Tuesday, August 2, 2022

दिल ढुंढता है

                                                      
                                                             


जुलै महिन्यात दोन प्रसिद्ध व्यक्ती गेल्या. 

न्यूयॉर्क मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रथम पत्नी ईव्हाना ट्रम्प यांचं निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्या नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असायच्या. ९० च्या दशकात त्यांचा आणि डॉनल्ड ट्रम्प यांचा घटस्फोट न्यूयॉर्कमध्ये खूप गाजला होता कारण दोघेही इथेच रहायचे. त्या मुळच्या चेकोस्लव्हाकियाच्या होत्या.

ईव्हाना गेल्याची बातमी वाचल्यावर त्यांची एक मुलाखत बघत होते. त्यात त्या म्हणतात कि राष्ट्राध्यक्ष झाल्यावर श्रीयुत ट्रम्प यांनी त्यांना चेकोस्लव्हाकिया मध्ये अमेरिकेची राजदूत म्हणून जाण्याबद्दल विचारलं होतं. (घटस्फोट झाला असला तरी ते दोघे दर आठ -पंधरा दिवसांनी फोनवर बोलायचे. त्यांना तीन मुलं आहेत). 


एक अकेला इस शहर में 


चालून आलेलं राजदूत पद ईव्हानानी नाकारलं. त्याचं कारण त्यांनी मुलाखतीत सांगितलं कि "मी स्प्रिंग आणि फॉल मध्ये न्यूयॉर्क मध्ये असते, हिंवाळ्यात मायामी मध्ये, आणि उन्हाळ्यात सॅन ट्रोपे मध्ये. हे आयुष्य सोडून कशाला कुठे जाऊ ". 

घटस्फोट झाल्यावर गेल्या पंचवीस वर्षात ईव्हानानी दोनदा लग्न केलं. त्यांच्या लग्नाला श्रीयुत ट्रम्प हजर होते. न्यूयॉर्क मध्ये जशी एम्पायर स्टेट बिल्डिंग आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच प्रमाणे ट्रम्प कुटुंब हे ही इथलं एक फिक्सचर आहे. त्यांच्या नावाच्या बऱ्याच इमारती शहरात आहेत.


दिल ढुंडता है 

दुसरं निधन मुंबईत गायक भूपिंदर सिंग यांचं झालं. दुर्दैवानी सध्या तिथे चालू असलेल्या राजकीय गदारोळात ती बातमी कुठे तरी कोपऱ्यात जाऊन पडली. माझ्या आवडीची कित्येक गाणी भूपिंदर सिंग यांच्या आवाजातली आहेत. दुर्दैवाने त्यांच्या निधनाच्या बातमीला जेवढं मिळायला हवं होतं तेवढं महत्व मिळालं नाही. 

एखाद्या व्यक्तीच्या निधनाची बातमी वाचून आपल्याला काय वाटतं या मागची कारणं प्रत्येकासाठी वेगवेगळी असतात. खरतर कोण कुठली ती चेक - अमेरिकन ईव्हाना ट्रम्प. माझा त्यांचा काय संबंध. भारतात असताना त्यांचं नावही कधी ऐकलं नव्हतं. पण जेंव्हा न्यूयॉर्कला आले तेंव्हा ईव्हाना ट्रम्प हे या शहरातलं खूप ठळक नाव होतं. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी वाचून चुटपुट वाटली. 


झिंदगी मेरे घर आना 


तिसरं निधन मुंबईत झालं... की होत आहे (एका राजकीय पक्षाचं)... ते अजून स्पष्ट झालेलं नाही. शहरावर शोककळा पसरली नसेल  बहुतेक पण वादळ वारे वहात आहेत असं दिसतं. या आधी मुंबईत एवढं मोठं राजकीय वादळ कधी आलं होतं का आठवत नाही. आलं असेल कदाचित पण पूर्वी कुठलीही गोष्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला थोडा वेळ लागायचा. आजच्या इतक्या वेगाने काही पोहूच शकत नसे - मग ते विषाणू असोत, वस्तू असोत, नाहीतर बातम्या असोत. 


दो दिवाने शहर में
                                 

भूपिंदर सिंग यांची कित्येक गाणी मी पुन्हा पुन्हा ऐकली आहेत. त्यांचं दो दिवाने शहर में हे घरोंदा सिनेमातलं गाणं जुन्या मुंबईची आठवण करून देतं. मुंबईत जेंव्हा जागेची टंचाई होती, बिल्डर आणि त्यांचे दलाल जागा देतो असं खोटं आश्वासन देऊन लोकां कडून पैसे घेत आणि जागा कधी मिळत नसे त्या काळातला तो चित्रपट आणि ते गाणं आहे. मुंबईतली अनेक कुटुंब तेंव्हा बिल्डर कडुन फसवणूक झाल्याच्या सामुदायिक अनुभवातुन गेली होती. 


होके मजबूर मुझे 


भूपिंदर सिंग यांचा मृत्यु हृदय विकाराच्या झटक्याने म्हणजे नैसर्गिक कारणांमुळे झाला. ईव्हाना ट्रम्प आपल्या घरातील जिन्यावरून पडून गेल्या. तो अपघात होता. 

राजकीय पक्षाचा मृत्यू अजुन झालेला नाही पण त्याचा खात्मा करण्याचे प्रयत्न चालू आहेत असे आरोप होत आहेत. जर ते आरोप खरे ठरले आणि खरोखरच पक्षाचा शेवट झाला तर पक्षाच्या मृत्यूचं कारण नैसर्गिक म्हणता येईल की घातपात किंवा हत्या म्हणावी लागेल?

आजकाल आपण कलेक्टिव्ह consciousness हा शब्द प्रयोग फार ऐकतो. ती संकल्पना थोडी विस्तृत केली तर आपल्या मनावर फक्त आपल्या घरातुन आणि शाळेतुन संस्कार होतात असं नाही. आपण ज्या अनुभवातुन जातो -  एक देश म्हणून, एक राज्य म्हणून, एक शहर म्हणून त्यांनी आपल्या मनाला आणि विचारांना आकार मिळत असतो. 

                           
 बीती ना बिताई रैना 


मुंबईत आजवर झालेल्या अनेक दंगली, दहशतवादी हल्ले, महाभयंकर पूर, दर पावसाळ्यात रस्त्यावर साचणारं पाणी या सगळ्या अनुभवांनी शहरात रहाणाऱ्या लोकांना घडवलं आहे. मुंबईत राजकीय पक्षाची हत्या झाली तर तो ही एक सामुदायिक अनुभव असेल. त्याचे शहरावर आणि राज्यावर काय बरेवाईट दूरगामी परिणाम होतील हे त्या विषयातील जाणकार सांगू शकतील कारण एका प्रादेशिक पक्षा बरोबर अनेक लोकांच आयुष्य आणि आठवणी निगडीत असतात. 

एक आठवण राजीव बजाज यांनी एका मुलाखतीत सांगितली आहे. 

 
नाम गुम जायेगा   


आऊटलुक मासिकानी घेतलेली ती मुलाखत यु ट्यूब वर आहे. हा किस्सा दुसऱ्या भागाच्या शेवटी येतो. बजाज जेंव्हा लहान म्हणजे विशीत होते तेंव्हा पुण्याच्या त्यांच्या बजाज कंपनीत संप चालू होता. कित्यके महिने तो संप मिटत नव्हता. एक युनियन नेता अडून बसला होता आणि संप मिटू देत नव्हता. त्यासंबंधी बोलणी करण्यासाठी राजीव बजाज त्यांचे वडील राहुल बजाज यांच्या सोबत बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले. ठाकरेंनी त्यांची बाजू ऐकून घेतली. मग आपल्या सहकाऱ्यांना विचारलं कि खरंच तो युनियनचा नेता त्रास देतोयं का.

बजाज मुलाखतीत म्हणातात की त्या बैठकीत ठाकरेंचे जे सहकारी हजर होते त्यांची नावं मी सांगत नाही कारण त्यातले काही जण आत्ताच्या मंत्रिमंडळात आहेत (एक वर्षापूर्वीची मुलाखत आहे). जेंव्हा सहकाऱ्यांनी सांगितलं कि होय, खरंच तो नेता अडवणूक करतोय तेंव्हा ठाकरे म्हणाले - "काढून टाका त्याला". फक्त त्यांनी राहुल बजाज यांनां सांगितलं कि तुम्ही त्याला एक ऑटो रिक्षा भेट द्या. म्हणजे जरी त्याची नोकरी गेली तरी तो उद्या पासुन रिक्षा चालवून पॆसे मिळवून त्याच्या कुटुंबाचं पोट भरू शकेल. 

          

कभी किसी को मुक्कमल जहाँ नही मिलता

मुलाखतीत बजाज म्हणतात कि ज्या समस्येवर तोडगा शोधणं खूप कठीण जाणार आहे असं त्यांना बैठकीच्या आधी वाटत होतं ती समस्या ठाकरेंनी इतक्या चुटकीसरशी तरीही संवेदनशीलतेने "counterintuitive" (त्यांनी वापरलेला शब्द) पद्धतींने मिटवली ते बघून तरुण वयात ते खूप मोठा धडा शिकले. त्यांच्या आई (राहुल बजाज यांच्या पत्नी) मध्यम वर्गीय मराठी कुटुंबातील होत्या असंही ते मुलाखतीत म्हणतात.  





                   

Tuesday, July 19, 2022

आभास सावली हा असतो खरा प्रकाश


राज्यात सध्या चालू असलेल्या राजकीय घडामोडी बघता निवडणूकीच्या आधी लोकांनी स्वतःला काही प्रश्न विचारणे आवश्यक आहे. त्याची सुरवात म्हणून खाली एक प्रश्नावली दिली आहे. या मागे कुठल्याही एका पक्षाच्या बाजूने आणि इतर पक्षांच्या विरोधात बोलणे किंवा कोणावर टीका करणे हा हेतू नाही. तर सर्वसामान्य लोकांनी भावनांच्या आहारी न जाता या घडामोडींकडे डोळस पणे बघावं जेणे करून त्यांचं शहर आणि राज्य भविष्य काळात कुठल्या मार्गानी जाऊ शकतं याची त्यांना कल्पना येईल - गोष्टी घडुन गेल्यावर सावकाश जाग आली असं होऊ नये - एवढाच हेतू आहे. त्या उद्देशा नुसार पहिला प्रश्न:


१) तुम्हाला तुमच्या लायकी प्रमाणे सरकार आणि राजकीय नेते मिळतात असं तुम्हांला वाटतं का? 

    खालील पैकी एक पर्याय निवडा:  

    अ) होय       

    ब) नाही   

    क) हा खूप गहन प्रश्न आहे ज्यावर विचार करायला माझ्याकडे पुरेसा वेळ नाही कारण लग्न -मुंजी, सण -समारंभ, व्हॉट्स 

         ऍप -फेसबुक सारखी माध्यमं यात माझा बराच वेळ खर्च होतो. 


२) राज्यात सरकार चालवणाऱ्या नेत्यांनी कोणाला कमी गांभीर्याने घ्यावं असं तुम्हांला वाटतं? 

    खालील पैकी हवे तेवढे पर्याय निवडा:

  अ ) अरुणाचल, हिमाचल किंवा तत्सम कुठल्यातरी प्रदेशातून आलेल्या नटीच्या चिवचिवाटाला.     

  ब ) दुसऱ्यांच्या घरासमोर उभं राहून मारुती स्तोत्र म्हणणाऱ्यांना.    

  क) एखाद्या व्यक्तीच्या आजारपणाची असंवेदनशील हेटाळणी करणारी कोणा कवीची कविता  -

       बऱ्याच लोकांना खटकेल आणि टीकेस पात्र ठरेल याची जाणीव असल्या कारणाने - आपल्या 

       सोशल मीडियावर चिकटवून प्रसिद्धी मिळवू पहाणाऱ्या माजी नटीला.  

  ड ) या पैकी कोणालाही नाही. 

  इ) या बाबतीत माझं काही ठाम मत नाही. 


३) पुराण काळात ऋषी -मुनींची तपश्चर्या भंग करण्यासाठी अप्सरांना त्या कामगिरीवर पाठवण्यात येत असे. प्रसार माध्यमे 

    आणि राजकीय नेते थोड्याफार आकर्षक दिसणाऱ्या (पर्यायाने मनोरंजनाच्या व्यवसायात काम करणाऱ्या) महिलांच्या

    बोलण्याला आणि वागण्याला नको तितकं महत्व देतात असं तुम्हांला वाटतं का? 

    खालील पैकी एक पर्याय निवडा:   

    अ) होय, उगीचच जास्त महत्व देतात असं वाटतं  

    ब ) नाही, योग्य तितकंच महत्व देतात असं वाटतं. 

    क) या बाबतीत माझं काही ठाम मत नाही. टाईम पास म्हणून हे ठीक आहे. 


४) प्रसार माध्यमे हा लोकशाही शासन पद्धतीचा एक प्रमुख आधार स्तंभ मानला जातो. ही माध्यमे आपलं काम चोख 

    पणे पार पाडत असोत किंवा नसोत, राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांनी दररोज त्यांच्याशी सवांद साधणं गरजेचं आहे असं 

    तुम्हांला वाटतं  का? 

    खालील पैकी एक पर्याय निवडा: 

    अ) होय, कारण तो माझ्या रोजच्या मनोरंजनचा आवडता कार्यक्रम आहे. 

    ब) नाही, उगीच वायफळ बडबड करण्यात वेळ दवडू नये.  

    क) या बद्दल माझं काही ठाम मत नाही. 

  

५) जनतेच्या हिताची कामे करण्यासाठी दिवसाचा कुठला प्रहर योग्य आहे असं तुम्हांला वाटतं? 

    खालील पैकी हवे तितके पर्याय निवडा:    

    अ) मध्यरात्रीचा दाट अंधार कारण तेंव्हा बहुसंख्य लोक गाढ झोपलेले असतात. 

    ब)  भली पहाट जेंव्हा बहुतांश लोक साखर झोपेत असतात. 

    क) दिवसा उजेडीचा लख्ख सूर्यप्रकाश जेंव्हा जे काय चाललं आहे ते जनतेला स्पष्ट दिसु शकतं. 

    

६) अंधारात घडणाऱ्या धक्कादायक राजकीय नाट्यांना २१ व्या शतकातील तुमच्या आधुनिक, सुशिक्षित, कायदा 

     आणि सुव्यवस्था प्रिय राज्यात / शहरात / आणि आयुष्यात स्थान आहे असं तुम्हांला वाटतं का?  

     खालील पैकी एक पर्याय निवडा:

    अ) होय, आहे.     

    ब) नाही, कारण रात्री गूढ सावल्यांचा खेळ चालतो. 

    क) या बद्दल माझी काही ठाम भूमिका नाही परंतु आपण रात्री शांत झोपलेले असताना राज्यात काही राजकीय उलथापालथ 

         घडू शकते हा विचार काळजी वाटायला लावणारा आहे. त्याचा लोकांच्या झोपेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. 

         त्यांना असुरक्षित वाटू शकतं. 

         

७) एखाद्या नेत्याने पुन्हा पुन्हा तीच चूक केली तर त्या नेत्याला आणखी किती वेळा संधी देण्यात यावी असं तुम्हांला 

     वाटतं?

     खालील पैकी एक पर्याय निवडा.  

     अ) जे दोनदा झालं ते तिसऱ्यांदा होऊ शकतं त्यामुळे दोन पेक्षा जास्त वेळ संधी देण्यात येऊ नये. 

     ब) या बद्दल माझं काही ठाम मत नाही. 

     क) धक्कादायक राजकीय नाट्यांना चूक म्हणणं चूक आहे. या चुका नाहीत तर ऐतिहासिक काळात 

          देशाबाहेरून आलेल्या परकीय शत्रूंविरुद्ध स्थानिक राजांच्या सैन्यांनी वापरलेली युद्धाची तंत्र आहेत. त्या तंत्रांना 

          पुनरुज्जीवित करू पाहणाऱ्यांना पुन्हा पुन्हा संधी द्यायला काही हरकत नाही. 


८) देश स्वतंत्र झाल्या नंतर सुरवातीच्या काळात देशाचं नेतृत्व करणारे नेते हे देशातील किंवा परदेशातील विद्यापीठात 

   शिक्षण घेतलेले होते. सध्या संपूर्ण जगावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं साम्राज्य पसरलेलं असताना आपले राजकीय नेते हे   

   देशातील रस्त्यांवर जे पारंपारिक व्यवसाय केले जातात - वडापाव विकणे, भाजी विकणे वगैरे क्षेत्रातुन आलेले   

   दिसतात. हा बदल देशासाठी चांगला आहे कि वाईट असं तुम्हांला वाटतं? 

   एक पर्याय निवडा:

   अ) नक्कीच ही upward mobility देशासाठी फार चांगली आहे कारण जितके वडापाव किंवा भाजी विकणारे 

       राजकारणात जातील त्यांची जागा दुसऱ्या कोणाला तरी मिळू शकते.  

   ब) हा बदल थोडा चिंताजनक आहे कारण वडापाव आणि भाजी विकणाऱ्यांची पुढची पिढी तयार नसेल तर 

       समाजाला ते घातक ठरू शकतं. 

   क) या बद्दल माझं काही ठाम मत नाही. 


९) येणाऱ्या काळात तुमच्या शहरावर कुठल्या संस्कृतीचा प्रभाव असावा असं तुम्हांला वाटतं?

    खालील पैकी हवे तेवढे पर्याय निवडा: 

    अ) मराठी संस्कृती 

    ब) बॉलिवूड

    क) पाश्चिमात्य संस्कृती 

    ड ) देशाच्या इतर राज्यातुन आलेली संस्कृती 

    इ ) आमच्या शहरातील आणि राज्यातील संस्कृतीची दिशा ठरवण्यास आता आम्ही सर्वस्वी असमर्थ आहोत. जे काही  

         होईल ते गप्प बसुन बघणे आणि येणारे बदल असहाय्यपणे स्विकारणे या खेरीज आमच्या हातात आता काही 

         उरलेलं नाही. 


१०) तुमच्या शहरात किंवा तुम्ही रहाता त्या ईमारतींमध्ये मांसाहारावर आणि मांसाहारी उपाहारगृहांवर बंदी घालण्यात आली  

      तर तुम्हांला आवडेल का?

     अ) अजिबात आवडणार नाही 

     ब) संपूर्ण देश कधी एकदा शाकाहारी होतोय याची आम्ही वाट पहातोय  

     क) हा फार गंभीर प्रश्न आहे ज्याकडे मी आजवर सोयीस्करपणे कानाडोळा केलेला आहे कारण माझा बराचसा वेळ रोज 

          सकाळी बाजारात जाऊन ताजे मासे, मटण, कोंबडी आणणे आणि त्याचे कालवण करून खाण्यात जातो. 

    

११) तुमच्या शहरात आणि राज्यात जास्त महत्व कुठल्या गोष्टीला असावं असं तुम्हांला वाटतं?

     खालील पैकी एक पर्याय निवडा:

     अ) तुमची भाषा 

     ब) तुमचा धर्म 

     क) दोन्ही 

     ड ) दोन्ही नाही 

     इ) या प्रश्नावर विचार करण्याची किंवा दोन्ही पैकी एक निवडण्याची मला आजवर कधी गरज भासलेली नाही. 


१२) घराणेशाही विरोधी बंड जर एका प्रादेशिक पक्षात यशस्वी होऊ शकतं तर त्याची पुनरावृत्ती राष्ट्रीय स्तरावरील    

     पक्षात करता येईल असं तुम्हांला वाटतं का? 

     एक पर्याय निवडा:

     अ) होय 

     ब) नाही 

     क) सांगणं अवघड आहे. 


१३) तुमच्या राज्याचा समृद्ध इतिहास बघता राज्यातील राजकीय नेत्यांनी आजवर राष्ट्रीय पातळी वरील राजकारणात 

      राज्याच्या योग्यते नुसार पुढाकार घेतला आहे असं तुम्हांला वाटत का? 

      एक पर्याय निवडा: 

      अ) होय 

      ब) नाही

      क) या बद्दल मी कधी विचार केलेला नाही.  

 

१४) तुमच्या राज्यातील शिस्तबद्धता, कायदा आणि सुव्यवस्था, कला - खेळ -समाज सुधारणा या सारख्या क्षेत्रात फार मोठी 

      कामगिरी बजावणारी उत्तुंग व्यक्तीमत्व बघता तुमच्या राज्यांनी देशाचं नेतृत्व आणि मार्गदर्शन करण्याची वेळ 

     आली आहे असं तुम्हाला वाटतं का? 

      एक पर्याय निवडा:

      अ) होय 

      ब) नाही

      क) या बद्दल मी कधी विचार केलेला नाही. 


१५) एखादी व्यक्ती किती काळ खुर्चीत बसु शकते हे कशावर अवलंबून आहे असं तुम्हाला वाटतं? 

       हवे तितके पर्याय निवडा:

     अ) त्या व्यक्तीच्या खुर्चीत बसण्याच्या क्षमतेवर. 

     ब) त्या व्यक्तीला खुर्चीतुन ढकलून ती खुर्ची बळकावू पहाणाऱ्या व्यक्तीच्या क्षमतेवर.  

     क) खुर्ची किती मऊ किंवा टणक आहे यावर ते अवलंबून आहे.    

     क) कोणी, कुठे, किती वेळ बसायचं हे ठरविणारे आपण कोण. ते ठरविणारा वर बसला आहे. 

     ड ) इतर कारणांवर ( हा पर्याय निवडला तर कारण वीषद करा).  


१६) चोवीस तास चालू असणारे टीव्ही वरील कार्यक्र्म हा मानवजातीला लागलेला शाप आहे. त्या ऐवजी ७० च्या 

      दशकाप्रमाणे दिवसातून फक्त काही तास टीव्ही वर कार्यक्रम दाखवले जावेत आणि इतर वेळी टी व्ही बंद असावा असं 

      तुम्हांला वाटतं का? 

      अ) होय, नक्कीच. माझ्या आवडीच्या मालिका वगळता टी व्ही वरचे इतर कार्यक्रम बकवास असतात.  

           ते बंद व्हायला हवेत.   

      ब) नाही, दिवसरात्र टीव्ही नसेल तर विरंगुळ्या अभावी माझं डोकं फिरण्याची शक्यता संभवते.  

      क) कालचक्र मागे फिरवून टी व्ही चे तास कमी करण आता शक्य होईल असं वाटत नाही.  







Wednesday, April 6, 2022

Go उपचार केंद्र


काही वर्षांपूर्वी एक मुलाखत बघत होते. गायींच्या गोठ्यातुन फिरत मुलाखत चालली होती. एका गायीपाशी थांबून तीच्या पाठीवर हात फिरवत मुलाखत देणारी व्यक्ती टी व्ही वाहिनीच्या वार्ताहाराला म्हणाली,  "गायीच्या पाठीवरून हात फिरवल्याने रक्तदाब नियंत्रित होतो. कर्करोगावर उपचार करण्यासाठीही गायीचा उपयोग होऊ शकतो." 

ते ऐकल्यावर डोळ्यासमोर एक चित्र उभं राहीलं. चित्रात असं दिसलं कि सरकार तर्फे शहरात जागोजागी Go उपचार केंद्र उभारण्यात आली आहेत. एक- दोन केंद्रांमध्ये तर मी स्वतः जाऊन आले आहे असं वाटलं: प्रभादेवीतील आप्पासाहेब मराठे मार्गावरचं हंडेय आणि हॉंडाच्या शोरूमच्या खांद्याला खांदा लावून उभं असलेलं हम्मा उपचार केंद्र आणी थोडं पुढे पेडर रोडवर लॅम्बर्गिनी आणि बुगाटीच्या शोरूमच्या मध्ये झळकणारं दुसरं. 

गाड्यांच्या शोरूम प्रमाणेच Go उपचार केंद्रांच्या भिंती काचेच्या होत्या. शोरूम मध्ये गाड्या पार्क केल्या होत्या अगदी त्याच प्रमाणे गो उपचार केंद्रात गायी उभ्या होत्या. तिथून पुढे मात्र उपचार केंद्र थोडं वेगळं दिसत होतं. प्रत्येक गायी शेजारी उपचार करून घ्यायला येणाऱ्या व्यक्तीला बसण्यासाठी जागा होती. गोमूत्र आणि शेण या दोन्हीचा उपचार पद्धतीत वापर होत असल्याने एखाद्या गायीने शेण किंवा गोमूत्र दिलं कि तात्काळ ते शास्त्रोक्त पद्धतीने साठवलं जात होतं. 

परंतु गायींच दूध मात्र बऱ्यापैकी बदनाम झालेलं दिसलं. केंद्राच्या बाहेर रस्त्याच्या कडेने उभ्या असलेल्या उंच जाहिरातींच्या फलकांवर वेगवेगळ्या वनस्पतीजन्य दुधांच्या जाहिराती होत्या. एक फलक बाजारात नव्यानेच आलेल्या बदामाच्या दुधाची जाहिरात करत होता. दुसऱ्यावर सोयाबीन पासुन बनवलेल्या दुधाची जाहिरात होती. त्या फलकावर एका बाजूला गायीचं चित्र होतं आणि दुसऱ्या बाजूला सोयाबीनचं चित्र होतं आणि गायीच्या दुधापेक्षा सोयाबीनचं दूध कसं सरस असतं याचं तुलनात्मक वर्णन होतं. तिसऱ्या फलकावर ओट्सच्या दुधाची जाहिरात होती. आणखी एका मोठ्ट्या फलकावर शहरात नव्यानेच सुरु झालेल्या व्हीगन रेस्टोरंटची जाहिरात होती. पनीर टिक्का असो, बटर चिकन असो कि मलाई कोफ्ता, आईस्क्रीम असो कि खीर आमच्या कुठल्याच पदार्थामध्ये गायी -म्हैशींच्या दुधाचा (किंवा खऱ्या कोंबडीचा) लवलेशही तुम्हांला सापडणार नाही असं त्या जाहिरातीत मोठ्या अभिमानानी नमूद केलं होतं. 

साऱखी-सारखी आपल्या दुधाची इतर दुधांशी तुलना करून आपल्या दुधाला निकृष्ट दर्जाचं म्हणून हिणवलं जातंय हे गायींच्या मनाला खूप लागत होतं. पण बिच्चारं मूक जनावर ते. करणार तरी काय. आपल्या मनातली खंत सांगणार तरी कोणाला आणि कशी. या विषयी म्हैशींशी बोलता आलं तर आपल्या दुःखाचा भार थोडा हलका होईल असं त्यांना वाटलं. परंतु उपचार केंद्रात म्हैशी नव्हत्या. मात्र गायींच्या मनातील चलबिचल केंद्रात काम करणाऱ्या एका चाणाक्ष सेविकेनी हेरली होती. गायींच्या मानसोपचारात प्रवीण असलेल्या तज्ञांना त्यांचं सांत्वन करण्यासाठी नियमित बोलवावं कि काय असं तिला वाटू लागलं.  

आजकाल आपलं दूध आणि मांस दोन्ही वर्ज्य मानलं जातंय अशी कुणकुण गायींच्या कानावर पूर्वी आली होती पण बाहेर लावलेल्या जाहिरातीं मध्ये त्याचा प्रत्यक्ष पुरावा बघून त्यांच्या दुःखात भर पडली. काचेच्या भिंतींच्या बाहेर नजर टाकण्याची त्यांची हिम्मत होईना. बाहेर बघितलं आणि नवीनच कुठल्यातरी दुधाची किंवा व्हीगन रेस्टोरंटची जाहिरात दिसली तर आपलं आपल्या रक्तदाबावरचं नियंत्रण सुटेल कि काय असा विचार त्यांच्या मनात डोकावला. बाहेर बघणं त्या टाळू लागल्या. 

नाही म्हणायला उपचार केंद्राच्या माध्यमातुन लोकांनां आपला उपयोग होतोय ह्याचा गायींना आनंद झालेला दिसला. आपण अगदीच निरुपयोगी प्राणी नाही, समाजाला आपली गरज आहे ही भावना त्यांना सुखावत होती. नियमित उपचारांसाठी केंद्रात येणाऱ्या लोकांबद्दल त्यांना आत्मीयता वाटू लागली होती. कोण कुठ्ल्या दिवशी कुठल्या वेळी येतं हे ही आता त्यांच्या पैकी काहींच्या लक्षात राहू लागलं होतं. 

इस्त्रीचे शर्ट- पॅन्ट घातलेला एक ईसम हातात ऑफिसची बॅग घेऊन सकाळी खूप लवकर घाई - गडबडीत येतो. कमीत कमी दहा मिनिटांचं सेशन घ्यावच लागतं म्हणून घेतो पण जेमतेम पाच मिनिटं आपल्या पाठीवरून हात फिरवतो. त्यातही सारखं घड्याळाकडे बघत असतो. निघायच्या आधी गडबडीत आपल्याला चारा घालायला मात्र विसरत नाही आणि आला तसाच धावत पळत स्टेशनच्या दिशेने चालू पडतो हे कृष्णा गायीच्या सवयीचं झालं होतं.  

गायींना एका पेक्षा एक सुंदर नावं होती  - कृष्णा, गोदावरी, नर्मदा, सरस्वती वगैरे. केंद्रातील वातावरण प्रसन्न रहावं आणि तिथे शांतता राखली जावी या करणास्तव फोनवर बोलण्यास मनाई होती. 

केंद्रा पासून जवळ असलेल्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांची आई शाळा सुटायच्या थोडी आधी येते; वेळ असेल त्याप्रमाणे कधी दहा तर कधी पंधरा मिनिटांचं सेशन घेते; नियमा नुसार ती आपला फोन सायलेंट ठेवते पण तिचे दोन्ही हात आणि डोळे सतत फोन मध्ये गुंतलेले असतात; गो- सेवक आठवण करून देतात तेवढ्या पुरताच तिचा हात आपल्या पाठीवरून फिरतो आणि सेवकांच लक्ष नसलं कि परत फोन कडे वळतो हे सरस्वती गायीच्या लक्षात आलं होतं. 

काही लोकांनी केंद्राला विंनती केली होती कि त्यांनी पाच मिनिटांचं मिनी सेशन उपलब्ध करून दयावं. दहा मिनिटं गायीच्या पाठीवरून हात फिरवत बसणं त्यांना जड जात होतं. पण इच्छा असुनही आर्थिक दृष्ट्या उपचार केंद्राला ते परवडण्या सारखं नव्हतं. जरी केंद्राचा उद्देश्य नफा कमावणं हा नसला तरी त्यांना त्यांची काही आर्थिक गणितं सांभाळावी लागत होती. गायींची आणि केंद्राची स्वच्छता राखणे हे खूप महत्वाचं काम होतं ज्यासाठी भरपूर सेवकांची गरज होती. सेवकांचे पगार शिवाय जागेचं भाडं हे मोठे खर्च त्यांना होते.   

दुपारी केंद्र शांत असायचं. त्यावेळी संसारातुन निवृत्त होऊ पहाणाऱ्या दोन महिला यायच्या. शेजारी शेजारी उभ्या असलेल्या नर्मदा आणि गोदावरीच्या जवळ बसून त्या प्रेमाने त्यांच्या पाठीवरून हात फिरवायच्या. पण जसे त्यांचे हात चालायचे तितकंच त्यांचं तोंडही चालायचं. खरतर केंद्रात बोलणे आणि खाणे या दोन्ही क्रियांना मनाई होती पण नियमांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत त्या आपसात अखंड बडबड करत बसायच्या. तसंच त्या दिवशी घरी काही विशेष खाद्य पदार्थ केले असतील तर त्यांचीही आपसात देवाण- घेवाण करायच्या. बहुतेक वेळा तरुण गो -सेवक वडीलधाऱ्या महिलांच्या नियमभंगाकडे दुर्लक्ष करायचे. क्वचित कधीतरी त्यांना तंबीही द्यायचे.    

अशा प्रकारे गो उपचार केंद्र त्या परिसराचा एक भाग बनून गेलं. परंतु जितकी उपचार - इच्छुकांची संख्या वाढली तसं केंद्र चालकांना काही समस्या जाणवू लागल्या. पहिली आणि फार महत्वाची अडचण हि होती कि गायींचं आपल्या शरीर स्वच्छतेच्या क्रियांवर काही नियंत्रण नव्हतं. काळवेळ न पहाता, आपल्या शेजारी कोणी बसलं आहे किंवा नाही याचा जराही विचार न करता त्या मलमूत्र विसर्जन करून मोकळ्या होत असत.  

त्यावर तोडगा शोधून काढण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. समितीनी तीन वेगवेगळ्या मार्गानी या समस्येचा विचार करायला सुरवात केली. पहिला उपाय म्हणजे लहान मुलांप्रमाणे गायींसाठी ऑरगॅनिक, डिस्पोजेबल आणि बायो डिग्रेडेबल लंगोट वापरता येतील का? दुसरा उपाय - शहरातील पाळीव कुत्र्यांना जसं त्यांच्या सु -शी साठी ठराविक वेळी घराबाहेर नेलं जातं तसं गायींना नेता येईल का? किंवा दरवेळी त्यांना केंद्राबाहेर नेणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी केंद्रातच शौचालय बांधून दिवसातून ठराविक वेळी त्यांना तिथे नेता येईल का? पहिले दोन्ही उपाय यशस्वी झाले नाहीत तर गायींच्या आहारात बदल करून, त्यांना काही रासायने  देऊन त्यांच्या नैसर्गिक क्रिया नियंत्रणा खाली आणता येतील का? 

खास नेमण्यात आलेली समिती अशा काही उपाय योजनांचा विचार करीत आहे हे गायींच्या गावीही नव्हतं. केंद्रात येणाऱ्या उपचार -इच्छुकांची आवक जावक दिवसागणिक वाढत होती. एक आयुर्वेदाचार्य आता केंद्राचा भाग बनले होते. ते नाडी परीक्षेत निष्णांत होते. लहानां पासुन ते थोरां पर्यंत सर्व वयाचे लोक त्यांच्याकडे आरोग्यविषयक सल्ला घेण्यासाठी येत. आयुर्वेदाचार्य त्यांना काढे किंवा आहारात बदल सुचवुन त्यांच्या समस्यांचं निराकरण करीत. तपासून घ्यायला आलेल्या व्यक्तीची नाडी परीक्षाकरून त्या व्यक्तीनी आपल्या आहारात कुठल्या पदार्थांचा समावेश करावा किंवा करू नये या विषयी सल्ला देत. केंद्राची वाढती लोकप्रियता  बघून गायी समाधानी होत्या. आपलं दैनंदिन आयुष्य खूप सुरळीत आणि सुरक्षित चाललंय असं त्यांना  वाटलं. 

एक दिवस दुसऱ्या कुठल्यातरी भाषेतील एक शब्द गायींच्या कानावर पडला. प्रथमतः त्यांना तो थोडा परिचित वाटला. मग तो शब्द पुन्हा पुन्हा कानावर पडत राहिला. हंडेय आणि हॉंडाच्या शोरूम खूप लोकप्रिय होत्या. तिथे वाहन खरेदीसाठी आलेले नवरा -बायको किंवा मित्र -मैत्रिणी गाड्या बघून झाल्या कि घटकाभर उपचार केंद्रात गायींच्या सान्निध्यात विसावत असत. त्यांच्या बोलण्यातून - "आपली दुसरी (किंवा तिसरी) गाडी हंडेय असावी कि हॉंडा का त्यापेक्षा टोयोटा करोला जास्त चांगली" - अशी चर्चा अधुन मधून गायींच्या कानावर पडत असे. गायींना वाटलं शेजारी करोलाची शोरूम उघडली असावी. 

मग आणखीही बरेच वेगवेगळे आधी कधी न ऐकलेले शब्द त्यांना ऐकू येऊ लागले. तेंव्हा कुठे -हे प्रकरण काहीतीर वेगळं दिसतंय, याचा गाड्यांशी काही संबंध दिसत नाही हे गायींच्या लक्षात आलं. केंद्रा समोरच्या रुग्णालयातील धावपळ दिवसागणिक वाढताना दिसु लागली. उवचार केंद्रातील वर्दळ मात्र हळुहळु कमी होत होती. 

एक दिवस काही लोक केंद्राची पहाणी करायला आले. गायींना दुसरीकडे हलवलं तर अमुक इतक्या रुग्णांची इथे सोय करता येईल आणि रुग्णालयातील रुग्णांची गर्दी थोडी कमी होईल असं ते म्हणाले. आपसात विचार विनिमय करून त्यांनी गायींना हलवण्याचा दिवस ठरविला. 

नेहमी येणारे उपचार - इच्छुक केंद्रात फोन करून गायींना तिथुन न हलवण्या विषयी विनवण्या करू लागले. केंद्रातील सेवक पुन्हा पुन्हा तेच तेच दुसऱ्या भाषेतील शब्द वापरून केंद्र बंद करणं कसं आवश्यक आहे ते पटवून देत होते.

गायी हे सगळं मुकाट्याने बघत होत्या. केंद्रातील सेवकांना ते वापरत असलेल्या शब्दां विषयी फारसं काही माहित नाही, त्यांचा त्या विषयाचा काहीही अभ्यास नसताना केवळ कोणाकडून तरी ऐकलेले शब्द ठासुन ते इतरांना सांगत आहेत हे गायींना ठाऊक होतं. साक्षात मृत्यु सभोवती थैमान घालताना बघितल्यावर लोकांची मन सैरावैरा पळू लागली आणि स्थानिक, पारंपारिक उपचार पद्धतीचा निषेध करत दुसऱ्या भाषेच्या वेष्टणात गुंडाळून आलेल्या उपचार पद्धतीचा त्यांनी निव्वळ अवलंबच नाही तर त्वेषाने प्रचार आणि प्रसार जराही न कचरता कसा डोळे झाकून केला हे गायींनी बघितलं. जे कोणी आपल्याला जिकडे कुठे नेतील त्यांच्या बरोबर जाण्याची त्यांनी मनाची तयारी केली. 

ज्या दिवशी गायींना घेऊन जाणार होते त्या दिवशी त्यांच्या विषयी कळकळ वाटणारे काही तुरळक लोक धावत पळत केंद्रा बाहेर जमले. गायींना नेऊ नका म्हणून पुन्हा पुन्हा विनवण्या करू लागले. पण रुग्णालया बाहेर जमलेल्या जमावानी गो-उपचार इच्छुकांना तिथुन हकलून लावलं. जास्त आग्रह धरला तर आपल्यावर दगडफेक होईल कि काय या भीतीनी गोप्रेमींनी आपापल्या गायीचा लांबून निरोप घेत तिथुन काढता पाय घेतला. 

हम्मा उपचार केंद्राच्या जागी आता बहुतेक करोलाची शोरूम येईल आणि लॅम्बर्गिनी आणि बुगातीच्या शेजारी फरारीची.