्या पाठीवरून हात फिरवल्याने रक्तदाब नियंत्रित होतो. कर्करोगावर उपचार करण्यासाठीही गायीचा उपयोग होऊ शकतो."
ते ऐकल्यावर डोळ्यासमोर एक चित्र उभं राहीलं. चित्रात असं दिसलं कि सरकार तर्फे शहरात जागोजागी Go उपचार केंद्र उभारण्यात आली आहेत. एक- दोन केंद्रांमध्ये तर मी स्वतः जाऊन आले आहे असं वाटलं: प्रभादेवीतील आप्पासाहेब मराठे मार्गावरचं हंडेय आणि हॉंडाच्या शोरूमच्या खांद्याला खांदा लावून उभं असलेलं हम्मा उपचार केंद्र आणी थोडं पुढे पेडर रोडवर लॅम्बर्गिनी आणि बुगाटीच्या शोरूमच्या मध्ये झळकणारं दुसरं.
गाड्यांच्या शोरूम प्रमाणेच Go उपचार केंद्रांच्या भिंती काचेच्या होत्या. शोरूम मध्ये गाड्या पार्क केल्या होत्या अगदी त्याच प्रमाणे गो उपचार केंद्रात गायी उभ्या होत्या. तिथून पुढे मात्र उपचार केंद्र थोडं वेगळं दिसत होतं. प्रत्येक गायी शेजारी उपचार करून घ्यायला येणाऱ्या व्यक्तीला बसण्यासाठी जागा होती. गोमूत्र आणि शेण या दोन्हीचा उपचार पद्धतीत वापर होत असल्याने एखाद्या गायीने शेण किंवा गोमूत्र दिलं कि तात्काळ ते शास्त्रोक्त पद्धतीने साठवलं जात होतं.
परंतु गायींच दूध मात्र बऱ्यापैकी बदनाम झालेलं दिसलं. केंद्राच्या बाहेर रस्त्याच्या कडेने उभ्या असलेल्या उंच जाहिरातींच्या फलकांवर वेगवेगळ्या वनस्पतीजन्य दुधांच्या जाहिराती होत्या. एक फलक बाजारात नव्यानेच आलेल्या बदामाच्या दुधाची जाहिरात करत होता. दुसऱ्यावर सोयाबीन पासुन बनवलेल्या दुधाची जाहिरात होती. त्या फलकावर एका बाजूला गायीचं चित्र होतं आणि दुसऱ्या बाजूला सोयाबीनचं चित्र होतं आणि गायीच्या दुधापेक्षा सोयाबीनचं दूध कसं सरस असतं याचं तुलनात्मक वर्णन होतं. तिसऱ्या फलकावर ओट्सच्या दुधाची जाहिरात होती. आणखी एका मोठ्ट्या फलकावर शहरात नव्यानेच सुरु झालेल्या व्हीगन रेस्टोरंटची जाहिरात होती. पनीर टिक्का असो, बटर चिकन असो कि मलाई कोफ्ता, आईस्क्रीम असो कि खीर आमच्या कुठल्याच पदार्थामध्ये गायी -म्हैशींच्या दुधाचा (किंवा खऱ्या कोंबडीचा) लवलेशही तुम्हांला सापडणार नाही असं त्या जाहिरातीत मोठ्या अभिमानानी नमूद केलं होतं.
साऱखी-सारखी आपल्या दुधाची इतर दुधांशी तुलना करून आपल्या दुधाला निकृष्ट दर्जाचं म्हणून हिणवलं जातंय हे गायींच्या मनाला खूप लागत होतं. पण बिच्चारं मूक जनावर ते. करणार तरी काय. आपल्या मनातली खंत सांगणार तरी कोणाला आणि कशी. या विषयी म्हैशींशी बोलता आलं तर आपल्या दुःखाचा भार थोडा हलका होईल असं त्यांना वाटलं. परंतु उपचार केंद्रात म्हैशी नव्हत्या. मात्र गायींच्या मनातील चलबिचल केंद्रात काम करणाऱ्या एका चाणाक्ष सेविकेनी हेरली होती. गायींच्या मानसोपचारात प्रवीण असलेल्या तज्ञांना त्यांचं सांत्वन करण्यासाठी नियमित बोलवावं कि काय असं तिला वाटू लागलं.
आजकाल आपलं दूध आणि मांस दोन्ही वर्ज्य मानलं जातंय अशी कुणकुण गायींच्या कानावर पूर्वी आली होती पण बाहेर लावलेल्या जाहिरातीं मध्ये त्याचा प्रत्यक्ष पुरावा बघून त्यांच्या दुःखात भर पडली. काचेच्या भिंतींच्या बाहेर नजर टाकण्याची त्यांची हिम्मत होईना. बाहेर बघितलं आणि नवीनच कुठल्यातरी दुधाची किंवा व्हीगन रेस्टोरंटची जाहिरात दिसली तर आपलं आपल्या रक्तदाबावरचं नियंत्रण सुटेल कि काय असा विचार त्यांच्या मनात डोकावला. बाहेर बघणं त्या टाळू लागल्या.
नाही म्हणायला उपचार केंद्राच्या माध्यमातुन लोकांनां आपला उपयोग होतोय ह्याचा गायींना आनंद झालेला दिसला. आपण अगदीच निरुपयोगी प्राणी नाही, समाजाला आपली गरज आहे ही भावना त्यांना सुखावत होती. नियमित उपचारांसाठी केंद्रात येणाऱ्या लोकांबद्दल त्यांना आत्मीयता वाटू लागली होती. कोण कुठ्ल्या दिवशी कुठल्या वेळी येतं हे ही आता त्यांच्या पैकी काहींच्या लक्षात राहू लागलं होतं.
इस्त्रीचे शर्ट- पॅन्ट घातलेला एक ईसम हातात ऑफिसची बॅग घेऊन सकाळी खूप लवकर घाई - गडबडीत येतो. कमीत कमी दहा मिनिटांचं सेशन घ्यावच लागतं म्हणून घेतो पण जेमतेम पाच मिनिटं आपल्या पाठीवरून हात फिरवतो. त्यातही सारखं घड्याळाकडे बघत असतो. निघायच्या आधी गडबडीत आपल्याला चारा घालायला मात्र विसरत नाही आणि आला तसाच धावत पळत स्टेशनच्या दिशेने चालू पडतो हे कृष्णा गायीच्या सवयीचं झालं होतं.
गायींना एका पेक्षा एक सुंदर नावं होती - कृष्णा, गोदावरी, नर्मदा, सरस्वती वगैरे. केंद्रातील वातावरण प्रसन्न रहावं आणि तिथे शांतता राखली जावी या करणास्तव फोनवर बोलण्यास मनाई होती.
केंद्रा पासून जवळ असलेल्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांची आई शाळा सुटायच्या थोडी आधी येते; वेळ असेल त्याप्रमाणे कधी दहा तर कधी पंधरा मिनिटांचं सेशन घेते; नियमा नुसार ती आपला फोन सायलेंट ठेवते पण तिचे दोन्ही हात आणि डोळे सतत फोन मध्ये गुंतलेले असतात; गो- सेवक आठवण करून देतात तेवढ्या पुरताच तिचा हात आपल्या पाठीवरून फिरतो आणि सेवकांच लक्ष नसलं कि परत फोन कडे वळतो हे सरस्वती गायीच्या लक्षात आलं होतं.
काही लोकांनी केंद्राला विंनती केली होती कि त्यांनी पाच मिनिटांचं मिनी सेशन उपलब्ध करून दयावं. दहा मिनिटं गायीच्या पाठीवरून हात फिरवत बसणं त्यांना जड जात होतं. पण इच्छा असुनही आर्थिक दृष्ट्या उपचार केंद्राला ते परवडण्या सारखं नव्हतं. जरी केंद्राचा उद्देश्य नफा कमावणं हा नसला तरी त्यांना त्यांची काही आर्थिक गणितं सांभाळावी लागत होती. गायींची आणि केंद्राची स्वच्छता राखणे हे खूप महत्वाचं काम होतं ज्यासाठी भरपूर सेवकांची गरज होती. सेवकांचे पगार शिवाय जागेचं भाडं हे मोठे खर्च त्यांना होते.
दुपारी केंद्र शांत असायचं. त्यावेळी संसारातुन निवृत्त होऊ पहाणाऱ्या दोन महिला यायच्या. शेजारी शेजारी उभ्या असलेल्या नर्मदा आणि गोदावरीच्या जवळ बसून त्या प्रेमाने त्यांच्या पाठीवरून हात फिरवायच्या. पण जसे त्यांचे हात चालायचे तितकंच त्यांचं तोंडही चालायचं. खरतर केंद्रात बोलणे आणि खाणे या दोन्ही क्रियांना मनाई होती पण नियमांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत त्या आपसात अखंड बडबड करत बसायच्या. तसंच त्या दिवशी घरी काही विशेष खाद्य पदार्थ केले असतील तर त्यांचीही आपसात देवाण- घेवाण करायच्या. बहुतेक वेळा तरुण गो -सेवक वडीलधाऱ्या महिलांच्या नियमभंगाकडे दुर्लक्ष करायचे. क्वचित कधीतरी त्यांना तंबीही द्यायचे.
अशा प्रकारे गो उपचार केंद्र त्या परिसराचा एक भाग बनून गेलं. परंतु जितकी उपचार - इच्छुकांची संख्या वाढली तसं केंद्र चालकांना काही समस्या जाणवू लागल्या. पहिली आणि फार महत्वाची अडचण हि होती कि गायींचं आपल्या शरीर स्वच्छतेच्या क्रियांवर काही नियंत्रण नव्हतं. काळवेळ न पहाता, आपल्या शेजारी कोणी बसलं आहे किंवा नाही याचा जराही विचार न करता त्या मलमूत्र विसर्जन करून मोकळ्या होत असत.
त्यावर तोडगा शोधून काढण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. समितीनी तीन वेगवेगळ्या मार्गानी या समस्येचा विचार करायला सुरवात केली. पहिला उपाय म्हणजे लहान मुलांप्रमाणे गायींसाठी ऑरगॅनिक, डिस्पोजेबल आणि बायो डिग्रेडेबल लंगोट वापरता येतील का? दुसरा उपाय - शहरातील पाळीव कुत्र्यांना जसं त्यांच्या सु -शी साठी ठराविक वेळी घराबाहेर नेलं जातं तसं गायींना नेता येईल का? किंवा दरवेळी त्यांना केंद्राबाहेर नेणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी केंद्रातच शौचालय बांधून दिवसातून ठराविक वेळी त्यांना तिथे नेता येईल का? पहिले दोन्ही उपाय यशस्वी झाले नाहीत तर गायींच्या आहारात बदल करून, त्यांना काही रासायने देऊन त्यांच्या नैसर्गिक क्रिया नियंत्रणा खाली आणता येतील का?
खास नेमण्यात आलेली समिती अशा काही उपाय योजनांचा विचार करीत आहे हे गायींच्या गावीही नव्हतं. केंद्रात येणाऱ्या उपचार -इच्छुकांची आवक जावक दिवसागणिक वाढत होती. एक आयुर्वेदाचार्य आता केंद्राचा भाग बनले होते. ते नाडी परीक्षेत निष्णांत होते. लहानां पासुन ते थोरां पर्यंत सर्व वयाचे लोक त्यांच्याकडे आरोग्यविषयक सल्ला घेण्यासाठी येत. आयुर्वेदाचार्य त्यांना काढे किंवा आहारात बदल सुचवुन त्यांच्या समस्यांचं निराकरण करीत. तपासून घ्यायला आलेल्या व्यक्तीची नाडी परीक्षाकरून त्या व्यक्तीनी आपल्या आहारात कुठल्या पदार्थांचा समावेश करावा किंवा करू नये या विषयी सल्ला देत. केंद्राची वाढती लोकप्रियता बघून गायी समाधानी होत्या. आपलं दैनंदिन आयुष्य खूप सुरळीत आणि सुरक्षित चाललंय असं त्यांना वाटलं.
एक दिवस दुसऱ्या कुठल्यातरी भाषेतील एक शब्द गायींच्या कानावर पडला. प्रथमतः त्यांना तो थोडा परिचित वाटला. मग तो शब्द पुन्हा पुन्हा कानावर पडत राहिला. हंडेय आणि हॉंडाच्या शोरूम खूप लोकप्रिय होत्या. तिथे वाहन खरेदीसाठी आलेले नवरा -बायको किंवा मित्र -मैत्रिणी गाड्या बघून झाल्या कि घटकाभर उपचार केंद्रात गायींच्या सान्निध्यात विसावत असत. त्यांच्या बोलण्यातून - "आपली दुसरी (किंवा तिसरी) गाडी हंडेय असावी कि हॉंडा का त्यापेक्षा टोयोटा करोला जास्त चांगली" - अशी चर्चा अधुन मधून गायींच्या कानावर पडत असे. गायींना वाटलं शेजारी करोलाची शोरूम उघडली असावी.
मग आणखीही बरेच वेगवेगळे आधी कधी न ऐकलेले शब्द त्यांना ऐकू येऊ लागले. तेंव्हा कुठे -हे प्रकरण काहीतीर वेगळं दिसतंय, याचा गाड्यांशी काही संबंध दिसत नाही हे गायींच्या लक्षात आलं. केंद्रा समोरच्या रुग्णालयातील धावपळ दिवसागणिक वाढताना दिसु लागली. उवचार केंद्रातील वर्दळ मात्र हळुहळु कमी होत होती.
एक दिवस काही लोक केंद्राची पहाणी करायला आले. गायींना दुसरीकडे हलवलं तर अमुक इतक्या रुग्णांची इथे सोय करता येईल आणि रुग्णालयातील रुग्णांची गर्दी थोडी कमी होईल असं ते म्हणाले. आपसात विचार विनिमय करून त्यांनी गायींना हलवण्याचा दिवस ठरविला.
नेहमी येणारे उपचार - इच्छुक केंद्रात फोन करून गायींना तिथुन न हलवण्या विषयी विनवण्या करू लागले. केंद्रातील सेवक पुन्हा पुन्हा तेच तेच दुसऱ्या भाषेतील शब्द वापरून केंद्र बंद करणं कसं आवश्यक आहे ते पटवून देत होते.
गायी हे सगळं मुकाट्याने बघत होत्या. केंद्रातील सेवकांना ते वापरत असलेल्या शब्दां विषयी फारसं काही माहित नाही, त्यांचा त्या विषयाचा काहीही अभ्यास नसताना केवळ कोणाकडून तरी ऐकलेले शब्द ठासुन ते इतरांना सांगत आहेत हे गायींना ठाऊक होतं. साक्षात मृत्यु सभोवती थैमान घालताना बघितल्यावर लोकांची मन सैरावैरा पळू लागली आणि स्थानिक, पारंपारिक उपचार पद्धतीचा निषेध करत दुसऱ्या भाषेच्या वेष्टणात गुंडाळून आलेल्या उपचार पद्धतीचा त्यांनी निव्वळ अवलंबच नाही तर त्वेषाने प्रचार आणि प्रसार जराही न कचरता कसा डोळे झाकून केला हे गायींनी बघितलं. जे कोणी आपल्याला जिकडे कुठे नेतील त्यांच्या बरोबर जाण्याची त्यांनी मनाची तयारी केली.
ज्या दिवशी गायींना घेऊन जाणार होते त्या दिवशी त्यांच्या विषयी कळकळ वाटणारे काही तुरळक लोक धावत पळत केंद्रा बाहेर जमले. गायींना नेऊ नका म्हणून पुन्हा पुन्हा विनवण्या करू लागले. पण रुग्णालया बाहेर जमलेल्या जमावानी गो-उपचार इच्छुकांना तिथुन हकलून लावलं. जास्त आग्रह धरला तर आपल्यावर दगडफेक होईल कि काय या भीतीनी गोप्रेमींनी आपापल्या गायीचा लांबून निरोप घेत तिथुन काढता पाय घेतला.
हम्मा उपचार केंद्राच्या जागी आता बहुतेक करोलाची शोरूम येईल आणि लॅम्बर्गिनी आणि बुगातीच्या शेजारी फरारीची.
No comments:
Post a Comment