Sunday, January 26, 2014

प्रभादेवी कि अप्पर वेस्ट साईड

गेल्या दहा-बारा वर्षात प्रभादेवीचा चेहरा-मोहरा बदललाय…बदलतोय. सगळीकडे नवीन इमारती बांधल्या जातायत. जुन्या वाड्या आणि बैठी घरं जाऊन त्या जागी उंच टोवर उभे रहातायत. कन्स्ट्रक्शन बूम चालू आहे. नवीन तयार होणाऱ्या टोवर्स मध्ये अपार्टमेंट्स तर अंतरराष्ट्रीय दर्जाची असतातच शिवाय खालचे पाच- सहा मजले केवळ कार पार्किंग साठी ठेवलेले असतात.

२०व्या शतकातून २१व्या शतकात शिरताना आम्ही तिथे अपार्टमेंट घेतलं तेंव्हा आमची गल्ली बरीच गचाळ होती. समुद्रावरच्या काही मोठ्या इमारती सोडल्या तर गल्लीच्या तोंडाशी एक पडायला आलेली चाळ, मध्येच झोपड्या, रान वाढलेला रिकामी प्लॉट होता. एका कोपऱ्यावर कचऱ्याचा ढीग साठत असे. त्याच्या समोरच्या बाजूला, रस्त्याच्या कडेच्या भिंतीच रुपांतर लोकांनी सार्वजनिक मुतारीत करून ठेवलं होतं. ते ओघळ वहात रस्त्यावर येत. रस्त्यावरून चालायची सोय नव्हती.

बॉम्बे डाईंगच्या वाडीयांचा जुना, मोठ्ठा बंगला त्या गल्लीच्या शेवटी समुद्रावर आहे. त्यांच्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी बांधलेली एक सुंदर इमारत त्याशेजारी आहे. पण वाडीयासाहेब एकतर जास्त त्या घरात रहात  नसावेत किंवा कधी गाडीतून उतरून आपल्या बंगल्यापर्यंत चालत जात नसावेत. नाहीतर मनात आणलं असतं तर सरकार दरबारी एक फोन करून ती गल्ली साफ करून घेण त्यांना जमलं नसतं?

वरळी - बांद्रा सी लिंकची कुणकुण तेंव्हा कानावर येत होती. पण सरकारी बांधकाम प्रकल्पातली आपल्याकडील एकंदर दिरंगाई बघून नजिकच्या भविष्यकाळात तरी ती केवळ कुणकुणच राहिलं असं मला तेंव्हा वाटलं. चावी ताब्यात आल्यावर आम्ही त्या घरात काही महिने राहिलो; थोडी सामानाची लावालाव केली आणि मग घराला टाळं लावून न्यूयॉर्कला परतलो.

दोन- तीन वर्षांनी परत गेलो तेंव्हा मधल्या काळात कोणीतरी जादूची कांडी फिरवावी तसा गल्लीच्या रुपात फरक पडला होता. मी अर्थातच त्या जादूच्या छडीला "माझा पायगुण" असं नाव दिलं. कोपऱ्यावरचा कचऱ्याचा ढीग जाऊन त्या जागी खरीखुरी सार्वजनिक मुतारी बांधण्यात आली होती. त्यामुळे रस्ता स्वच्छ  झाला होता. रिकाम्या प्लॉटवर कुठल्यातरी सरकारी खात्याच्या इमारतीचं बांधकाम सुरु झालं होतं.  नवीन फुटपाथ आले होते. (त्यावरून  चालताना अजूनही कधीतरी शेण चुकवत चालावं लागतं हा भाग वेगळा). पडकी चाळ पाडून टाकली होती. जुन्या झालेल्या ऑफिसच्या इमारतीवर नवीन चेहरा चढवण्यात आला होता. गल्ली स्वच्छ झाल्यामुळे रस्त्यावरून चालताना कडेची जुनी गुलमोहराची झाडं नव्यानं जाणवायला लागली होती. आणि सी लिंकच काम सुरु झालं होतं.

शिवाजी पार्क उत्तरेला जिथे सुरु होतं त्याच्या आधीची समुद्राकडे जाणारी गल्ली ते प्रभादेवीत सिद्धीविनायक मंदिराच्या समोर जिथे वीर सावरकर मार्गाला दोन फाटे फुटतात- एक सरळ जातो, दुसरा डाव्या हाताला रवींद्र नाट्य मंदिराकडे वळतो, तेवढा जवळपास एक किलोमीटरचा कॅडल रोडचा स्ट्रेच म्हणजे माझ्या मते अख्ख्या मुंबईतील सर्वात सुंदर भाग आहे.  मी on and off  त्या भागात गेली तीस वर्ष रहात आलेय म्हणून म्हणतेय असं नाही…कदाचित म्हणूनच म्हणत असेन! पण मुंबईच्या इतर भागांकडे तुलनात्मक दृष्टीने बघितल्यावरहि माझ मत कायम आहे. अपार्टमेंट घ्यायच्या वेळेस आम्ही वर्सोवा ते वरळी घरं बघत फिरलो- मला  घरोंदा सिनेमाची आठवण झाली. सुरुवातीला वांद्रा (पश्चिम) वर लक्ष केंद्रित केलं. बराच वेळ तिथे घरं बघण्यात घालवला. मग  जुहु, वर्सोवा, वरळी करत करत A fruit doesn't fall far from the tree ह्या वाक्प्रचाराला अनुसरून आई -वडिल आधी रहायचे त्याच्या चार - पाच गल्ल्या दक्षिणेला येउन पडलो. बरेच घटक ह्या निर्णयाला कारणीभूत झाले: थोड्या दिवसांसाठी येणार तर स्वयंपाकाचा व्याप नको - मालवणी/ मराठी जेवण जवळ मिळायची सोय असलेली बरी; नुसत्याच बिल्डींग मागून बिल्डींग असलेल्या नवीन उपनगरात रहाण्यापेक्षा शिवाजी पार्क सारख्या ऐतिहासिक महत्वाच्या मैदानाजवळ रहाणं केंव्हाही जास्त सुखावह; मुंबईत तेंव्हा प्रदूषण जास्त होतं - समुद्र जवळ असेल तर हवा खेळती राहील, प्रदुषणाचा त्रास कमी वगैरे.

न्यूयॉर्कमध्ये ज्याला अव्हेन्यू म्हणतात तसा दक्षिण- उत्तर जाणारा सरळ रुंद रस्ता आणि त्याला ठराविक अंतरावर छेद देत पूर्व - पश्चिम जाणारे समांतर रस्ते (streets) इतकी आखीव- रेखीव रस्त्यांची आणि शहरांची  बांधणी आपल्याकडे फार क्वचित पहायला मिळते. सावरकर मार्गाचा शिवाजी पार्क ते प्रभादेवी हा स्ट्रेच मुंबईतल्या अशा मोजक्या, हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतक्या भागांमध्ये मोडेल. खरतर हा जुना मध्यवर्ती रस्ता; लोकांना सकाळी उत्तर मुंबईतल्या घरांतून दक्षिण मुंबईतल्या कचेऱ्यापर्यंत आणि संध्याकाळी परत घरी घेऊन जाणारा. पण मुंबईतल्या इतर भागांत वाहतुकीची आणि माणसांची बेशिस्त गर्दी भरपूर वाढली असली तरी कॅडल रोड त्यापासून वाचला आहे. रात्री विमानतळावरून घरी जाताना हे दरवेळी जाणवतं. सहार विमानतळाच्या बाहेरची मोटारी, रिक्षा, रस्त्याच्या दुतर्फा दाटीवाटीनं उभी असलेली बैठी दुकानं, टपऱ्याची अस्ताव्यस्त गर्दी पार करून हायवेला लागलं तरी सीन मध्ये फारसा फरक पडत नाही.  BKCचा फाटा जवळ आला कि हायवेचं रूप थोडं पालटत पण माहीममध्ये शिरलं कि पुन्हा तेच - गर्दी, दाटीवाटी. शेवटी गोखले रोड सोडून उजवीकडे वळलं आणि आसावरीच्या समोर कॅडल रोडवर प्रवेश केला कि सुरु होतो शांत - थोडा निर्मनुष्य- माझ्या आवडीचा भाग. गाडी घराच्या दिशेनी पळत असते. उजव्या बाजूला महापौर निवास, सावरकर स्मारक, वनिता समाज मागे पडत असतात तर डाव्या हाताला शिवाजी पार्क लागतं. रात्रीचे अकरा - साडे अकरा वाजले असले तरी पार्क कधी निर्मनुष्य नसतं.

अमेरिकेत आल्यावर मी एक नवीन, अनोळखी शब्दप्रयोग ऐकला- neck of the woods. तर माझ्या ह्या दोन neck of the woods मध्ये पुष्कळ साम्य आहे. जसं प्रभादेवीचं रूप गेल्या काही वर्षात पालटलय तसंच Manhattanच्या अप्पर वेस्ट साईड मध्येही गेल्या दहा वर्षात खूप फरक पडलाय. आम्ही 74th स्ट्रीट आणि रिव्हर साईड ड्राईव्हच्या कोपऱ्यावर पंधरा वर्षांपूर्वी रहायला आलो तेंव्हा रिव्हर साईड ड्राईव्ह हा रस्ता आणि त्याला लागून, हडसन नदीच्या काठानी पार 158th स्ट्रीट पर्यंत जाणारं लांब, निमुळत रिव्हर साईड पार्क  72nd स्ट्रीटला संपत असे. तसा हा परिसर आधीच खूप सुंदर होता. पण 72nd स्ट्रीट पर्यंतच. त्याच्या पलीकडे दक्षिणेला रेल्वे लाईन होती. झोपडपट्ट्यांचा अभाव असला तरी आपल्या कडल्या रेल्वे लाईन इतकीच अनाकर्षक. दहा-बारा वर्षांपूर्वी रेल्वे लाईनच्या वरती इमारती बांधायला सुरुवात झाली (न्यूयॉर्क सिटीमध्ये हे नवीन नाही. इथे सगळ्या लोकल ट्रेन्सचे रूळ भूमिगत आहेत) आणि ह्या भागाचं रूप बघता -बघता पालटलं. नुसत्या इमारती आणि वाढलेल्या लोकवस्तीच्या अनुषंगाने येणारी नवीन दुकानं, रेस्टोरंट्स, शाळा आणि वाहतुकीची साधनं आली असं नाही तर त्याबरोबरच रिव्हर साईड पार्कही  Manhattanच्या दक्षिण टोकापर्यंत वाढवण्यात आलं. नदीकाठानी जाणारा बोर्डवॉक वाढवून जॉगिंग/ सायकलिंगसाठी वेगळ्या लेन्स करण्यात आल्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत…आम्ही सायकलिंग करत थेट battery पार्क पर्यंत जातो… आम्ही जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजपर्यंत जातो…अशा आपसात बढाया मारायची त्यामुळे शाळकरी मुलांना आणि त्यांच्या वडिलांना संधी उपलब्ध झाली. ज्या बिल्डरांनी हा भाग विकसित केला त्यांचा आर्थिक फायदा तर झाला असेलच पण त्यांनी ह्या भागात रहाणाऱ्या जुन्या आणि नव्या आम जनतेच्या रहाणीमानाचा दर्जाही उंचावला.

माझ्या ह्या दोन मोहोल्ल्यातल साम्य नवीन झालेल्या बांधकामावरच संपत नाही. इतरही अनेक गोष्टी सारख्या आहेत दोन्ही ठिकाणी ज्यामुळे शंका यावी कि आपणं प्रभादेवीत आहोत कि अप्पर वेस्ट साईड मध्ये.  टीव्ही चे कार्यक्रम जे इथे दिसतात तेच तिथेही. (एखाद वेळेस जर टीव्ही बघण्यात रममाण झालो तर भानावर आल्यावर सभोवती बघून स्वतःला आठवण करून दयावी लागते कि झी टीव्ही आपण न्यूयॉर्क मध्ये बघतोय - खिडकीच्या बाहेर मुंबई नाहीय).  ज्या महागड्या जर्मन, इटालियन मोटारींच्या शो रूम्स वेस्टसाईडच्या 11th अव्हेन्यूवर आहेत त्याच मोटारी आता प्रभादेवी / वरळीतल्या शोरूम्स मधूनही विकत घेता येतात. डॉमिनोज पिझ्झा, सबवे सांडवीच ही अमेरिकन खाद्यपदार्थांची दुकानं जितकी न्युयोर्क मधल्या घराच्या जवळ आहेत तितकीच ती प्रभादेवीतल्या घरापासूनही जवळ आहेत. न्यूयॉर्क मधली इमारत हडसन नदीच्या काठी आहे तर प्रभादेवीतली अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर. न्यूयॉर्क मध्ये खिडकीतून दूरवर जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज दिसतो; प्रभादेवीच्या खिडकीतून सी लिंक दिसते. न्यूयॉर्कमध्ये बिल्डींग मधून खाली उतरलं कि पळायला/चालायला/ जॉगिंगला नदीकाठचा बोर्डवॉक आहे; प्रभादेवीला ह्यातलं काही करावसं वाटलं तर जवळ वरळी सी फेस आहे. न्यूयॉर्क मध्ये घराजवळ रिव्हर साईड पार्क आणि काही ब्लॉक्सच्या अंतरावर सेन्ट्रल पार्क आहे तर प्रभादेवीच्या घरापासून शिवाजी पार्कहि साधारण तेवढयाच अंतरावर आहे.

मला नेहमी असं वाटतं कि ९०च्या दशकात जी IT क्षेत्रातील भारतीय तरुण मंडळींची लाट अमेरिकेत आली त्यावर  कोणीतरी अभ्यासपूर्ण+ मनोरंजनात्मक पुस्तक लिहावं; इतका तो महत्वाचा विषय आहे. समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून बघितलं तर एवढ्या मोठ्या संख्येने हि देशाच्या लहान - मोठ्या गावातून वाढलेली तरुण मंडळी अशा देशात आली जिथे भाषा, संस्कृती, समाज व्यवस्था आपल्या देशापेक्षा खूप वेगळी आहे. इंग्रजीच्या ज्ञानामुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जागतिक भाषेमुळे त्यांना वरवर तर इथे संसार थाटण/ नोकरी -धंदा करणं सोप्प गेलं. पण ह्या दोन देशातील संस्कृती खूप भिन्न आहेत त्याच काय? ह्या लोकांची मुलं इथे मोठी होणार. ह्या स्थलांतराचा खोलवर परिणाम केवळ ह्या परदेशी येउन स्थायिक झालेल्या पिढीवरच नाही तर अमेरिका आणि भारत ह्या दोन्ही देशातील समाजावरही होणार. झाला असणार. कसा आणि किती खोलवर परिणाम झालाय ह्याचा अभ्यास कोणीतरी करावा असं वाटतं. मी जर कधी माझ्या व्यक्तिगत प्रवासाचं वर्णन करायचं ठरवलं तर त्याचं नावही माझ्याकडे तयार आहे  -शिवाजी पार्क ते सेन्ट्रल पार्क आणि परत. हे शीर्षक थोडसं व्हीटी स्टेशन ते कुर्ला स्टेशन असं बीईएसटीच्या बस-मार्गा सारखं वाटतं, पण हरकत नाही. ह्या दोन पार्कच्या टेकूवर तोल सांभाळायचा माझा प्रयत्न चालू आहे.

दरवर्षी चार ते पाच कोटी लोक न्यूयॉर्क सिटी आणि सेन्ट्रल पार्कल भेट देतात - देशातून आणि देशाबाहेरून. (मुंबईची लोकसंख्या बघता शिवाजी पार्क आणि दादर चौपाटीला रोज भेट देणाऱ्यांची संख्या कदाचित तेवढी असेल तो भाग वेगळा). आकारानी सेन्ट्रल पार्क शिवाजी पार्क पेक्षा कित्येक पटींनी मोठ्ठ असेल. पण जे महत्व एखाद्या पक्क्या न्यूयॉर्करच्या सांस्कृतिक आयुष्यात सेन्ट्रल पार्कला आहे तितकच महत्वाचं स्थान माझ्या मनात शिवजी पार्कला आहे. आणि तसं ते अनेक मुंबईकरांच्या मनात असेल. संध्याकाळच्या वेळचं शिवाजी पार्क म्हणजे लोकनिरीक्षणाची आवड असणाऱ्याला मेजवानी असते: कट्ट्यावर बसलेले लहानांन पासून ते थोरांपर्यंत सर्व वयोगटातील लोक; आपापल्या स्पिडनि मैदानाभोवती फेऱ्या मारायला गर्दीतून वाट शोधणारी मंडळी; बागेत खेळणारी लहान मुलं; मैदानात क्रिकेट नाहीतर फुटबॉल खेळणारे खेळाडू आणि ह्या सगळ्यांच्या वर लक्ष ठेवून असलेला उद्यान गणेश आणि त्याचं दर्शन घेणारी भक्त मंडळी; आयुष्याच्या नानाविध रंगछटा त्या २५-३० एकरांच्या गोलात रोज बघायाल मिळतात.

शिवाजी पार्कमध्ये दोन गोष्टी ह्यावेळेस नवीन दिसल्या: उद्यान गणेशाचं नवीन मंदिर आणि बाळ ठाकरेंच स्मारक. दोन्ही छान, tastefully बांधलेल्या आहेत - पार्कचा उपभोग घेऊ इच्छिणाऱ्या आम जनतेला अडसर होणार नाही ह्या बेतानी - असं वाटत. गणेश मंदिर छोटंसं, सुंदर, संगमरवरी, मोकळं, हवेशीर आहे आणि स्मृतीस्थळावर तसं काही बांधलेलं नाही. पार्कच्या, कॅडल रोडच्या साईडला साधसच पण देखणं landscaping केलेला आयताकृती चौकोन आहे; त्यात भडक, गॉडी असं काही नाही. मधोमध पाण्यानी ओसंडून वहाणारा मध्यम आकाराचा काळ्या रंगाचा कलश आहे; बाजूला रंगीत फुलांचे ताटवे आहेत; वरून पार्कातले जुने वृक्ष सावली ढाळतायत; ठाकरेंनी स्वतः वृक्षारोपण केलेला आणि आता मोठा झालेला वृक्षही त्यात आहे. स्मारक खूप परिणामकारक वाटतं- विशेषतः रात्रीच्या वेळेस झाडांवर सोडलेल्या दिव्यांच्या प्रकाशझोतात. ते बघताना मनात आलं आपल्या जन्म-कर्म भूमीत, आपणच लावलेल्या वृक्षाच्या छायेत चिरनिद्रा घेण्याचं भाग्य किती जणांना लाभत असेल.

एकदा एका अर्जेंटिनियन आर्टिस्टनी मला विचारलं, मुंबई सुंदर आहे का? होय म्हणायला माझी जीभ कचरली. मुंबईचे काही भाग आपल्याला आवडत असतील पण मुंबई सुंदर शहर आहे असं आपण म्हणू शकू? तो ब्युनोस आयर्सचा होता. मी त्याला विचारल ब्युनोस आयर्स सुंदर आहे का तर तो हो म्हणाला. मग तर मी आणखीच खजील झाले. थोडी सारवासारव केली कि मुंबई आमच्या देशाची राजधानी नाही. आमची राजधानी खूप सुंदर आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे वगैरे. पण मन जरा खट्टूच झालं. Paris, लंडन, प्राग,  Amsterdam, रोम, व्हेनिस हि युरोपियन शहरं जगातल्या सुंदर शहरात गणली जातात. न्यूयॉर्क तर आहेच सुंदर- राजधानी नसूनही. लंडनचे काही भाग मुंबईची आठवण करून देतात - अर्थात जुन्या ब्रिटिशांनी बांधलेल्या मुंबईची. पण मुंबई सुंदर आहे असं येईल म्हणता आपल्याला ?


No comments:

Post a Comment