Sunday, January 31, 2021

प्रश्न तुमचे उत्तरं आमची (३)


लॉकडाऊन मुळे एकत्र कुटुंबात रहाणाऱ्या सुनेला घरातील माणसांच्या काही सवयी जास्त तीव्रतेने जाणवू लागल्या. एका नवीन सुनेनी सासुच्या बोलण्याचा अर्थ समजुन घेण्यासाठी सवाल जवाबदारांचा सल्ला मागितला. 

नी विचारलं: लॉकडाऊन सुरु होण्याच्या थोडे दिवस आधी माझं लग्न झालं. गेले काही महिने मी घरातुन काम करतेय. सासुशी माझी हळूहळू ओळख होत आहे. ती सारखी मला म्हणते, "पप्पूचा हात खूप सढळ आहे. ज्योतिषांनी सांगितलंय कि तुमच्या मुलाच्या हातातून पैसा सारखा जात रहाणार. गेलेला पैसा त्याला परत मिळणार पण तो जात रहाणार."  हे म्हणताना लक्ष्मीच्या चित्रात तिच्या हातातून नाणी पडत असतात तशी हाताची ऍक्शन असते. 

आमच्या इमारतीत एक कुटुंब रहातं. त्यातील महिलेचा भाऊ श्रीमंत आहे. तो बहिणीला काही मदत करत नाही असं सासु मला सांगते. त्या महिलेस भावाच्या मदतीची गरज असावी असं तिची परिस्थिती पाहुन वाटत नाही. तिनं माझ्या सासुकडे आपल्या भावाविषयी तक्रार केली असण्याची शक्यता नाही. बहिण सधन असली तरी भावानं तिला "मदत" करावी ही माझ्या सासुची आयडिया दिसतेय.

माझा नवरा भावंडांच्यात सर्वात धाकटा आहे शिवाय त्याच्याकडे सध्या काही पैसे नाहीत. सासु मला हे सहज सांगत असेल कि त्यामागे काही उद्देश असावा? 

सवाल जवाबदार :, नक्कीच काहीतरी उद्देश असणार. कदाचित लॉकडाऊन मुळे ज्या लोकांना हालअपेष्टातून जावं लागतंय त्यांना आपल्या मुलानं आर्थिक मदत करावी अशी तिची इच्छा असेल.

किंवा ती तुला सावध करू इच्छित असेल कि तिच्या मुलाचा स्वभाव खर्चिक आहे. तो पैशांच्या बाबतीत बेजबादारपणे वागतोय असं तुला वाटण्याची शक्यता आहे पण तू काळजी करू नकोस कारण ज्योतिषानी सांगितलंय की खर्च केलेला पैसा तो परत मिळवेल. 

आणखी एक हेतू हा असु शकतो कि सासू आडवळणाने तुला सांगू इच्छिते की लग्नानंतर तिचा मुलगा सढळ हाताने आईवडिलांना आणि भावंडांना पैसे देत राहील पण तूला काळजी वाटण्याचं कारण नाही कारण गेलेला पैसा तो परत मिळवेल असं ज्योतिषानी सांगितलंय. 

मला दुसरी आणि तिसरी शक्यता जास्त वाटतेय. मुलाने गरजूंना मदत करावी असं तिला वाटत असतं तर तिनं  स्पष्टपणे त्याला तसं सांगितलं असतं. पण ती आडवळणाने तुला काहीतरी सुचवू पहातेय. मला तुझ्या बद्दल सहानुभूती वाटते. मुलांकडून अपेक्षा ठेवणारे आईवडील असतात आणि ते समजण्यासारखं आहे. पण आपल्या मुलानं त्याच्या मोठ्या भावंडांना - त्यांची परिस्थिती चांगली असुनही पैसे द्यावेत - असं सुचवत रहाणं  - विशेषतः मुलाचा स्वतःचा संसार अजुन नीट चालू झालेला नसताना  - बरोबर वाटत नाही. 

सासुच्या बोलण्यामागे काही उद्देश नाही असं धरून चालू नकोस. ह्याचा तुला पुढे त्रास होऊ शकतो. विशेषतः आज सासु तुला जे सांगतेय ते जर आयुष्यभर तिनं तिच्या मुलाला सांगितलं असेल तर तुझा नवरा तेच धरून चालण्याची शक्यता आहे - 'आईनी सांगितलंय माझा हात सढळ आहे म्हणजे माझ्या हातातून कायम पैसा जात राहिला पाहिजे'.' तुझ्या संसाराचं आर्थिक आरोग्य जपण्यासाठी पैसा कुठे आणी किती जातोय ह्यावर डोळस पणे लक्ष ठेवण्याचं काम तुला करावं लागेल.    

असमाधानी कीं स्वार्थी स्वभाव? 

: लॉकडाऊन सुरु होण्याच्या काही महिने आधी माझी नणंद आपलं घर सोडून आमच्या घरी रहायला आली. तिची मुलं मोठी आहेत: मुलगा इंजिनिअर आहे. अमेरिकेला जाऊन उच्च शिक्षण घेऊन आलाय. मुलगी डॉकटर आहे. नणंदेच्या नवऱ्याने निवृत्त झाल्यावर मोठं घर बांधलंय. त्याला भरपूर पेन्शन मिळते. कशालाच काही कमी नाही. बऱ्याच लोकांना आयुष्यात जे  मिळत नाही ते सर्व नणंदेकडे आहे. तरीही ती स्वतःच्या घरात असमाधानी का होती ते मला माहित नाही. कारण काहीही असू देत मला वाटत नणंदेनं तिचे प्रॉब्लेम्स तिच्या मुलांच्या मदतीने स्वतःच्या घरी सोडवावेत कारण मुलं मोठी आहेत. असं असू शकेल का की तिच्या मुलांना आपल्या आईची जबाबदारी नको आहे. त्यापेक्षा आजोळी येऊन रहाणं त्यांना जास्त सोयीचं पडतय? 

सवाल जवाबदार: म, पूर्वीच्या काळी आपल्याकडे पद्धत होती कि एखाद्या मुलीचं लग्न झालं नसेल किंवा ती बालविधवा असेल तर तिचा सांभाळ तिचे माहेरचे किंवा सासरचे लोक करायचे. एखाद्या स्त्रीचा नवरा लवकर गेला आणि तिची मुलं लहान असली तर तिचा भाऊ किंवा नवऱ्याचा भाऊ त्या स्त्रीला आपल्या घरी घेऊन येत. तिचा व तिच्या मुलांचा सांभाळ करीत. पण ते कुठपर्यंत? - मुलं स्वावलंबी होईपर्यंत. मुलगा एकदा कमवता झाला कि आपल्या आईची आणि बहिणीच्या लग्नाची वगैरे जबाबदारी त्यानं उचलावि अशी पद्धत होती. त्यामुळे तू म्हणतेस ते खरं आहे. मुलं मिळवती असतील तर त्यांनी आईची जबाबदारी घ्यायला हवी. 

मला तुझ्या प्रश्नाचा दुसरा भाग चिंताजनक वाटतो. आयुष्यात सगळं असुनही असमाधानी रहाण्याची वृत्ती घातक ठरू शकते. स्वतःकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता न बाळगता कायम  स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करण्याचा अतिरेक झाला कि असमाधानी वृत्ती बळावते. इंग्रजी मध्ये म्हणतात life is not fair. सगळ्यांना सगळं एकसारखं मिळत नाही. तुमच्या कडे एखादी गोष्ट जास्त असेल तर दुसऱ्यांकडे दुसरी कुठलीतरी गोष्ट जास्त असते जी तुमच्याकडे नसेल. देवानी सगळं दुःख फक्त आपल्याच पदरात टाकलं आहे आणि बाकी सगळे मजा मारतायत असं धरून चालणं हे अपरिपक्वतेचं (immaturity) चिन्ह आहे. पण बरेच लोक तो मूर्खपण करतात. आपापल्या वाट्याचं दुःख सगळ्यांना भोगावं लागतं. काही लोक त्याचा बाऊ करतात आणि दुसऱ्यांच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडत बसतात तर काही लोक ते चुपचाप झेलतात - कोणीतरी आपल्या दुःख्खाची भरपाई करायला हवी अशी अपेक्षा ते ठेवत नाहीत. 

नणंदेला एखाद्या चांगल्या समुपदेशकाला भेटण्याचा सल्ला दे. भक्ती, प्रार्थना आणि साधनेत मन रमवायला सांग. असमाधानी वृत्तीचं मुळ कशात आहे हे ती जितक्या लवकर शोधून काढेल आणि त्यावर मात करेल तितकं चांगलं नाहीतर तिचा असंतुष्ट स्वभाव अख्ख्या कुटुंबाला त्रासदायक होऊ शकतो. 

या महिन्याच्या सदरात माहेरी आलेल्या नणंदांनी सवाल जवाबदारांचा पाठपुरावा केल्याच दिसलं. त्यावरचा आणखी एक प्रश्न:

नी विचारलं:  माझ्या सासुबाई त्यांच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होत्या. लग्नानंतर त्या सारख्या माहेरी जायच्या. त्यांच्या आईवडिलांचा त्या आधार होत्या. माझ्या नणंदांनी आपल्या आईला सारखं माहेरी जाऊन राहिलेलं बघितलंय. आता त्याही तेच करतात. माहेरी आल्या कि महिनोन महिने, वर्षन वर्ष इथेच रहातात. कित्येकदा सुचवूनही आपल्या घरी जात नाहीत. 

सासुला भाऊ नसल्याने तिच्या आणि तिच्या मुलींच्या लक्षातच येत नाही की जेंव्हा भाऊ असती तेंव्हा भावजय एका वेगळ्या कुटुंबातून आलेली असते. तिचे संस्कार, विचार, मूल्य वेगळी असु शकतात. नणंदांनी आपल्या सीमारेषा पाळल्या नाहीत, माहेरी येऊन मनमानी केली, आपलंच खरं करत बसल्या तर त्यामुळे त्यांचा स्वार्थ साधला जात असेल पण माहेरच सुख विचलित होतं. 

मी सासुला म्हंटलं , "तुम्ही मुलींवर मूलभूत संस्कार कसे केले नाहीत कि लग्न झाल्यावर त्यांनी स्वतःच्या घरी जास्त रहायला हवं आणि माहेरी फार कमी. मुली कायम तुमच्या जवळ असल्याने तुमच्यावर सतत त्यांचा प्रभाव पडतोय."  तर सासु मला म्हणाली, "हि सगळी तुझ्या संशयाची भुतं आहेत." नणंद तिचा घटस्फोट झाल्यावर आज कितीतरी वर्ष आमच्याकडे आहे. २४/७ तिला आईच्या कानांना ऍक्सेस असतो. ते मला सासूच्या बोलण्यात स्पष्ट जाणवतंय तरीही ही माझ्या संशयाची भुतं कशी असू शकतात?

सवाल जवाबदार: आजकाल आपल्याकडे पाश्चिमात्य लोकांचं अनुकरण करण्याचा मोह लोकांना आवरत नाही. पण ते अनुकरण अर्धवट असतं. वाढत्या संख्येने मोडणारे संसार हे त्याच एक उदाहरण आहे. लग्न झालेल्या मुलीनीं घर सोडून माहेरी येण्याचे प्रकार वाढलेत. या बाबतीत पाश्चिमात्य देशांचं अनुकरण करताना एक गोष्ट विसरली जाते ती म्हणजे त्यांची समाजव्यवस्था एकटं रहाणाऱ्या लोकांसाठी अनुकूल आहे. त्या देशात घटस्फोट घेणारी व्यक्ती मग ती स्त्री असो किंवा पुरुष घटस्फोटानंतर आईवडिलांकडे येऊन रहात नाही. आईवडील किंवा भावंडं मानसिक आधार देत असतीलl पण घटस्फोटा नंतरची वाटचाल घटस्फोट घेणाऱ्या व्यक्तीला स्वतःहून करावी लागते. आपल्या निर्णयाचा इतरांना त्रास देण्याची तिथे पद्धत नाही. 

, मी तुला याहून जास्त चांगलं मार्गदर्शन करू शकलो असतो तर मला बरं वाटल असतं. आपल्या बहिणींना समजावून सांगण्याचं  काम तुझ्या नवऱ्यानं करायला हवं. पण त्या जर भावाचं किंवा आईच ऐकत नसतील तर तु त्यांना काही सांगितलंस तरी त्याचा उपयोग होणार नाही. सध्याच्या परिस्थितीत तुला जर नणंदांची माहेरी ढवळाढवळ त्रासदायक वाटत असेल तर तु त्या घरापासुन लांब रहाणं एवढा एकच पर्याय तुझ्यासमोर उरतो. त्यामुळे तुझ्या मुलांना त्यांच्या आज्जीचा सहवास मिळणार नाही पण नणंदा जर समजूतदारपणे वागायला तयार नसतील काळजावर दगड ठेऊन तो निर्णय तुला घ्यावा लागेल. 

 



No comments:

Post a Comment