ग्राउंड हॉग डे नावाचा अमेरिकन सिनेमा ९० च्या दशकात येऊन गेला. त्याचा विषय खूप वेगळा होता. हवामान विषयक बातमी रिपोर्ट करायला गेलेला एका वृत्त वाहिनीचा वार्ताहार टाईम लूप मध्ये अडकतो आणि तोच एक दिवस पुन्हा पुन्हा जगत रहातो- अशी काहीशी गोंधळात टाकणारी कथा आहे. तो सिनेमा बघून बरीच वर्ष झाली पण एवढं आठवतंय कि त्यामध्ये तीच ती दृश्य पुन्हा पुन्हा पडद्यावर दिसत रहातात: बिल मरी - ज्यानं वार्ताहाराची भूमिका केली आहे तो त्याच एका हॉटेल मधील खोलीत रोज झोपतो, सकाळी ठराविक वेळी त्याच्या उशाशी असलेल्या घडाळ्याचा गजर होतो, गजर म्हणून ते एकच गाणं रोज वाजतं, तो रोजच्या पद्धतीनं तयार होतो आणि ग्राउंड हॉगची बातमी कव्हर करायला रोज त्याच ठिकाणी जातो.
(उत्तर अमेरिकेत असा समज आहे (मूळ जर्मनीतुन आलेला) कि २ फेब्रुवारी या दिवशी पेनसिल्व्हेनिया राज्यातील पंक्सटावनी गावात फिल्ल नावाचा ग्राउंड हॉग ( खारी सारखा प्राणी ) आपल्या बिळातून बाहेर आला आणि त्यावेळेस आकाश निरभ्र असेल तर त्याला त्याची सावली दिसते आणि तो परत आपल्या बिळात शिरतो. याचा अर्थ असा कि हिंवाळा अजून सहा आठवडे तरी कुठं जात नाही. जर त्यादिवशी आकाश ढगाळलेले असेल आणि ग्राउंड हॉगला त्याची सावली दिसली नाही तर याच अर्थ हिंवाळा लवकरच संपून चार आठवड्यात वसंत ऋतुच आगमन होणार आह.)
Is love enough, Sir या नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या हिंदी चित्रपटाचा विषय नेहमीचाच आहे. ती एक प्रेमकथा आहे - श्रीमंत मुलगा आणि गरीब मुलगी - "सर" आणि त्याची कामवाली यांच्या मधली. पण तो बघताना ग्राउंड हॉग डे सिनेमाची ची आठवण होते कारण मुंबईत रहाणाऱ्या लोकांच्य आयुष्यात रोज घडणारी दृश्य पुन्हा पुन्हा पडद्यावर दिसतात.
रोज सकाळी ड्रायव्हर घराची बेल वाजवून गाडीची चावी घ्यायला येतो. संध्याकाळी तो चावी परत करायला येतो. कामवाली रत्ना रोज ठराविक पद्धतीनं "सर" अश्विनला त्याचा नाष्टा, जेवण आणून देते. तो रोज सकाळी आपल्या खोलीतुन बाहेर येतो आणि पुढचा दरवाजा उघडून कामाला जातो. संध्याकाळी कामावरून आल्यावर उलट प्रवास - पुढचा दरवाजा उघडून घरात येतो आणि सकाळच्याच मार्गानी आपल्या खोलीत जातो. रोज दुपारी रत्ना वीर कोतवाल उद्यान (प्लाझा) ला जाणारी १७४ नंबरची बस घेऊन शिवणकाम शिकायला जाते. ( चित्रपटामध्ये १७४ क्रमांकाची प्लाझाला जाणारी बस गुरुद्वारा रोड - जो गुगल नुसार मालाड मध्ये आहे -तिथेही थांबते).
चित्रपटाचं कथानक मध्य मुंबईतल्या एका टोलेजंग इमारतीत वरच्या मजल्यावर सुबक सजवलेल्या फ्लॅट मध्ये घडतं. अश्विन आणि रत्ना यांच्या बरोबर चित्रपटात तिसरी महत्वाची भूमिका मुंबईची आहे. शहराचं इतकं सुंदर चित्रण आजवर कुठल्या चित्रपटात पाहिल्याचं आठवत नाही - हिंदी नाही आणि मराठीही नाही.
नायक आणि नायिकेच्या व्यक्तिमत्वाचे जितके पैलू पडद्यावर दिसत नाहीत त्या पेक्षा जास्त मुंबईचे विविध पैलू चित्रपटात पहायला मिळतात : प्रामुख्याने गगनचुंबी इमारती आणि त्यात रहाणाऱ्या लोकांच आयुष्य; त्याबरोबरच त्या इमारतींचं बांधकाम करणाऱ्या कामगारांची वस्ती; चाळ आणि तिथल्या स्वच्छतागृहा बाहेर- आपल्याला कधी एकदा आत जायला मिळतंय ह्याची आतुरतेनं वाट बघत - रांगेत उभे असलेले चाळकरी (यातला गंमतीचा भाग असा कि आधुनिक तंत्रज्ञानामुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी शुभवार्ता घेऊन येणारा फोन कॉलही त्या रांगेत उभं असताना येऊ शकतो); शहरातील रस्त्यांवरची गर्दी, बाहेरून खूप सुखासीन दिसणाऱ्या गाडीच्या आत जाणवणारे रस्त्यावरील खड्डे आणि मुंबई जर भारताच्या डोक्यावरील मुगुट असेल तर त्यातला कोहिनूर हिरा - jewel in the crown - म्हणजे इथला गणपती उत्सव. प्रभादेवी मटण शॉपचं दर्शनही पडद्यावर घडतं. चित्रपटाची लेखिका आणि दिग्दर्शिका रोहीना गेरा हिनं खूप प्रेमानं आणि मानानं मुंबईला पडद्यावर सादर केलंय.
रत्नाची भूमिका केलेल्या तिलोत्तमा शोमनी एका मुलाखतीत म्हंटल आहे कि दिग्दर्शिकेनं तिला सांगितलं होतं कि कामवालीच्या व्यक्तिमत्वाची महत्वाची बाजू म्हणजे तिची डिग्नीटी, स्वतःचा मान ठेऊन रहाण्याची तिची वृत्ती पडद्यावर दिसायला हवी. शोमनी ते आणि कामवालीचे मराठी शब्दोच्चार दोन्ही बरोबर जमवलय. मुंबईला यायला मिळावं म्हणून लग्न करायची घाई झालेल्या धाकट्या बहिणीला रत्ना विचारते, ".. आणि अभ्यास? ... गेला उडत?" कित्यके वर्षात मी "गेला उडत" कोणी म्हण्टलेलं ऐकलं नव्हतं.
संधी मिळालीय म्हणून श्रीमंत मुलाला जाळ्यात अडकवू पहाणारी ती तरुणी नाही. साहेबा कडे ती स्वतःहून काही मागत नाही. त्यानी देऊ केलेली मदत नाकारते. आपल्या आणि त्याच्या आर्थिक आणि सामाजिक स्तरा मधली तफावत ती विसरत नाही. त्यानं सांगूनही ती त्याला "सर"च म्हणत रहाते. त्याला त्याच्या नावानी हाक मारणं तिला जमत नाही.
रत्नाची वेशभूषा आणि केशभूषा अगदी हुबेहूब प्रभादेवीत आमच्या इमारतीत कामाला येणाऱ्या बायकांसारखी नीटनेटकी दाखवलीय : भरपूर अंगमेहनत होत असल्यामुळे सडपातळ शरीरयष्टी, तेल लावून घातलेली केसांची घट्ट वेणी किंवा आंबाडा, कामावर येतानाचा पोशाख म्हणजे कुठल्यातरी प्रकारची सिंथेटिक साडी - जी रोज वापरण्या साठी स्वस्तही असते आणि धुतल्यावर किंवा भांडी घासताना, बाथरूम धुताना ओली झाली तर लगेच वाळू शकते पण इतरत्र बाहेर जायच्या वेळी काठ -पदराची साधी सुती साडी, त्यावर तोकड्या बाह्यांचा ब्लाऊज.
मुंबईची कहाणी तिथे घराघरात काम करणाऱ्या मराठी - त्यातही कोकणी बायकांना वगळून लिहिली जाऊच शकत नाही. सुदैवानी दादर - प्रभादेवी भागात त्या अजूनही कामाला मिळू शकतात परंतु त्यांची संख्या आता कामी होत चाललीय. इमारतीतील माझ्या शेजारणीं म्हणतात कि घरकामात मदतीला कोणतरी मिळण्याच सुख उपभोगलेली आपली बहुतेक शेवटची पिढी ठरणार आहे. आपल्या मुलांना हे सुख मिळेल असं वाटत नाही. नवीन पिढीची मूल्य आता बदलली आहेत तसेच त्यांचा पोशाखही: घरकाम करणाऱ्या तरुण मुली आता पंजाबी ड्रेस घालतात. पण ज्या थोड्याफार जुन्या बायका उरल्यात, ज्या गेली वीस - पंचवीस वर्ष इमारतीत कामं करतायत त्यांना "मान", त्यांची डिग्निटी हाच त्यांचा अमूल्य ठेवा वाटतो. पैशाच्या पाठीमागे त्या फारशा नसतात.
माझी कामवाली एकदा म्हणाली होती- तिनं एका घरात थोडे दिवस काम केलं, मग तिथल्या मालकिणी बरोबर काहीतरी बिनसलं. म्हणाली, "जितके दिवस काम केलं त्याचे पैसे घ्यायला साहेबांनी बोलावलं तर जाईन. मी नाही जाऊन मागणार."
जणू आर्थिक बाजू कमकुवत असल्याने त्यांना ज्या कठीण परिस्थितीतून जावं लागत त्यातून त्या नकळत आयुष्यातील काही महत्वाची मूल्य शिकत असाव्यात : कि भले मी गाडी -घोड्यातून फिरले नसेन, मुला - नातवंडासाठी फार मोठं बँक बॅलन्स साठवून ठेवणं मला जमलं नसेल पण मी फसवून, लबाडी करून कोणाचं काही घेतलं नाही, मी कधी कोणाला दुखावलं नाही. त्यांच्यातील प्रेम त्याच्या कुटुंबाला आवडणार नाही याची जाणीव ठेऊन रत्ना अश्विनला म्हणते, " तुमच्या आईनं (आधीच) एक मुलगा गमावलाय. मी त्यांना हे (दुःख) देऊ शकत नाही".
शाळा - कॉलेजच्या दिवसात ज्यांनी मिल्स आणि बूनच्या कादंबऱ्या वाचल्या असतील त्यांना हा सिनेमा ओळखीचा वाटेल. त्या सगळ्या रोमॅन्स नॉव्हेल्सच असायच्या - पाश्चिमात्य नायक आणि नायिका असलेल्या: बँकेत कारकुनी करणारी अमेरिकन तरुणी ऑस्ट्रेलियात एका रँचवर नोकरी साठी जाते आणि रँच मालकाच्या प्रेमात पडते वगैरे. हा चित्रपट थोडा तसाच आहे: खेडेगावातून मुंबईला आलेली गरीब विधवा रत्ना शहरातील श्रीमंत आर्किटेक्ट्च्या प्रेमात पडते आणि तो तिच्या. मिल्स अँड बून मधल्या नायकांना स्ट्रॉंग आणि सायलेंट असण अनिवार्य असायचं. विवेक गॉम्बरने त्या पद्धतीचा अश्विन चांगला साकारलाय - त्याला एक मजबूत संवेदनशिलता जोडून.
अश्विन सुसंस्कृत आहे असंही दाखवलय. जगात कित्येक लोकांना जे शब्द म्हणणं जमत नाही असं म्हणतात ते दोन शब्द - थँक यू आणि सॉरी - म्हणायला तो जराही कचरत नाही. कामवाली असो किंवा मित्र तो त्यांच्यावर थँक्यू आणि सॉरीची खैरात करतो. एक दिवस त्याची आई त्याला भेटायला येते तीही रत्नाला प्लिज आणि थँक यू म्हणून जाते.
जाड पानांची पिक्चर बुक्स असतात - रंगीत पानावर एक मोठं चित्र असत त्या खाली दोन -तीन वाक्यांचा मजुकर असतो... आपण एक एक पान उलगडत जातो आणि त्यातुन गॊष्ट पुढे सरकत जाते तशी अश्विनच्या घरातील दृश्य पडद्यावर येतात. मुख्य खोलीचा रंगही पिक्चर बुकला शोभेल असा हलका हिरवा आहे. घरात इनमीन दोन माणसं. त्यांचं नातंही असं कि जेवणखाण टेबल वर आणून ठेवण्या पुरतच त्यांचं आपसात संभाषण. घरातील एकाही दृश्यात एक किंवा दोन किंवा तीन या पेक्षा जास्त व्यक्ती दिसत नाही. त्यांच्यातील संवाद हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच वाक्यांचे आहेत. एकामागून एक शब्द जंजाळ वाक्य भरलेल्या संवादाचं एकही दृश्य चित्रपटात नाही.
घरातील दृश्यांमागचं पार्श्वसंगीत घरातील मुड प्रमाणे शांत, हळुवार तर कधी उदास आहे. घरा बाहेरील संगीत मुंबईच्या उर्जेप्रमाणे जोशपूर्ण आहे. लहानशी खटकण्यासारखी गोष्ट म्हणजे रत्नाच्या बोलण्यात पुन्हा पुन्हा येणारे इंग्रजी शब्द: खेडेगावातून आलेली रत्ना आयुष्य या अर्थाचा हिंदी शब्द वापरण्या ऐवजी life म्हणते, स्वतःला नोकर म्हणायच्या ऐवजी servant म्हणते, अश्विनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना birthday या शब्दाचा उच्चार तर ती इतका व्यवस्थित करते कि शहरात रहाणाऱ्या शिकलेल्या कित्येक भारतीयांना तो शब्द तसा उच्चारता येत नाही.
प्रेमात पडलेल्या दोन व्यक्तीमधील आर्थिक आणि सामाजिक दरी बुजवण्यासाठी प्रेम पुरेसं आहे का असा प्रश्न चित्रपट विचारतो.