शेवटी घरभर शोधुनही मला ते पुस्तक सापडलं नाही. मला पक्क आठवतंय की मी ते विकत घेतलं होतं आणि वाचलंही होतं. पुस्तक प्रकाशित झालं तेंव्हा मी मुंबईत होते. पुस्तकाला इंग्रजी माध्यमांनी बरीच प्रसिद्धी दिली होती. प्रसिद्धी मध्ये ट्विंकल खन्नाचा आय क्यू किती हाय आहे, ती अभ्यासात किती हुशार होती ते पुन्हा पुन्हा सांगितलं जात होतं.
येताना माझ्या बॅगेत बरीच पुस्तकं असतात. ती सगळी मी वाचतेच असं नाही पण त्यात आणखी एका पुस्तकाच्या वजनाची भर पडायला नको म्हणून बरेच दिवस मी ते विकत घ्यायचं टाळलं. पण निघायच्या दिवशी असं वाटलं की एवढा उच्च बौद्धयांक असलेल्या महिलेनी लिहिलेलं पुस्तक आपण वाचायला हवं होतं अशी न्यूयॉर्कला गेल्यावर चुटपुट वाटत राहिली तर ते ऑर्डर करून मागवायला जास्त किंमत मोजावी लागेल. त्यापेक्षा इथेच ते विकत घेतलेलं पत्करलं. शिवाजी पार्कच्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे एक छोटं क्रॉसवर्ड आहे. (पेट्रोल पंपाच्या मागे पुस्तकाचं दुकान का लपलंय माहित नाही.) विमानतळावर जाताना वाटेत तिथे थांबून मी ते पुस्तक विकत घेतल.
वाचून झाल्यावर बरेच दिवस ते घरात इथेतिथे ठेवलेलं होतं. पण आत ते सापडत नाहीय. एखाद दिवशी मराठी -प्रेम उफाळून आल्याने मी ते टाकून दिल कि काय अशी शंका वाटते.
(गाणं १:३० मिनिटांनी सुरु होतं)
सौभाग्यवती हाडाची विनोदी या नावाचं इंग्रजीत भाषांतर केलं कि जे नाव तयार होईल ते पुस्तकाचं शिर्षक आहे. त्यात तिच्या नोकरावर एक लेख आहे. लेखात असं म्हंटलंय कि नोकर खूप धांदरट आहे पण मनानी चांगला आहे. तो त्याच्या गावी जातो तेंव्हा परत येताना वाकडी वाट करून सोलापूर स्टेशनवर उतरतो आणि ट्विंकल बाईंना आवडते म्हणून तिथली सुप्रसिद्ध शेंगा चटणी आठवणीनं त्यांच्यासाठी घेऊन येतो. लेखात असही म्हंटलंय कि तो काय बोलतो ते तिला समजत नाही कारण तिला मराठी येत नाही.
बाई गं, मुंबईत तुझा जन्म झाला, इथेच तू वाढलीस, पाचगणीच्या शाळेत शिकलीस तरी मराठी येत नाही असं छातीठोक पणे कसं म्हणू शकतेस? शाळेत थोडंफार शिकली असशीलच की - हा विचार ते वाक्य वाचताना मनात डोकावला होता. मुद्दामहुन ते वाक्य आपल्या पहिल्या पुस्तकात घालण्या मागे काही उद्देश असेल की काय असंही वाटलं होतं. अशा प्रकारची वाक्य मनात नेहमीच घर करून बसतात. अमेरिकेतही असे लोक असतात जे सारं आयुष्य इथे काढतात तरीही कधी इंग्रजी बोलायला शिकत नाहीत. पण ते इंग्रजी न बोलणाऱ्या देशातून इथे आलेले असतात आणि अशिक्षित किंवा कमी शिकलेले असतात. नवीन काही शिकण्याची कुवत त्यांच्यात एकूणच कमी असते. पण उच्च बौद्धयांक असलेल्या व्यक्तीला मनात आणलं तर एखादी भाषा शिकणं कठीण जाऊ नये. असो. त्या वाक्याच्या निषेधार्थ मी पुढे कधीतरी ते पुस्तक टाकून दिलं असण्याची शक्यता आहे.
पुस्तक टाकलं नसत तर व्हिडिओत म्हंटलेल्या उपदेशाचं - एकदा आपली मुल मोठी झाली कि आपल्या अनुभवाचा फायदा इतरांना करून द्यायला काय हरकत आहे - मूळ इंग्रजी वाक्य मी जसच्या तसं इथे उद्घृत करू शकले असते. यातुन बोध एवढाच निघतो की पुस्तक शक्यतो टाकू नये. ते कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही.
Web version मध्ये व्हिडिओ दिसतात.
No comments:
Post a Comment