Monday, January 13, 2014

गमन


                             

दूरदर्शनवरचा फारुख शेख आठवतो? स्टेजवर मांडी घालून बसून युवकांसाठी हिंदीतून कार्यक्रम करायचा. तो स्वतःही तेंव्हा कॉलेज-वयीन तरुण असवा. गडद रंगाची बेल बॉटम विजार. पांढरट रंगाचा लांब बाह्यांचा शर्ट - इन केलेला. सरळ लांब केस. आणि भाषेवर प्रभुत्व. छान  कार्यक्रम असायचे. दूरदर्शन तेंव्हा रंगीत नव्हता.

तो आणि स्मिता पाटील- दूरदर्शनच्या मार्गानी हिंदी चित्रपटसृष्टीत येउन दोघांनी काही अतिशय शांत, सुंदर सिनेमात काम केली. त्या दोघांच्या भूमिका असलेला मुजफ्फर अलींचा गमन तर तेंव्हा मी कित्तीतरी वेळा व्हिडीओवर बघितला होता. उत्तर भारतातून नोकरीसाठी मुंबईत येउन टक्सी चालकाच काम करणारा फारुख शेख आणि गावाकडे राहून त्याच्या आईला सांभाळणारी त्याची बायको स्मिता पाटील. त्यातलं आपकी याद आती रही रातभर हे गाणं मी बऱ्याच वर्षांनी पुन्हा ऐकलं तेंव्हा ते आवडायला लागलं, पण फारुख शेखची टक्सी मुंबईभर फिरतानाच सुरेश वाडकरांच्या आर्त स्वरातलं सीनेमें जलन आखोंमे तुफांसा क्यो है  हे तेंव्हाच खूप आवडलं होतं. तशा प्रकारच्या सिनेमांना पूर्वी आर्ट फिल्म किंवा समांतर सिनेमा म्हणायचे; नेहमीच्या हिंदी सिनेमांच्या नाच-गाण्याच्या फॉर्म्युल्यापेक्षा ते वेगळे असायचे. हल्ली करण जोहर आणि फराह खानच्या सिनेमांच्या गदारोळात समांतर सिनेमा हरवलेले दिसतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे फारुख शेखवरील मरणोत्तर लेखांमध्ये मुंबईतल्या एकाही वर्तमानपत्रानी त्यांच्या कॅमेऱ्या समोरील कारकिर्दीची सुरवात कृष्ण-धवल दूरदर्शनपासून झाली ह्याचा उल्लेख केला नाही. अलीकडच्या काळातील त्यांचा टीव्ही शो जिना इसीको कहते है चा उल्लेख सगळ्या ऑबीच्यूअरीत होता; सई परांजपेंच्या कथा आणि चष्मेबद्दूरबद्दल सगळ्यांनी लिहीलं; बाझार आणि गमनचा ओझरता उल्लेख केला, पण दूरदर्शनच नाव नाही. त्याला दूरदर्शनवर पाहिलेली मीच एक शिल्लक उरलेय कि काय असं मला वाटायला लागलय. अर्थातच त्या जुन्या कार्यक्रमाचा बॉलिवूडशी काही संबंध नव्हता. ज्या कार्यक्रमात हिंदी चित्रतारकांचा सहभाग नसतो ते कार्यक्रम आजकाल लोकांच्या खिजगणतित उरत नसावेत.

त्यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी पेपरात वाचली तेंव्हा वाईट वाटलं, धक्का बसला. ते पासष्ट वर्षांचे होते. आजारीही नव्हते. कुटुंबियांसमवेत सुट्टीत दुबईला गेले असताना अचानक गेले. ९०च्या दशकातले त्यांचे सिनेमा किंवा टीव्ही शो मी फारसे बघितले नाहीत पण कथा, चश्मेबद्दुर, गमन, बाझार, उमरावजान, शतरंज के खिलाडी पुन्हापुन्हा बघितले होते, एन्जॉय केले होते. ह्या सगळ्या सिनेमांच्या छान आठवणी मनात आहेत. म्हणूनच त्यांच्या इतक्या लवकर जाण्याचं वाईट वाटतं. सिनेमाच्या, 'स्व'ला पूढे करण्याच्या, दुनियेत वावरत असूनही उगीच आपलं तुणतुणं न वाजवता आपल्या आवडीचं काम करत रहायचं ह्याच ते उत्तम उदाहरण होते. त्यांच्या कामाव्यतिरिक्त इतर कुठल्याही संदर्भात त्यांच्याबद्दल कधी काही छापून आलं नाही. कुठल्यातरी पार्टीतले, समारंभातले आपले, आपल्या कुटुंबियांचे फोटो पेपरात छापून आणायचे असले उद्योग त्यांनी काधी केले नाहीत. जितक्या शांत, भारदस्तपणे ते जगले तितक्याच शांतपणे गाजावाजा न करता गेले. गेली वीस वर्ष ते शबाना आझमीबरोबर रंगभूमीवर सादर करत असलेल्या तुम्हारी अमृताचा प्रयोग बघता आला नाही ह्याची चुटपूट वाटते.

२०१३च्या शेवटी फारुख शेख गेले. नवीन वर्ष सुरु झालं. मुंबईतली आमची सुट्टी संपायला आली. आणि न्यूयॉर्क मधून कडाक्याच्या थंडीच्या बातम्या यायला लागल्या. सुरवातीला त्यात विशेष काही वाटलं नाही. जानेवारीत न्यूयॉर्कमध्ये नेहमीच कडाक्याची थंडी असते. त्यात काय विशेष. शिवाय मुंबईतल्या उबदार थंडीचा आणि फडफडीत तळलेल्या बोंबलांचा यथेच्छ आस्वाद घेऊन मी माझ्या batteries चार्ज करून घेतल्या होत्या. न्यूयॉर्कच्या थंडगार जानेवारी- फेब्रुवारीला तोंड द्यायला त्या सहज पुरतील असं वाटलं.  "Polar vortex... पोलर व्होरटेक्स", अशी भुणभुण माझ्या कानाशी कोणतरी (?) करत होतं. पण परतायच्या आधीची कामं संपवायच्या गडबडीत त्या शब्दांचा अर्थ शोधायचा प्रयत्न मी केला नाही. एरवीही कुठल्याही जागतिक संकटाविषयीची घरातली भुणभुण मग ते (वास्तविक/काल्पनिक) संकट राजकीय असो, आर्थिक वा पर्यावर्णीक, जोपर्यंत संकट माझ्या दाराशी येउन ठेपत नाही तोपर्यंत दुर्लक्षिलेलीच बरी असं मला वाटतं. तसं शेवटी ते दाराशी आलंच. न्यूयॉर्कमधल्या गोठवणाऱ्या थंडीमुळे आमचं मुंबईहून ठरलेलं हवाई उड्डाण दोनदा रद्द झालं. दुसऱ्या वेळेस तर, आम्हाला तीन तास विमानात बसवून खाली उतरवल्यावर, मी घरी परतायच्या भानगडीत पडले नाही. उड्डाण कंपनीनं सांगितलेल्या उड्डाणतळाजवळच्या हॉटेलात रहिलो.  Batteryतला चार्ज विलंबाला तोंड देताना मुंबईतच संपतो कि काय असं वाटायला लागलं.

शेवटी, नेहमीपेक्षा वेगळ्या वेळी का असेना विमान एकदाच सुटलं! वेळ वेगळी होती म्हणून कि काय, पण नेहमी एखाद-दोन सिनेमे बघून होतात ह्यावेळी तीन बघितले; एक हिंदी- भाग मिल्खा भाग - मुलानी रेकमेंड केला म्हणून- त्यानं मुंबईला जाताना तो बघितला होता; दुसरा वाजदा नावाचा छान सौदी अरेबियन; आणि तिसरा जेम्स गन्डोल्फिनी आणि ज्युलिया लुई ड्रायफसचा इनफ सेड.  साईनफेल्ड ह्या ९०च्या दशकात गाजलेल्या सीट-कॉममध्ये एलनच काम केलेली ड्रायफस आणि HBOच्या, मागच्या दशकात नावाजलेल्या, न्यूयॉर्क/न्यूजर्सीतील इटालियन माफियावरच्या, सप्रानोज ह्या शोमध्ये मॉब बॉस टोनी सप्रानोच काम केलेला गन्डोल्फिनी. सिनेमा चांगला आहे. थोडासा वूडी अलन टाईप. अमेरिकन मध्यमवयीन, मध्यम- वर्गीय घटस्फोटीत जोडपी, त्यांचे आपसातील संबंध वगैरे.

घरी आले तरी मनात त्या सिनेमाचे विचार घोळत होते. नकळत गन्डोल्फिनी आणि फारुख शेखची तुलना होत होती. फारुख शेखप्रमाणे गन्डोल्फिनीहि नाटक, टीव्ही ह्या मार्गांनी सिनेमात आले. दोघांची शरीरयष्टी साधारण सारखीच. गन्डोल्फिनी जास्त उंच असतील. मागल्या वर्षी कुठल्याशा फिल्म समारोहानिमित्त ते कुटुंबियां समवेत इटलीला गेले आणि अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानी तिथेच वारले. पन्नास वर्षांचे होते.  फारुख शेख गेल्यावर जे वाटल तेच गन्डोल्फिनी गेल्याच वाचल्यावरही वाटलं होतं - इतक्या लवकर जायला नको होते. अजून काही वर्ष सिनेमात, टिव्हीवर त्यांना बघायला आवडलं असतं.


No comments:

Post a Comment