Monday, April 5, 2021

प्रश्न तुमचे उत्तरं आमची (४)


७ मार्चच्या सोशल क्यूज सदरात (NY Times) नॅन्सी नावाच्या बाईने पुरुषांविषयी तक्रार केली होती. तिनं लिहिलं होतं कि मी ६७ वर्षांची आहे. मी माझ्या वयावर खुश आहे. माझ्या वयाच्या निरोगी महिलां सारखी मी दिसते. पण पुरुष जेंव्हा स्त्रीदाक्षिण्य दाखवत माझ्यासाठी दार उघडतात तेंव्हा मोठ्या मानभावी पणे हसत म्हणतात, "Here you go, young lady "?  मागच्या वेळी असं झालं तेंव्हा नंतर कितीतरी तास मला स्वतः बद्दल वाईट वाटत राहिलं. पुढच्या वेळी जेंव्हा कोणतरी असं म्हणेल तेंव्हा मी काय उत्तर देऊ? 

यावर फिलिप गलानस ( सोशल क्यूज चे लेखक) यांनी नॅन्सीला सल्ला दिला कि सर्वप्रथम अनोळखी पुरुषांच्या बोलण्यावरून अस्वस्थ होणं बंद कर. स्त्रियांना तसेच वयस्कर लोकांना कमी लेखण्याची वृत्ती काही लोकांच्या अंगात इतकी भिनलेली असते की तु त्यांना एखादं झणझणीत तिरकस उत्तर दिलंस तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. 

तेंव्हा सरळ स्पष्ट बोल. त्यांना सांग कि,  मला "तरुणी" असं संबोधून तुम्ही मुद्दामहुन मला माझ्या वाढलेल्या वयाची जाणीव करून देत आहात हे तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही माझ्या वयाच्या पुरुषांना "Young man" म्हणता का?  

पण या प्रसंगातुन तुला शिकण्यासारखा एखादा धडा असेल तर तो हा कि तू कशी दिसतेस याबद्दल तुला काय वाटत हेच फक्त महत्वाचं आहे. इतरांना काय वाटतं ते नाही. 

नॅन्सीचा अनुभव अमेरिकेतला आहे. ती भारतात असती तर कदाचित स्त्री आणि पुरुष दोघेही तिला "आज्जी" म्हणून मोकळे झाले असते. अनोळखी लोकांनी किंबहुना तिच्या नातवंडां व्यतिरिक्त इतर कोणीही तिला  "आज्जी" म्हण्टलेलं नॅन्सीला आवडेल का?  बहुदा नाही. (नॅन्सी भारतात न जाईल तर बरं).   

सोशल क्यूज वाचलं कि फिलिप गलानस यांची मराठी आवृत्ती सवाल जवाबदार यांची नेहमी आठवण येते. त्यांना यावेळी विचारण्यात आलेले काही प्रश्न:


चार प्रश्न सुनांचे :   

प्रश्न क्र.  १: परदेशात रहाणारी सुन:

मी एक भारताबाहेर रहाणारी सुन आहे. जेंव्हा आम्ही भारतात जायचं ठरवतो तेंव्हा लगेच माझ्या सासूचा फोन येतो - " सुनबाई, काय सांगू तुला, बिल्डींगच्या बाहेर महानगर पालिकेने इतकं खोदुन ठेवलंय. त्यामुळे घरात खूप धुरळा येतोय. मुलांना धुळीचा त्रास होईल" किंवा "बिल्डिंगच काम चालू आहे. सगळीकडे बांबू लावलेत. बांधकामाचं सामान पडलंय. घरात उंदीर, घुशींचा इतका सुळसुळाट झालाय म्हणून सांगू." किंवा  "तुम्हांला परदेशात ज्या सुविधांची सवय आहे त्या सोयी ह्या घरात नाहीत. तुमची इथे गैरसोय होईल." मला माहीत आहे की हे फोन सासू स्वतःहुन करीत नाही. आम्ही तिथे नसल्याची संधी साधुन आणि सासूच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन जी मंडळी तिच्या भोवती साठली आहेत ते सासूला हे फोन करायला लावतात. पण त्यामुळे आम्हांला दुसरीकडे रहावं लागतं आणी माझी मुलं त्यांच्या आज्जीच्या सहवासाला मुकतात. काय करु? 

सवाल जवाबदार: 

प्रिय, परदेशत रहाणारी सुन, लहान सहान गोष्टींचा बाऊ करू नकोस. सासुलाही करू देऊ नकोस. मी असं ऐकलंय कि तुमच्या परदेशात धुळ पुसण्यासाठी फडकी विकत मिळतात. (भारतात जुने टॉवेल, चादरी आणि गंजीफ्रॉक फरशी आणि धुळ पुसण्यासाठी वापरण्याची पूर्वी पध्द्त होती. त्यामुळे आपोआप जुने कपडे त्यांच्या चिंध्या होईपर्यंत वापरले जात असत.) फॉरेनच अनुकरण करायला टपलेले लोक आता भारतातही जुने कपडे कचऱ्यात फेकतात आणि घर पुसायची फडकी बाजारातुन विकत आणतात. सांगायचा मुद्दा हा कि फडकी बरोबर घेऊन ये किंवा इथे आल्यावर विकत घे; धुळीला घाबरण्याच कारण नाही. मुलांना हवं तर घरातही अधून मधून मास्क लावायला सांग म्हणजे धुळी पासुन आणि इतर विषाणुंपासुन त्यांचा बचाव होईल. झालच तर उंदीर, घुशी मारण्याचे सापळे आणि झुरळ, पाल मारायच्या गोळ्याही बरोबर आण. पण  मुलांना त्यांच्या आज्जीबरोबर रहायला मिळणं महत्वाचं आहे. जे काही त्याच्या आड येत असेल - धुळ, उंदीर, घुशी, झुरळं, पाली, डास किंवा इतर कोणी  -  त्या अडथळ्यांना दूर करणं कठीण नाही. 

आधुनिक सुखसुविधांचं म्हणशील तर अधून मधून मुलांनी आणि मोठ्यांनीही काही सुविधां शिवाय चालवून घेण्याची सवय ठेवायला हवी. कदाचित सासूची काळजी अनाठायी असेल. त्यांना वाटतं त्याप्रमाणे तिथे गेल्यावर, त्यांच्या सहवासात तुम्हांला सुखसुविधांची उणीव भासणारही नाही.  


प्रश्न क्र. २: अपेक्षांनी त्रासलेली सुन :

माझा नवरा कामानिमित्त एक वर्षासाठी अमेरिकेला चाललाय. भारताबाहेर जाण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. तो खूप उत्सुक तर आहेच पण त्याबरोबरच तिकडची कामाची पद्धत, तिकडे जाण्यासाठी लागणाऱ्या सरकारी कागदपत्रांची जुळवाजुळव या सारख्या गोष्टींना तोंड देण्याची तयारी करण्यात मग्न आहे. त्यातच त्याच्या आईची त्याच्या मागे भुणभुण चालू आहे कि त्याने तिथे पोहोचल्यावर लगेच त्याच्या बहिणीच्या मुलाला (जो सध्या ज्युनियर कॉलेजात शिकत आहे) अमेरिकेला जाता यावं यासाठी प्रयत्न करावे. नवऱ्याला हे फारच त्रासदायक वाटतंय. तो अजून अमेरिकेला पोहोचलेला नाही, तो तिथे कुठे रहाणार, खाण्यापिण्याचं काय करणार यापैकी कशाचीही चौकशी न करता आई आपल्या नातवाच्या भविष्य काळाची काळजी त्याच्यावर सोपवतेय हे त्याला खटकतय. त्याची आई एकंदरच सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं कायम त्याच्यावर टाकत असते. "पप्पू अमक्याला मदत का करत नाही, पप्पू तमक्याला का मदत करत नाही," असा तिचा तगादा माझ्या मागेही चालू असतो. पप्पूनी आजवर भरपूर मदत केली आहे. घेणाऱ्यांनी ती हक्कानी घेतली आहे. त्याबद्दल कोणी कधी आभार मानायची हिम्मत दाखवलेली नाही किंवा आभार न मानल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली नाही. शिवाय कितीही मदत केली तरी अपेक्षा संपत नाहीत. त्या वाढतच रहातात. जुने मागणारे लोक नवीन मागण्या घेऊन येतात. नवीन लोक नवीन मागण्या घेऊन येतात. वर पुन्हा, " काय झालं मदत केली तर? तुमच्या कडे आहे ते आमच्या बरोबर शेअर करा", असा आम्हांला सल्ला देतात. अशा परिस्थितीत नवऱ्याने काय करावं असं तुम्हांला वाटतं?

सवाल जवाबदार:

प्रिय, अपेक्षांनी त्रासलेली सुन,  तुला माहीतच असेल कि जो करतो त्याच्या सगळे मागे लागतात. जो काही जबाबदारी घेत नाही, त्याच्या वाटेला कोणी जात नाही. जाऊन काही उपयोग नसतो. तुझ्या नवऱ्यासाठी हा काळ स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे - भाच्याच्या भविष्य काळाची काळजी करण्याचा नाही. जगात काही लोक "देणारे" असतात तर काही लोक कायम "घेणारे" असतात. ही एक प्रकारची मानसिकता असते. स्वतःकडे पुरेसं असुनही दुसऱ्यांपुढे हात पसरणारे लोक असतात. त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही कि तुम्ही जर कायम फुकटचं घेण्यात धन्यता मानली, घेण्याचा संकोच बाळगला नाही तर तुम्ही कधीच देणाऱ्यांच्या स्थानावर पोहोचु शकत नाही. तुम्ही आयुष्यभर "घेणारे"च रहाता  - मग कोणाच्यातरी मागे लपून घेत असलात तरीही. घेणाऱ्यां पेक्षा देणारे असणं केव्हाही चांगलं. देण्यात मोठेपणा आहे जो घेण्यात नाही. तू देवाचे आभार मान की त्याच्या आशिर्वादाने तु आणि तुझा नवरा "देणारे" आहात "घेणारे" नाही. तरीही "घेणाऱ्यां"च्या सगळ्या मागण्या पूर्ण करणे मूर्खपणा ठरेल. कारण घेणारे निःसंकोचपणे मागत आणि घेत रहातात. त्यांच्या मागण्यांना अंत नसतो.   


प्रश्न क्रमांक ३: सुगरण सुन: 

काही दिवसांपूर्वी माझी सासू अचानक माझ्याकडे जेवायला आली. तेंव्हा मी गवारीची भाजी केलेली होती. सासूला भाजी आवडली. माझ्या माहेरी सगळ्यांना चवदार जेवण आवडतं. माझ्याही हाताला चव आहे.

गवारीची भाजी आवडल्यावर सासू मला म्हणाली, " मी दिलेला मसाला घातलास ना भाजीत?"  ते ऐकल्यावर माझी बोलतीच एकदम बंद झाली. भाजी मी निगुतीनं केली माझ्या पद्धतीनं - जास्त मसाले, पाणी वगैरे न घालता. माझ्या घराजवळ ताज्या भाज्या मिळतात. गवार मुळातच ताजी, चवदार होती. त्यात साधं तिखट घातलं. ते हि मी स्वतः जाऊन स्टेशन जवळच्या बेडेकरांच्या दुकानातुन आणलेलं आहे. गेली कित्येक वर्ष मी सासू कडून मसाला घेतलेला नाही. तिच्या पद्धतीचा मसाला मी स्वयंपाकात वापरत नाही. तरीही माझ्या चवदार भाजीच श्रेय तिनं एका फटक्यात स्वतःच्या मसाल्याकडे म्हणजे पर्यायानं स्वतःकडे घेऊन टाकलं. ते ऐकून मी इतकी अवाक झाले कि काय बोलावं तेच मला सुचलं नाही. सासुला फोन करून सांगू का कि गवारीच्या भाजीत चिमुट्भरही तिचा मसाला नव्हता. 

सवाल जवाबदार: 

प्रिय सुगरण सुन, तुझ्या हातची गवारीची भाजी चाखायला नक्की आवडेल. कधीतरी मला घरी जेवायला बोलव. एक विनंती : भाजी बरोबर मासे/ मटण/कोंबडी किंवा निदान अंड्याचा रस्सा तरी कर. नुसती गवार - ती कितीही चविष्ट असली तरी - माझ्या घशाखाली उतरणार नाही. तुला मांसाहारी स्वयंपाक जमत नसेल तर बाहेरून मागव. पण प्लिज - मी माझ्या घरात मासे/ मटण आणू देत नाही -  अशी वाक्य म्हणू नकोस. अतिथी देवो भव हा आपल्याकडचा संस्कार आहे. देवाला जे आवडतं त्याचा नैवेद्य दाखवावा. 

आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर : तू नक्कीच सासूला फोन करून सांगू शकतेस कि गवारीच्या भाजीत चिमुट्भरही तिचा मसाला घातलेला नव्हता. पण त्यापेक्षा मी म्हणेन कि पुढच्या वेळेस तिला भेटायला जाशील तेंव्हा तुझ्या घराजवळच्या बाजारातून अर्धा - पाव किलो ताजी गवार आणि तू वापरतेस ती तिखट पूड घेऊन जा आणि तिच्या समोर तिला भाजी करून दाखव. म्हणजे काय घटक पदार्थ वापरले की भाजी चवदार होते ते तिला प्रमाणासहित समजेल. 


प्रश्न क्र. ४: डिनर डिप्लोमसीला वैतागलेली सून:

आमच्या नातेवाईकांचा असा ठाम विश्वास आहे कि ते कितीही स्वार्थीपणाने वागले असतील, एखाद्या व्यक्तीला त्यांनी कितीही दुखावलं असेल तरी सॉरी वगैरे म्हणायची काही गरज नसते. काही झालंच नसल्या सारखं वागायचं, दुखावलेल्या व्यक्तीला मटणाचं जेवण जेवायला घालायचं म्हणजे त्या व्यक्तीला आपल्या दुःखाचा विसर पडतो आणि सगळं सुरळीत होतं असं त्यांना वाटतं. प्रामाणिक पणे माफी मागणे, आपली चूक कबूल करणे  या गोष्टींना कोणी महत्व देत नाही. अशा प्रकारची कोंबडीचं सुक्क आणि मटन बिर्यानी वाली डिप्लोमसी अगदी बेधडकपणे (निर्लज्जपणे?) प्रॅक्टिस केली जाते. फारच जास्त गिल्टी वाटत असेल तर बिर्यानी बरोबर जेवणात कोकणी वडे आणि मासळीच्या तुकड्यांचा समावेश केला की त्यांची सगळी पापं धुतली जातील असं त्यांना वाटतं. पण अशा प्रकारची डिप्लोमसी आता मला पचत नाही. माझ्या दुखावलेल्या भावना चमचमीत मांसाहारी जेवणानी भरलेल्या ताटाखाली गाडून टाकता येतील इतक्या हलक्या नाहीत. चूक केलेल्या व्यक्तीने प्रामाणिकपणे आपल्या चुकिची कबुली द्यावी आणि परतफेड करावी असं मला वाटतं. तुम्हांला काय वाटतं? 

सवाल जवाबदार: 

प्रिय डिनर डिप्लोमसीला वैतागलेली सून: सुक्के मटन आणि बेदाणे, काजू घालून बनवलेली मटन किंवा कोंबडीची बिर्यानी यांची ताकद मी कधीच कमी लेखणार नाही. पण त्यामुळे दुखावलेल्या व्यक्तीच समाधान होईल का? हे त्या दुखावलेल्या व्यक्तीनी ठरवायचं आहे. तुझ्या भावनांची कदर तु केली नाहीस तर दुसरेही करणार नाहीत. तेंव्हा तुझी इच्छा नसेल तर अशा याप्रकारच्या "डिनर डिप्लोमसी" मध्ये तू सहभागी होऊ नकोस.  





No comments:

Post a Comment