Tuesday, February 23, 2021

Oprah's Mantra 2





खरंतर पूर्ण मंत्र आहे:         When people show you who they are, believe them - the first                
                                    time. 
                                     
                                     जेंव्हा लोक तुम्हांला त्यांचा खरा चेहरा दाखवतात तेंव्हा त्यांच्यावर विश्वास   
                                 ठेवा - पहिल्याच वेळी. 

ओप्रानी एक मजेशीर किस्सा आपल्या एका भाषणात सांगितला आहे. त्यातुन आणखी एक मंत्र शिकण्यासारखा आहे. 

एकदा दक्षिण आफ्रिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी तिला दक्षिण आफ्रिकेला बोलावलं. ती खूप काळजीत पडली. दहा दिवस त्यांच्या घरी रहायचं, दिवसातुन तीनदा - सकाळचा नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण - त्यांच्या बरोबर जेवायला बसायचं याची तिला काळजी वाटू लागली. ती सारखं म्हणू लागली, "मी काय बोलू, मी त्यांच्याशी काय बोलू .दहा दिवस म्हणजे तीस जेवणं, इतका वेळ मी त्यांच्याशी काय बोलू."  शेवटी तिचा बॉयफ्रेंड / पार्टनर तिला म्हणाला, " त्यापेक्षा ते काय बोलतील ते तू ऐकून का घेत नाहीस ?" 

तिनं तिच्या पार्टनरचा सल्ला मानला. एकूण २९ वेळा ती मंडेलांबरोबर पंगतीला बसली. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. मंडेलांनी   त्यांच्या शिक्षण मंत्र्यांबरोबर तिची गाठ घालून दिली. त्याची परिणिती ओप्रानी दक्षिण आफ्रिकेत गरजू मुलींसाठी शाळा सुरु करण्यात झाली. 

तात्पर्य नुसतं बोलणंच नाही तर ऐकणंही तितकंच महत्वाचं असतं.  
                                 
             
माया अँजेलो यांच्या Caged Bird  या कवितेचा( जेमतेम) अनुवाद : 

पिंजऱ्यातली पक्षीण

मुक्त पक्षीण भरारी घेते    
वाऱ्याच्या पाठीवर बसुन 
आणि तरंगत जाते   
प्रवाहाच्या अंता पर्यंत 
आणि आपले पंख बुडवते 
सूर्याच्या सोनेरी किरणात
आणि आभाळाला गवसणी घालते 

पण जी पक्षीण अरुंद पिंजऱ्यात 
येरझाऱ्या घालते 
तिला तिच्या बंदिस्त रागा  मधून 
कमीच दिसतं 
तिचे पंख छाटलेले असतात 
तिचे पाय बांधलेले असतात  
म्हणून ती चोच उघडते ... आणि गाते 

पिंजऱ्यातली पक्षीण 
भयभीत कापऱ्या आवाजात गाते  
ठाऊक नसलेल्या 
तरीही हव्याहव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीं बद्दल 
आणि तीचं गाणं ऐकू जातं    
लांब दूर टेकडी वर    
कारण पिंजऱ्यातली पक्षीण  
स्वातंत्र्याचं गाणं गाते 

मुक्त पक्षीण येणाऱ्या झुळकीची वाट पहाते  
आणि सळसळत्या झाडांमधून वाट दाखवणाऱ्या वाऱ्याची 
आणि पहाटे हिरवळीवर विसावलेल्या धष्टपुष्ट किड्यांची 
आणि स्वतःला आकाशाची मालकीण समजते 

पण पिंजऱ्यातली पक्षीण मेलेल्या स्वप्नांच्या राखेत उभी असते 
तिची सावलीही दचकून झोपेत किंचाळते 
तिचे पंख छाटलेले असतात आणि पाय बांधलेले असतात   
म्हणून ती चोच उघडते आणि गाते 

पिंजऱ्यातली पक्षीण 
भयभीत कापऱ्या आवाजात गाते 
माहित नसलेल्या 
तरीही हव्याहव्याश्या वाटणाऱ्या गोष्टींबद्दल 
आणि तिचं गाणं ऐकू जातं  
दूर टेकडी वर  
कारण पिंजऱ्यातली पक्षीण 
स्वातंत्र्याचं गाणं गाते 



व्हिडीओ web version मध्ये दिसेल. 





No comments:

Post a Comment