त्या वर्तमानपत्रांकडे पुरेसं भांडवल असतं म्हणून त्यांना हे शक्य होतं कीं कुठल्या बातमीला किती महत्व द्यायचं किंवा द्यायचं नाही या विषयीचं त्यांचं धोरण ठरलेलं असतं कुणास ठाऊक. न्यूयॉर्क टाईम्स सारखं वर्तमानपत्र नियमित वाचलं तर लक्षात येतं कि इतर अनेक कामां बरोबरच समाजाला दिशा दाखवणं, वाचकांची अभिरुची घडवणं हे आपलं काम आहे असं या वर्तमानपत्रांना वाटतं आणि आपली भूमिका ते अतिशय गांभिर्याने घेतात.
पण मराठी वर्तमानपत्रातील तुटुपुंजे मृत्युलेख पहिले कि वाईट वाटतं. ती व्यक्ती गेल्याचं दुःख तर होतच पण त्याही पेक्षा जास्त वाईट वाटतं की प्रदीर्घ यशस्वी कारकीर्द असलेल्या लोंकावरील लहानसा मृत्युलेख वाचल्यावर त्या व्यक्तीच्या जीवना बद्दल आजच्या वाचकांना फारशी माहिती मिळू शकत नाही.
माहितीपूर्ण मृत्युलेखांच्या ऐवजी एखाद्या अंकलचा (वर्तमानपत्रवालेच अंकल हा शब्द वापरतात) त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नात हिंदी सिनेमातील गाण्यावर केलेला डान्स कसा व्हायरल होतोय याच्या व्हिडीओ मात्र आवर्जुन मराठी वर्तमानपत्रांच्या वेबसाईटवर लावलेल्या असतात. तो व्हिडीओ खरतर फक्त त्या अंकलच्या घरच्यांनीच बघण्याच्या लायकीचा असतो. अंकलच सुटलेलं पोट आणि त्यांचा हिरव्या रंगाचा सफारी सूट यात इतरांना बघण्यासारखं काही नसतं पण तरीही त्या व्हिडिओतुन त्या वर्तमानपत्राची आणि त्यांच्या वाचकांच्या अभिरुचीची झलक बघायला मिळतेच. असो. मृत्युलेख हा या पोस्टचा विषय नाही. प्लॅनिंग हा आहे.
तर राणी गेल्यावर तिची अंतयात्रा कशी काढायची, तिचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे आणि किती वेळ ठेवायचं, तिच्या अत्यंविधींना कोण उपस्थित रहाणार, कुठली फुलं तिच्या पार्थिवा भोवती ठेवायची या सगळयाचं प्लॅनिंग संबंधित अधिकाऱ्यांनी आधीच केलेलं असणार. आणि हे सगळं खुद्द राणीच्या संमतीनेच ठरवलं गेलं असणार.
पाश्चिमात्य देशात कित्येक सर्वसामान्य लोकही निवृत्ती नंतरचं प्लॅनींग करताना आपल्या चिरनिद्रेसाठी आपल्याला हव्या त्या दफनभूमीत प्लॉट स्वतः निवडतात आणि तो विकत घेऊन ठेवतात. आपल्या अंत्यविधीं बद्दलच्या इच्छा आपल्या मुलाबाळांना सांगुन ठेवतात.
लताबाईनीं अशा प्रकारच्या काही अंतिम ईच्छा त्यांच्या घरातील लोकांना सांगितल्या होत्या कि नाही माहित नाही. जरी सांगितल्या नसल्या तरी त्यांच्या अंत्यविधींचं प्लॅनिंग करण्यासाठी त्यांनी इतरांना पुरेसा वेळ दिला होता. बरेच दिवस त्या रुग्णालयात अत्यवस्थ होत्या. त्यांचं वय नव्वदीच्या पलीकडे होतं. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू असताना सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे त्यांच्या अंत्ययात्रेबद्दल विचार करून ठेवणं चुकीचं किंवा अपशकुनी ठरलं नसतं. त्या बऱ्या होऊन घरी परत आल्या असत्या तर ते प्लॅनिंग सरकारी फाईल मध्ये बंद करून ठेवता आला असतं.
बाईंच्या अंत्यविधींना आयत्यावेळी पंतप्रधान उपस्थित राहिले म्हणून ते विधी शिवाजी पार्क मध्ये करावे लागले हे सरकारी स्पष्टीकरण जसच्या तसं स्विकारण्याची काहीच गरज नाही. याउलट यापुढे कधीही कोणाचेही (मग ती व्यक्ती कितीही महान असू देत) अंत्यविधी कुठल्याही सार्वजनिक वापराच्या जागी केले जाऊ नयेत याची खबरदारी घ्यायला हवी.
शिवाजी पार्क ऐतिहासिक महत्वाचं आहे. ते जपायला हवं. त्याचं स्मशान भूमीत रूपांतर होऊ नये याची दक्षता घ्यायला हवी. मुंबईत ते मध्यवर्ती ठिकाणी आहे. ज्या सुप्रसिद्ध लोकांच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे त्यांचं पार्थिव मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवलं तर असंख्य लोक त्यांच अंतिम दर्शन घेऊ शकतात हे खरं आहे. पण त्या व्यक्तींचे अंत्यविधी सार्वजनिक रित्या मैदानात करण्या ऐवजी स्मशानभूमीत फक्त त्यांच्या निकटवर्तीयांच्या आणि काही मोजक्या निमंत्रितांच्या (त्यात पंतप्रधानही आले) उपस्थितीत करता आले असते. शिवाजी पार्कची स्मशानभूमी मैदाना पासून अगदी हाकेच्या अंतरावर - चार पावलांवर आहे.
पण त्यासाठी थोडाफार पूर्व - विचार आणि पूर्व - तयारी आवश्यक होती... जी बहुदा झाली नाही.
शिवाजी पार्कचं मैदान रोज हज्जारो लोक पायदळी तुडवत असतात. आपल्या संस्कृती मध्ये चुकुन एखाद्या व्यक्तीला आपला पाय लागला तरी त्या व्यक्तीची माफी मागायची अशी पद्धत आहे. देवळात किंवा घरातही आपण चप्पल - बूट घालून जात नाही. त्या स्थानाच पावित्र्य राखण्याची आपली ती पद्धत असते. परंपरे नुसार दहन विधीसाठी ठराविक जागा राखून ठेवलेल्या असतात त्यामागे काहीतरी कारण असणार.
सार्वजनिक आरोग्य हे हि एक महत्वाचं कारण आहे. शिवाजी पार्क इमारतींनी वेढलेलं आहे. रोज अगणित लोक ते व्यायामासाठी, खेळण्यासाठी किंवा फिरण्यासाठी वापरतात. लहानां पासून ते थोरां पर्यंत सर्व जण त्या मैदानाचा आनंद लुटतात. लहान मुलांना कोणी स्मशानात घेऊन जात नाही मग स्मशान त्यांच्या जवळ आणणं कितपत योग्य आहे.
आज खाजगी काही उरलय तरी का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. तरीही अंत्यविधी जगासमोर करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. नाका - तोंडात नळ्या घातलेल्या अवस्थेत व्हीलचेअरवर बसलेल्या बाईंचे फोटो ज्यांनी यू ट्यूब वर लावले त्या लोकांचा जितका निषेध व्हायला हवा तितकाच निषेध सार्वजनिक दहनाचा व्हायला हवा.
आयुष्यभर काठपदराची पांढरी साडी आणि अंगभर पदर अशी आपली ईमेज जपलेल्या बाईंना आपले रुग्णालयातील गाऊन घालुन चाकांच्या खुर्चीत बसलेले व्हिडीओ जगजाहीर झालेलं आवडलं असतं का याचा विचार ते व्हिडीओ लावणाऱ्यांनी आणि ते पसरवणाऱ्यांनी करायला हवा होता हि अपेक्षा ठेवणंही आता निष्फळ आहे. एकतर आपल्या नजरा मेल्यात. केवळ वेळ घालवण्यासाठी- टाईम पास - म्हणून आपण काहीही बघू शकतो. तशी सवयच आपल्याला लागली आहे. स्वार्थीपणा तर इतका वाढला आहे कि ज्या व्यक्तीची व्हिडिओ आपण काढतोय आणि समाज माध्यमां मध्ये लावतोय त्या व्यक्तीची पूर्व- परवानगी घ्यायला हवी याचीही आता कोणाला पर्वा उरलेली नाही.
बाई तर गेल्या. आपली गोड गाणी मागे ठेऊन गेल्या. पण मुंबईत रहाणारी काही मंडळी गेली काही वर्ष त्यांच्यावर नाराज होती असं म्हणतात. त्यांचं म्हणणं असं होतं कि पेडर रोड वर आपल्या निवासस्थाना बाहेर उड्डाण पूल बांधण्यास बाईंनी विरोध केला आणि सरकारनी तो ऐकला. त्यामुळे त्या भागातील वाहतूक कोंडी कमी होऊ शकली नाही.
नक्की कुठुन कुठपर्यंत उड्डाण पूल बांधण्यात येणार होता माहित नाही पण बाईनीं त्याला विरोध केला अशी कुणकुण मुंबईत रहाणाऱ्या बहुतेक लोकांच्या कानावर पडललेली असणार. पेडर रोडवर वाहतूक कोंडीत अडकल्यावर तिथे नसलेल्या उड्डाण पुलाचा विचार मनात डोकावतोच.
हाजी अलीहुन दक्षिणेला जाण्यासाठी ( कि south -west, नैऋत्य?) पेडर रोडवर वळत असताना उजव्या हाताला थोडं दूर समुद्राच्या काठावर महालक्ष्मी मंदिराचा कळस दिसतो आणि डाव्या हातानि पुढे गेलं कि एका पाठोपाठ एक तीन महत्वाच्या इमारती लागतात. प्रथम लगेच डाव्या कोपऱ्यावर बाईं रहायच्या ती ईमारत आहे, थोडं पुढे गेल्यावर जसलोक रुग्णालय आणि त्याच्या थोडं पुढे गेलं की आतल्या रस्त्यावर अंबानींचं २१ मजली निवासस्थान जे पेडर रोड वरच असल्या सारखं वाटतं. दक्षिण मुंबईतला हा महत्वाचा आणि भरपूर रहदारीचा रस्ता आहे हे खरं पण तो खुप अरुंद आहे. तिथे उड्डाण पूल बांधला तर त्या भागाचं सध्याचं सौन्दर्य कायम राहील का याची शंका वाटते.
एकीकडे मला असं म्हणावंसं वाटतंय कि आता बाई नाहीत त्यामुळे त्यांचं स्मारक किंवा त्यांना मानवंदना म्हणून त्यांच्या नावानं तो उड्डाण पूल बांधण्यास काहीच हरकत नाही. बाई रागावणार नाहीत. त्या आता राग-लोभाच्या पलीकडे गेल्या असतील. त्यांची अट कदाचित एवढीच असेल कि तो उड्डाण पूल सुंदर असावा - मुबईतील इतर उड्डाण पुलांप्रमाणे कुरूप नसावा.
अशा प्रकारे पुढील पिढ्यांनी बाईंची गाणी ऐकली नाहीत -( नवीन गायक/ गायिका येत रहातील त्यामुळे पूर्वीच्या गायक /गायिकांची गाणी कदाचित आजच्या इतकी ऐकली जाणार नाहीत ) - तरीही त्या उड्डाण पुलावरून जातायेताना बाईंचं नाव त्यांना कायम दिसेल. बाईंचा त्या पुलाला विरोध होता कि नव्हता या कशाचंच नवीन पिढीला सोयरसुतक नसेल. सी लिंकने ज्या प्रमाणे मुंबईची शोभा वाढवली आणि लोकांचा प्रवास सुकर केला त्याप्रमाणेच पेडर रोड वरील उड्डाण पूलामुळे शहराच्या सौदर्यात भर पडली तर जिथे कुठे असतील तिथुन बाई आशीर्वादच देतील.
पेडर रोडचं सौदर्य आहे तसं जपायचं कि शहराच्या एका भागातुन दुसऱ्या भागात रोज गाडीने कामाला जावं लागणाऱ्या रहिवाशांची सोय पहायची कि थोडा जास्त विचार करून यातुन तिसराच काही मार्ग निघतो का ते बघायचं जेणे करून हि दोन्ही उद्दिष्ट्य साध्य होतील -हे ठरवण्याचा हा प्रश्न आहे.
No comments:
Post a Comment