Sunday, April 25, 2021

घेता घेता एक दिवस...


देणाऱ्याने देत जावे 
घेणाऱ्याने घेत जावे 
घेता घेता एक दिवस 
देणाऱ्याचे हात घ्यावेत .... विंदा करंदीकर 


काही कवितांच्या ओळी मनात इतक्या खोलवर जाऊन बसतात कि विसरू म्हंटल्या तरी विसरत नाहीत. शाळेत पाठ करून कितीही वर्ष झाली असली तरी त्या कायम मनाच्या तळाशी पडून रहातात. आपल्या अचेतन मनावर त्यांनी कधी कसे नकळत संस्कार केलेत ते आपल्या लक्षातही येत नाही .अधून मधून त्या तरंगत वर येतात. वरील चार ओळींचं तसच आहे. 

मुंबईत टॅक्सीचा रंग काळा -पिवळा असतो तसं न्यूयॉर्क सिटी मध्ये तो नुसता पिवळा असतो. त्या पिवळ्या टॅक्सीच्या व्यवसायाशी निगडीत एक उद्योजक एकदा मला काय म्हणाले कि कामानिमित्त त्यांना त्या धंद्यातील ब्रोकर्स बरोबर नियमित देवाणघेवाण करावी लागते. ब्रोकर्स बरोबर हँडशेक केल्यावर ते आपल्या हाताची बोटं तपासून बघतात कि सगळी शिल्लक आहेत का कारण हातमिळवणी करता करता तुमच्या हाताची बोटं लंपास करतील अशी ती मंडळी असतात. (हा त्यांचा अनुभव होता). 

पण ही कविता शिकवताना आमच्या शाळेतल्या बाई काय म्हणाल्या होत्या की विंदा जेंव्हा म्हणतात  - "घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत" - तेंव्हा त्यांना असं म्हणायचं नाही कि *घेता घेता तुम्ही घेण्यात इतके तरबेज व्हा कि एक दिवस देणाऱ्याचे हातही घेऊन मोकळे व्हा. ह्या ठिकाणी कवीला असं अभिप्रेत आहे कि घेता घेता एक दिवस तुमचे हात देणाऱ्याचे हात होऊ देत. घेता घेता एक दिवस तुम्ही देणारे व्हा.  

पूर्ण कविता खालील प्रमाणे :


देणाऱ्याने देत जावे 
घेणाऱ्याने घेत जावे 

हिरव्यापिवळ्या माळावरून 
हिरवीपिवळी शाल घ्यावी 
सह्याद्रीच्या कड्याकडून 
छातीसाठी ढाल घ्यावी 

वेड्यापिशा ढगाकडून 
वेडेपिसे आकार घ्यावे 
रक्तामधल्या प्रश्नांसाठी 
पृथ्वीकडून होकार घ्यावे 

उसळलेल्या दर्याकडून 
पिसाळलेली आयाळ घ्यावी 
भरलेल्याश्या भीमेकडून 
तुकोबाची माळ घ्यावी 

देणाऱ्याने देत जावे 
घेणाऱ्याने घेत जावे 
घेता घेता एक दिवस 
देणाऱ्याचे हात घावेत 


'घेता घेता एकदा दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत' या ओळींबरोबर सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीची गोष्ट आठवते. एकदा एका  व्यापाऱ्यावर देव प्रसन्न होतो. तो व्यापाऱ्याला सोन्याचं अंड देणारी एक कोंबडी भेट देतो. त्याला म्हणतो कि हि कोंबडी रोज तुला एक सोन्याचं अंड देईल. रोज एक अंड विकुन जे पैसे मिळतील त्यावर तू आयुष्यभर आरामात जगू शकशील. व्यापारी देवानं सांगितलं तस करतो. रोज एक सोन्याचं अंड विकतो. पण काही दिवसांनी त्याच्या मनात लोभ जागृत होतो. त्याला वाटत कि आपण जर ह्या कोंबडीचं पोट कापलं तर आपल्याला तिच्या पॊटातली सगळी अंडी एकदम विकता येतील, मग आपण एकदम खूप श्रीमंत होऊ. व्यापारी कोंबडीचं पोट कापतो. पोटात अंडी नसतात. कोंबडीही मरते. कोणत्या गोष्टीतुन काय बोध घ्यायचा हे आपल्यावर असतं.  



 

No comments:

Post a Comment